भारताचे मिसाइल मॅन:-डॉक्टर अब्दुल कलाम

26

🔹डॉ. ए पी जे अब्दुल कलाम यांच्या स्मृती दिन (27जुलै)

            🔸प्रासंगिक लेख 🔸

डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम यांचा जन्म 15 ऑक्टोबर 1931 साली तामिळनाडू राज्यातील रामेश्वर शहरातील धनुष्यकोडी गावात एका मच्छीमार कुटुंबात झाला होता. त्यांचे संपूर्ण नाव फाकीर जैनुलाबदिन अब्दुल कलाम असे आहे. पैसा जरी खूप नसला तरी कुटुंब खाऊन पिऊन सुखी होते. तीन भाऊ, एक बहीण यांच्या सहवासात अब्दुल चे बालपण मजेत गेले. अब्दुल चे आई वडील म्हणजे एक आदर्श जोडपं होतं. साधेपणाची आणि माणसावर प्रेम करण्याचे संस्कार त्यांनी आपल्या सर्व मुलांवर केले. रामेश्वरमच्या एलिमेंट्री स्कूलमध्ये अब्दुल च प्राथमिक शिक्षण झालं. शालेय जीवनात त्यांचे तीन अगदी जवळचे मित्र होते. अरविंदन, रामानंद शास्त्री, आणि शिव प्रकाशन हे तिघेही हिंदू होते. अब्दुल ची आई व आजी कुटुंबातल्या लहान मुलांना झोपवताना रामायणातल्या गोष्टी सांगत असत. धर्माकडे अशाप्रकारे निरोगी दृष्टीने पाहण्याचे संस्कार अब्दुलला लहानपणीच मिळाले. समसुद्दिन हे रामेश्वर मधील वर्तमानपत्राचे एकमेव वितरक होते. त्यांच्याबरोबर वर्तमानपत्र वाटण्याचे काम अब्दुल करीत असे. लवकरच अब्दुल्ला रामनाथपुरम येथील शोर्टझ हायस्कूलमध्ये दाखल करण्यात आले. तेथील शिक्षण संपवून त्यांनी बीएस्सी पदवी सेंट जोसेफस कॉलेजमध्ये मिळवली. नंतर त्यांनी मद्रास येथील सुप्रसिद्ध मद्रास इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी इथे प्रवेश मिळवून विमान संचार अभियांत्रिकीची पदवी मिळवून संरक्षण मंत्रालयाचे शाखेत नोकरी स्वीकारली.
उपग्रह प्रकल्पाचे प्रमुख त्याचप्रमाणे राष्ट्रपती झालेल्या अब्दुल कलाम यांची शैक्षणिक वाटचाल अशी होती. फी भरायला पैसे नव्हते. तेव्हा त्यांच्या बहिणीने आपल्या सोन्याच्या बांगड्या गहाण ठेवल्या व पैसे त्यांना दिले. त्यानंतर मात्र त्यांनी शिष्यवृत्ती मिळवली व आपले पुढील शिक्षण पूर्ण केलं. संरक्षण मंत्रालयाच्या शाखेत कानपूर दिल्ली येथे त्यांनी काम केलं. नंतर त्यांना बंगलोरला एका प्रकल्पावर काम करण्यासाठी पाठवलं गेलं. 1962 मध्ये थुंबा येथील अवकाश यान उड्डाण तळाच्या केंद्रात कलाम यांची नेमणूक झाली. अंतराळात उपग्रह सोडण्यासाठी अवकाशयाना मधून पाठवला जातो या प्रशिक्षणासाठी त्यांना सहा महिन्यासाठी अमेरिकेत पाठविण्यात आलं.
