

” माझ्या आईचं अमृतपर्व ”
“आईचं हृदय ।
पर्वत प्रेमाचा ॥
गंध चंदनाचा ।
कुटुंबाला ॥ ”
आज आईच पंचाहत्तरीत पदार्पण होत आहे.जशी आपण गणपती बाप्पाची आरती करतो, प्रत्येक घरात मूर्ती वेगळी असते, पण स्तुती सारखीच,शब्द सारखेच,त्या आरतीत भावना सारख्याच तसेच माझी आई असो वा तुमची आरती एकच,भावना सारख्याच,शब्द निराळे असू शकतील कदाचित माझ्या आईच्या पंचाहत्तरित पदार्पण करताना तिचा गौरव करताना इतर मातेच्या अनादर करायचा वा माझीच आई उत्तम असा माझा अट्टाहास अजिबात नाही.एका आईच वंदन म्हणजे सर्व आईंच वंदन.
माझी आई सोबत ओळख ४८ वर्षांपूर्वी झाली.ह्या मुद्द्यावर माझे आणि तिचे अति-गंभीर मतभेद अजूनही आहेत की ती माझ्या आयुष्यात आली की मी तिच्या आयुष्यात आलो? तिच्या मुळे मला बाळ-पण लाभले की माझ्या येण्यामुळे तिला आईचे पद मिळाले,असो. तिच्या शंभरी पर्यंत हा वाद आम्ही आपसात संपवू.
पहिल्या गुरूंचा ।
मातोश्रीला मान ॥
करावा सन्मान ।
कर्तव्याचा ॥”
आई माझी पहिली मित्र, पहिली शिक्षक.आमचं एक छोटंस विद्यापीठ आणि ती त्याची कुलपती.वर्ग भरायचे स्वयंपाक खोलीत.शैक्षणिक वर्ष सुरू झालं गुडीपाडव्याला.पहिला धडा होता पातेल्याला कापड बांधून चक्का घोटून श्रीखंड बनवणे.मी नकार दिला.आपण बाकी लोकांसारखं पुरणाचे यंत्र वापरू.लवकर होईल.काय फरक पडतो ? माझा युक्तिवाद.तुला करायचं असेल तर नीट कर नाही तर नको करू.मी करते – तिच उत्तर.मी रागानेच , पण केलं एकदाचं कापडातलं घोटलेलं श्रीखंड.साखरीचे दाणे रुतून बोटांना बारीक जखम पण झाली.आईने पूर्ण दुर्लक्ष केलं.
जेवताना मात्रं ते मखमली श्रीखंड पोट भरून खाल्ल.मला वाट्या चाटून पुसून श्रीखंड संपवू दिलं आणि हात धुतल्यावर आईचा एक छोटा प्रश्न-मज्जा आली ? बघ थोडी मेहनत लागली,वेदना झाल्या पण मज्जा आली ना? जे करायचं ते नीट करायचं नाही तर नाही करायचं. वेदना होणारच *.वेदनांची परवा* *करणारे अमृत चाखू* *शकत नाही* . माझा पहिला धडा आणि आयुष्यभर माझ्या व्यक्तिगत,व्याव्यसायिक वा आर्थिक यशाची गुरुकिल्ली,असे स्वयंपाक खोलीत अनेक वर्ग, अनेक विषय,अनेक धडे झालेत. दिवाळीचे लाडू नीट गोल करणे असो,पोहे बनवण्यासाठी कांदे लांबच का कापले पाहिजे असो, की चौकोन ऐवजी वांगे लांब कापल्याने चव कशी वेगळी आणि उत्कृष्ट होते ह्याचे संकल्पित पण मुद्देसूद प्रात्याक्षिक असो,धडा मात्र एकच “जे
करायचं ते नीट करायचं नाही तर नाही करायचं “.
ह्याच वर्गात सामाजिक धडे सुद्धा शिकवण्यात आलेत. स्त्रियांचा मासिक धर्म हा विटाळ व विकार नसून कुठल्याही मादी च्या शरीराचा एक जैविक प्रकिया आहे,उत्पत्तीचा आधार आहे. हा धडा आम्हाला स्वयंपाक खोलीत भरणाऱ्या वर्गातून तिनेच दिला. जर गाय तिच्या मासिक धर्मात असताना मंदिरात जावू शकते आणि तरीही ती देवाची प्रियच राहते तर स्त्रीनेच देवाचं काय घोड मारल?
