✒️रायगड(पुरोगामी संदेश नेटवर्क)

रायगड(दि.29जुलै):-रायगड तालुक्यातील रोहा तालुक्यात भयंकर आणि संतापजनक घटना घडली आहे. अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्यानंतर तिची हत्या करण्यात आली. तिचा मृतदेह विवस्त्र अवस्थेत दरीत सापडला. या प्रकरणी २२ वर्षीय तरुणाला अटक करण्यात आली आहे.

रोहा तालुक्यातील ताम्हणशेत परिसरात ही घटना घडली. तांबडी येथील १४ वर्षीय मुलीवर बलात्कार केल्यानंतर तिची हत्या करण्यात आली. पोलिसांनी आरोपीच्या मुसक्या आवळल्या आहेत. पोलिसांच्या माहितीनुसार, मुलगी रविवारी संध्याकाळी ताम्हणशेत परिसरात शेतावर दुचाकीवरून निघाली होती. त्याचवेळी आरोपीनं तिच्याकडे लिफ्ट मागितली. त्यानंतर निर्जनस्थळी नेऊन तिच्यावर बलात्कार केला आणि त्यानंतर तिची हत्या केली.

शेतावर दुचाकीवरून जायला निघालेली मुलगी रात्र झाली तरी घरी आली नाही. त्यामुळे कुटुंबीयांना काळजी वाटू लागली. तिचे कुटुंबीय आणि शेजाऱ्यांनी तिचा शोध घेण्यास सुरुवात केली. त्याचवेळी ताम्हणशेत (बु.) परिसरात रस्त्याच्या कडेला दुचाकी आढळून आली. मात्र, मुलगी दिसली नाही. आजूबाजूच्या परिसरात शोध घेतला असता, दरीत तिचा विवस्त्र अवस्थेत मृतदेह आढळून आला. या घटनेनंतर गावात आणि परिसरातील नागरिकांनी संताप व्यक्त केला. या घटनेची माहिती पोलिसांना मिळताच, ते घटनास्थळी पोहोचले. सोमवारी पोलिसांनी एका तरुणाला संशयावरून ताब्यात घेतले.

आरोपीनं मुलीकडे लिफ्ट मागितली. त्यानंतर तिला निर्जन ठिकाणी नेलं. तिथं तिच्या डोक्यात दगड घातला. त्यानंतर तिच्यावर बलात्कार केला, असं प्राथमिक चौकशीत समोर आल्याचं पोलिसांनी सांगितलं. या प्रकरणी आरोपीविरोधात बलात्कार आणि हत्येचा गुन्हा दाखल केला आहे. तसंच पॉस्को अंतर्गतही गुन्ह्याची नोंद केली आहे. आरोपीला न्यायालयात हजर केले असता, पोलीस कोठडी सुनावली आहे. दरम्यान, या घटनेनंतर जिल्ह्यातील राष्ट्रवादी आणि भाजपच्या नेत्यांनी पीडितेच्या घरी जाऊन कुटुंबीयांचे सांत्वन केले.

क्राईम खबर , महाराष्ट्र, मुंबई, राज्य, सामाजिक 

©️ALL RIGHT RESERVED