विद्यार्थ्यांनो मेहनतीने कल्पना अस्तिवात आणून उद्योजगता आत्मसात करा-डॉ. आर.सी. अग्रवाल

70

✒️नागपूर(पुरोगामी न्यूज नेटवर्क)

नागपूर(दि.5नोव्हेंबर):- ​भारतीय कृषि अनुसंधान परिषद, नवी दिल्ली अंतर्गत राबविल्या जाणाऱ्या नाहेप-कास्ट प्रकल्पातंर्गत महाराष्ट्र पशु व मत्स्यविज्ञान विद्यापीठातर्फे “कृषि उद्योजकतेस चालना : आर्थिक विकासाची व्याप्ती आणि संधी” या विषयावर दोन दिवसीय विद्यार्थी परिषद आणि प्रशिक्षणाची सुरुवात नागपूर पशुवैद्यक महाविद्यालय, नागपूर येथे दि. 5 नोव्हेंबर रोजी झाली. देशभरातील १५० पेक्षा अधिक कृषि आणि पशुविज्ञान विद्यापीठातील पदव्युत्तर विद्यार्थी आणि शिक्षक यात सहभागी झाले आहेत.

​परिषदेच्या उद्घाटनाकरीता भाकृअप चे उपनिदेशक डॉ. आर. सी. अग्रवाल हे प्रमुख पाहुणे तसेच ए.एस.आर.बी, नवी दिल्ली चे माजी अध्यक्ष डॉ. सी.डी. मायी, डॉ. पंदेकृवि, अकोला चे कुलगुरु डॉ. शरद गडाख आणि प्रकल्पाच्या राष्ट्रीय समन्वयक डॉ. अनुराधा अग्रवाल हे विशेष अतिथी म्हणुन प्रामुख्याने उपस्थित होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. नितीन पाटील होते.

विद्यापीठाचे संचालक शिक्षण डॉ. शिरीष उपाध्ये, संचालक संशोधन आणि कुलसचिव डॉ. नितीन कुरकुरे आणि नाहेप-कास्ट प्रकल्पाचे मुख्य अन्वेषक डॉ. आर. जे. झेंडे याप्रसंगी व्यासपीठावर उपस्थित होते.

​डॉ. शिरीष उपाध्ये यांनी प्रास्ताविक भाषण केले तसेच विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. नितीन पाटील यांनी विद्यापीठाच्या उपल्ब्धींवर प्रकाश टाकला. डॉ. शरद गडाख यांनी दुग्धव्यवसाय क्षेत्र वाढवण्यासाठी कृषी उद्योजकता आणि पशुसंवर्धनाचे महत्व विषद केले. डॉ. अनुराधा अग्रवाल यांनी नवीन शैक्षणिक धोरणाद्वारे विद्यार्थ्यांमध्ये उद्योजकता रुजवण्यात आणि कृषी आणि संलग्न क्षेत्रांच्या विकासाला आकार देण्यासाठी नाहेप ची भूमिका स्पष्ट केली.

​डॉ. सी. डी. मायी यांनी आपल्या भाषणात भारतीय विद्यार्थ्यांना जागतिक स्तरावर स्पर्धा करण्यासाठी तयार करण्याकरिता थेयरी आधारित पारंपरिक शिक्षणासोबतच प्रशिक्षणाच्या महत्त्वावर भर दिला. त्यांनी कृषी, पशुवैद्यकीय आणि मत्स्यपालनासारख्या क्षेत्रांमध्ये स्टार्ट-अप आणि उद्योजकतेसाठी अमर्याद वाव असल्याचे अधोरेखित केले. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे डॉ. आर.सी. अग्रवाल यांनी उपयुक्त अशी परिषद आणि प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करण्यासाठी पुढाकार घेतल्याबद्दल माफसू चे कौतुक केले. विद्यार्थ्यांनी नौकरीच्या मानसिकतेतून बाहेर पडून मनातील कल्पना प्रत्यक्षात आणण्यासाठी कठोर परिश्रम करून उद्योजकता गुण आत्मसात करण्याची हीच योग्य वेळ आहे, असे मत त्यांनी व्यक्त केले.

​मत्स्य विद्याशाखेचे अधिष्ठाता आणि संचालक विस्तार शिक्षण डॉ. एस. डब्ल्यू. बोंडे, डेअरी तंत्रज्ञान विद्याशाखेचे अधिष्ठाता डॉ. पी. जी. वासनिक, मुंबई पशुवैद्यक महाविद्यालयाच्या सहयोगी अधिष्ठाता डॉ. एस. व्ही. गुळवणे, नागपूर पशुवैद्यक महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. ए. पी. सोमकुवार आणि माफसूचे माजी कुलगुरू डॉ. एस.डी. हरणे यांच्यासह अनेक यशस्वी उद्योजक या सोहळ्याकरिता प्रामुख्याने उपस्थित होते.