नागरी आणि धम्मलिपीला जोडणारा भारतातील पहिला ग्रंथ : आमदार हितेंद्रजी ठाकूर

43

 

 

मुंबई (प्रतिनिधी) : भारतातील सर्वच आणि भारताबाहेरील अनेक लिप्यांची जननी असलेली सम्राट अशोक कालीन धम्मलिपीच्या संवर्धनासाठी आणि प्रचाराप्रसारासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर लिखित मुक्ती कोन पथे? या मराठी भाषणाचा अनमोल ठेवा सम्राट अशोक कालीन धम्मलिपीमध्ये महराष्ट्रातील अभ्यासकांनी लिप्यांतरीत केला आहे. माझ्या माहितीतील सम्राट अशोक कालीन धम्मलिपीमध्ये लिप्यांतरीत करून प्रकाशित झालेला हा पहिला ग्रंथ आहे असे प्रतिपादन वसईचे आमदार हितेंद्रजी ठाकूर यांनी केले. ते भगवा पब्लिकेशन व निर्मिती प्रकाशन प्रकाशित, छाया पाटील संपादित डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे मुक्ती कोन पथे? या सम्राट अशोक कालीन धम्मलिपीमध्ये लिप्यांतरीत ग्रंथ प्रकाशन प्रसंगी बोलत होते.
नालासोपाऱ्याचे आमदार क्षितीजजी ठाकूर म्हणाले, ह्याच लिपीतून सर्व भारतीय लिप्या आणि काही परदेशी लिप्या उदय पावल्या आहेत. याचा अर्थ सर्व भारतीय लिप्यांची जननी ही सम्राट अशोक कालीन धम्मलिपी आहे हे आता अभ्यासकांनी सिद्ध झाले आहे.
बहुजन विकास आघाडीचे सचिव आजीव पाटील म्हणाले, धम्मलिपीच्या प्रचाराप्रसारासाठी हा ग्रंथ एक मैलाचा दगड ठरणार आहे. या लिप्यांतरीत ग्रंथाच्या 20,000 प्रती महाराष्ट्रातील महाविद्यालयामध्ये विद्यार्थ्यांच्या अभ्यासासाठी मोफत वाटल्या जाणार आहेत.
विवा महाविद्यालय, विरार येथे आयोजित कार्यक्रमात संपादिका छाया पाटील यांनी दोन्ही आमदार महोदयांचे आणि निर्मिती प्रकाशनाचे या ग्रंथाच्या निर्मितीमध्ये मोलाचे सहकार्य असल्याचे सांगितले.
यावेळी दिग्दर्शक महेश्वर तेटांबे म्हणाले, मानवाच्या विकासामध्ये भाषा आणि लिपीच्या अतिशय महत्वाचा वाटा आहे.
यावेळी पंकजजी ठाकूर, मुकेशजी सावे, कौतुक मुळे, अमित वैद्य, हेमंत पवार, संजय महाडिक तसेच लिप्यांतरकार भारत रामटेके, लता गायकवाड, राजेंद्र वन्ने, विनायक पाटील आणि इतर मान्यवर उपस्थित होते.
कार्यकामाचे स्वागत प्रा. डॉ. शोभा चाळके तर प्रास्ताविक अनिल म्हमाने यांनी केले. अमर पारखे यांनी आभार मानले.