अंतराळ संशोधन संस्थेमध्ये कलामांनी वेगवेगळ्या पदावर काम केलं. मग ते उपग्रह अंतराळात सोडण्याच्या प्रकल्पाचे संचालक झाले. जुलै 1980 मध्ये “रोहिणी” हा उपग्रह अंतराळात सोडण्यात यश आलं. 1981 मध्ये कलाम यांना “पद्मभूषण” हा किताब मिळाला.25 नोव्हेंबर 1999 रोजी कलामांची सरकारने प्रमुख वैज्ञानिक सल्लागार म्हणून नेमणूक केली. त्यांना कॅबिनेट मंत्र्याचा दर्जा देण्यात आला. अनेक उत्तमोत्तम पुरस्कार त्यांना मिळाले. अत्युच्च असा “भारतरत्न “पुरस्कार त्यांना मिळाला. 10 नोव्हेंबर 2001 रोजी त्यांनी प्रमुख वैज्ञानिक सल्लागार पद सोडलं मग अण्णा विद्यापीठात प्राध्यापक म्हणून ते काम करू लागले. विद्यार्थ्यांमध्ये मिसळू लागले. ते अविवाहित होते. ते उत्तम कवी होते. रुद्र वीणा वाजवण्यात ते अत्यंत निपुण होते. नंतर ते राष्ट्रपती झाले. देशाचा पहिला नागरिक या नात्याने देशातील सर्वोच्च पद असणाऱ्या राष्ट्रपतीपदी विराज मान होणाऱ्या व्यक्तीपैकी अब्दुल कलाम तिसरे राष्ट्रपती होते. अब्दुल कलाम राष्ट्रपती पदावर विराजमान असताना सुद्धा लोकांना भेटत असत. सर्वसाधारण लोकांच्या प्रती त्यांच्या मनात खूपच भाव होता. त्यामुळे ते लोकांच्या समस्येबाबत नेहमी तत्पर राहत होते. आणि म्हणून त्यांना “लोकांचे राष्ट्रपती” देखील म्हटले जात होतं. राष्ट्रपती पदाचा राजीनामा दिल्यानंतर त्यांनी अध्यापन, संशोधन, लेखन, सार्वजनिक सेवा या सारख्या कामांमध्ये त्यांनी मोठ्या जोमाने आणि प्रामाणिकपणे कार्य केले. ते एक महान वैज्ञानिक बरोबर एक कुशल राजनेता देखील होते. त्यांनी अकरा पुस्तके लिहिली त. त्यापैकी “अग्निपंख”( विंग्ज ऑफ फायर) हे जास्त प्रसिद्ध आहे.अब्दुल कलाम यांना जगातील 35 पेक्षा जास्त विद्यापीठांनी डॉक्टरेट पदवी देऊन त्यांना गौरविण्यात आले आहे. “मिसाईल मॅन” म्हणून ख्याती मिळविणारे एक महान नेता ,महान वैज्ञानिक, तसेच अध्यापका बरोबर एक प्रख्यात लेखक म्हणून सुद्धा अब्दुल कलाम यांनी आपल्या सकारात्मक विचारांची छाप देशातील जनतेत सोडली होती. 25 जुलै 2015 रोजी कलाम जी इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट शिलॉंग येथे आयोजित कार्यक्रमात व्याख्यान देत असताना अचानक पणे त्यांची तब्येत खराब झाली.त्यानंतर त्यांना तात्काळ शिलॉंग येथील दवाखान्यात भरती करण्यात आले.दवाखान्यात भरती केल्यानंतर हे त्यांच्या तब्येतीत कोणत्याच प्रकारची सुधारणा होत नव्हती. याचा परिणाम त्याच ठिकाणी दिनांक 27 जुलै 2015 ला त्यांनी आपल्या जीवनातील अंतिम श्वास घेतला. कलाम यांनी केलेल्या कार्याचा उपयोग भारतासाठी विविध कार्यात झाला आहे.

✒️सौ. भारती दिनेश तिडके
रामनगर गोंदिया
तालुका समन्वयक अग्निपंख फाउंडेशन महाराष्ट्र राज्य.
मो:-8007664039