मुलींना घरी लवकर
येण्याची बंधने घालण्यापेक्षा मुलांना संस्कार दिले पाहिजे, म्हणजे मुली आपोआपच सुरक्षित होतील हा धडा मी बालवयातच घेतला.मुलीनी शिकलं पाहिजे. परंतु जर गरज पडली तरच संसाराला हातभार तिने लावायला हवा.ह्या समजूतीला तिचा ठाम विरोध.गरज पडल्यानंतर नाही तर पहिल्या दिवसापासूनच स्त्रीने आपल्या पायावर उभ राहिलं पाहिजे.सक्षम स्त्री घराचाच नाही तर संपूर्ण राष्ट्राचा उद्धार करू शकते हे विचार अगणित वेळा माझ्या सुप्त मनावर बिंबले, आईनेच!! यासाठी माता
सावित्रीबाई फुले यांच्या
जीवनातील अशी अनेक उदाहरणं मला आई सांगत असे .
अमरावतीत सारख्या छोट्या शहरात राहून १९९६ साली मी परदेशात का जावं आणि परदेशातील उच्च शिक्षण माझं कसा उद्धार करू शकत.आर्थिक आणि बौध्दिक- हा दासबोध सुद्धा माझ्या पदरी आईनेच घातला. दूरदर्शी माझी आईच ती.
प्रामाणिकपणा हे सर्वोत्तम शास्त्र आहे आणि साधेपणा हे सर्वोत्तम धोरण, हा एक माझा आयुष्य सुखर करण्यास कारणीभूत असलेला आईने दिलेला अजून एक सर्वोत्तम धडा. अनेक व्यवसाय केले,अनेक अडचणी आल्या,धडपडलो, आपटलो,पुन्हा उठलो,पुन्हा उभा राहिलो.प्रत्येक वेळेस अधिक सक्षम होवून परत आलो.अजून पडेल कदाचित पण पुन्हा परत येईल.पाठीशी अनुभवाची शिदोरी आणि डोक्यावर आईच्या विद्यापीठातून मिळालेला गुरुमंत्र *” जे करायचं ते नीट करायचं नाही* *तर नाही करायचं.”*
आज मी यशस्वी आहे. समाधानी आहे.आयुष्यात अडचणी आल्या की,आप्तेष्ट गीता वाच,हे ग्रंथ वाच,तो उपदेश घे,अशी बरीच सल्ले देतात.मी कधी फुले -शाहू – आंबेडकर वाचले नाहीत.गीता पण नाही वाचली.हे सगळ्यात? प्रामाणिकपणे काम करा,कोणाचं वाईट नका करू,जे करायचं ते नीट करा… हे सांगणारी जिवंत साक्षात गीताई माझ्या आयुष्यात असताना मला बाकीची कधी गरजच भासली नाही.
आईच्या विद्यापीठात
रिक्षावाला,अटेंडेंट,भाजीवाला, पोळ्या करणारी ई.अशी पद नव्हतीच.आजही नाही आहे. मी जेमतेम एक वर्षाचा असेल,मला दिवसभर रिक्षात घेवून संभाळणारा रेहमान चाचा होता तर शाळेत नेणारा इंगळे दादा, लता दीदी,अशी अनेक नाती बनवावी आणि टिकवावी.मामा तर माझ्या फ़ोन मध्ये इतके आहेत की विचारू नका.आजही कोठल्याही बसस्थानकावर उभा असताना कोण भेटेल आणि तुझ्या आई मुळे,मडघे मॅडम मुळेच मी घडलो अशी ग्वाही देणारी आगंतुक मंडळी कधी समोर येतील सांगता येत नाही.
राणी लक्ष्मीबाई तुम्ही पुस्तकात इतिहासात वाचली? मी प्रत्यक्षात घरात अनुभवली,ते पण रोज!! कँसर सारख्या आजारासोबत यशस्वी लढा असो की स्त्रियांच्या अधिकारासाठी सामाजिक चळवळी असो,लढा हा निर्धाराचाच.आज आईचं पंचाहत्तरित पदार्पण होत आहे आणि आजच तिच्या पोटचा गोळा,निशुचा तेरावा दिवस आहे. परंतु आजही ती तितक्याच ताकतिनीशी उभी आहे.निशूचे अपूर्ण स्वप्नं पूर्ण करायचे असतील का तिला? एवढी ऊर्जा ह्या वयात कदाचित त्या स्वप्नपूर्तीच्या प्रयसातून प्राप्त करत असेल ती.
महात्मा फुले,सावित्रीबाई फुले,शाहू महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या
विचारांचा आणि साहित्याचा तिचा दांडगा अभ्यास हा उपेक्षितापर्यंत पोहोचलाच पाहिजे .
या कार्यात आईचं लक्षणीय
योगदान घडो हीच माझी
या अमृतमहोत्सवी
*हार्दिक शुभेच्छा ॥*
हे सर्व कार्य करण्यासाठी
उदंड आयुष्य लाभो ही
*मनस्वी सदिच्छा!*
– श्रीकांत अशोकराव मडघे
एल.आय.सी कॉलनी ,
मोती नगर ,अमरावती.
मो.नं. : -९९२२९२४२१६