येवल्याच्या नागरिकांनी नियमांचे पालन केले तरच कोरोनाला अटकाव शक्य – पालकमंत्री छगन भुजबळ

    51

    ✒️ शांताराम दुनबळे(नाशिक, जिल्हा प्रतिनिधी)मो:-9960227439

    नाशिक(दि.26जुुुलै):- येवला शहर व तालुक्यातील नागरिकांनी नियमांचे पालन काटेकोरपणे केले तरच कोरोनाला अटकाव शक्य असल्याचे सांगत कोरोनाला अटकाव घालण्यासाठी कोमॉर्बीड रुग्णांची नियमित तपासणी सुरू ठेवावी असे आदेश राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री तथा नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाकडून करण्यात येत असलेल्या उपाययोजना आणि नियोजनाबाबत आज ना.छगन भुजबळ यांनी येवला शासकीय विश्राम गृह येथे आढावा बैठक घेतली. त्यावेळी ते बोलत होते.
    यावेळी आमदार किशोर दराडे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.सुरेश जगदाळे, प्रांताधिकारी सोपान कासार, निफाडच्या प्रांताधिकारी डॉ. अर्चना पठारे, येवल्याचे तहसीलदार रोहिदास वारुळे, निफाडचे तहसीलदार दिपक पाटील, मनमाड पोलीस उपअधीक्षक समरसिंग साळवे, गटविकास अधिकारी डॉ.उमेश देशमुख, येवला नगरपालिकेच्या मुख्याधिकारी संगीता नांदूरकर, वैद्यकीय अधीक्षक डॉ.शैलजा कृपास्वामी, तालुका आरोग्य अधिकारी डॉ.एच.आर. गायकवाड,लासलगाव येथील वैद्यकीय अधीक्षक डॉ.सूर्यवंशी, शहर पोलीस निरीक्षक संदीप कोळी, तालुका पोलिस निरीक्षक अनिल भवारी, सहायक निबंधक एकनाथ पाटील यांच्यासह संबंधित अधिकारी उपस्थित होते.
    यावेळी पालकमंत्री छगन भुजबळ म्हणाले की, येवला शहरातील रुग्णसंख्या वाढणार नाही याबाबत दक्षता घेऊन कोमॉर्बीड रुग्णांची नियमित तपासणी करून त्यांच्यावर विशेष लक्ष ठेवण्यात यावे. रुग्णांच्या तपासणीची संख्या अधिक वाढविण्यात येऊन कोमॉर्बीड रुग्णांची ऑक्सिजनची लेव्हल ची तपासणी नियमित करून लक्ष ठेवण्यात यावे अशा सूचना देत मृत्यूदर कमी करण्यासाठी प्रयत्न करावा असे आदेश दिले.
    ते म्हणाले की, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पुढील काळात अधिक दक्षता घेण्यासाठी ग्रामीण रुग्णालयात कायमस्वरूपी सेंट्रल ऑक्सिजनसह लागणाऱ्या आवश्यक त्या सोयी सुविधा तयार करण्यात याव्यात असे आदेश दिले. ग्रामीण भागात गर्दी होणाऱ्या ठिकाणी पोलीसांनी विशेष लक्ष देऊन गर्दी होणार नाही याची काळजी घ्यावी गावनिहाय स्थापन करण्यात आलेल्या दक्षता समित्या कार्यरत करण्यात येऊन गावपातळीवर विशेष लक्ष ठेऊन गर्दी टाळण्यासाठी प्रयत्न करावे असे त्यांनी सांगितले.
    यावेळी छगन भुजबळ यांनी पीक कर्ज, कर्जमाफी,मका खरेदी, वीजेचे प्रश्नांचा आढावा घेत उपस्थित शेतकऱ्यांचे प्रश्न जाणून घेतले. तसेच मका खरेदीस शासनाने परवानगी दिलेली असून शंभर टक्के खरेदी पूर्ण करावी, शेतकरी कर्ज माफीचा लाभ शेतकऱ्यांना मिळवून देऊन त्यांना पीक कर्जाचे वाटप लवकरात करावे यासह सोळा गाव पाणी पुरवठा योजना, तसेच विजेच्या प्रश्नांबाबत आढावा घेऊन तक्रारी निकाली काढण्याचे आदेश दिले.
    यावेळी येवला तालुक्यात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ७४ टक्के आहे. आतापर्यंत तालुक्यात २४४ रुग्ण आढळले असून १८८ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. सद्या ४५ रुग्णांवर उपचार सुरू असून एकूण १७ रुग्ण दगावले असून मृत्युदर ६.९६ इतका आहे. येवला शहारातील सर्वेक्षाणामध्ये आढळुन आलेल्या १९१६ कोमॉर्बीड रुग्णांना विटामिन सी, विटामिन डी.आणि झींक सपलिमेंटचे वाटप करण्यात आलेले आहे . येवला शहरामध्ये सध्या १३ कंटेनमेंट झोन अस्तित्वात आहेत. त्यामध्ये केलेल्या सर्वेक्षणात १२९ कोमॉर्बीड रुग्ण आढळुन आलेले आहेत. ग्रामीण भागामध्ये ७ कंटेनमेंट झोन अस्तित्वात आहेत . त्यामध्ये केलेल्या सर्वेक्षणात ७९६ कोमॉर्बीड पेंशंट आढळुन आलेले असून तालुक्यात २२ हजाराहून अधिक कोमॉर्बीड रुग्ण असल्याचे प्रांत अधिकारी कासार यांनी सांगितले. तर निफाड तालुक्यातील रुग्णांबाबत व करण्यात येणाऱ्या उपाय योजनांबाबत प्रांताधिकारी डॉ.अर्चना पठारे यांनी माहिती दिली.