

अनिल साळवे, विशेष प्रतिनिधी
गंगाखेड (प्रतिनिधी) :-
मतदारसंघातील तिन्ही तालुक्यात विकास कामांचा समतोल निर्माण करून शेकडो कामे मार्गी लावली आहेत. वर्षानुवर्षे रखडलेले प्रश्न सुटले आहेत. केंद्र आणि राज्य सरकारकडे वेळोवेळी पाठपुरावा केल्यामुळे भरघोस निधी आणला आहे. त्यातून लोकहिताची कामे झाली आहेत. आपल्या मतदारसंघात जवळपास ६ हजार कोटींचा निधी आला आहे. तरीही कुणी माझ्यावर प्रश्नचिन्ह उभे करीत असेल तर, कोट्यावधींचे आकडेचं माझ्या विकास कामांचे साक्षीदार आहेत, अशा शब्दात गंगाखेड विधानसभेचे आ.डॉ.रत्नाकर गुट्टे यांनी शाब्दिक फटाके वाजवले.
महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान अभियान अंतर्गत गंगाखेड शहरातील ७१ रस्ते कामांसाठी शासनाने तब्बल १३५ कोटी ३५ लाख रूपये निधी मंजूर केला आहे. जायकवाडी परिसर येथे त्या कामांचे एकत्रित भूमिपूजन आ.डॉ.गुट्टे यांच्या शुभहस्ते संपन्न झाले. त्यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमास नागरिकांनी लक्षणीय गर्दी केली होती. यश कन्स्ट्रक्शन, लातूर यांनी कार्यक्रमाचे आयोजन केले होते.
पुढे बोलताना आ.डॉ.गुट्टे म्हणाले की, शहरातील अंतर्गत रस्त्यांची अवस्था पाहून नवीन रस्ते निर्मितीस भरघोस निधी उपलब्ध करून द्यावा, या मागणीसाठी मी राज्य शासनाकडे वेळोवेळी पाठपुरावा केला होता. त्यामुळे माझ्या मागणी व पाठपुराव्याची राज्य सरकारने सहानुभूतीपूर्वक दखल घेतली आहे. परिणामी, महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान अभियान अंतर्गत शहरातील सर्वच म्हणजे ७१ रस्ते कामांसाठी अंतिम मंजुरीसह तब्बल १३५ कोटी ३५ लाख रूपये निधी दिला आहे.
शहरातील अनेक समस्या व अडचणी सोडविण्यात मला यश आले आहे. येत्या फेब्रुवारी अखेर अमृत टू योजनेतून सुरळीत पाणीपुरवठा होईल. संत जनाबाई मंदिराचा सुध्दा लवकरच कायापालट होईल. तेथेही भव्य भक्त निवास बांधकाम केले जाणार आहे. तसेच आपल्या इतरही मागण्यांसाठी मी सकारात्मक पावले उचलत आहे. म्हणून जनतेचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी मी प्रामाणिक प्रयत्न करीत आहे, याचे लोकप्रतिनिधी म्हणून मला समाधान वाटते. यापुढेही शहरातील विकासकामे करण्यासाठी मी कटीबध्द आहे, असेही आ.डॉ.रत्नाकर गुट्टे म्हणाले.
रस्ते विकासाचा पाया असतात. त्यामुळे रस्ते सुधारणा झाल्यास इतरही क्षेत्राचा झपाट्याने विकास होत असतो. म्हणून गावखेड्यांसह शहरी भागात उत्तम दर्जाचे रस्ते निर्माण केल्यास दळणवळण सुखकर होते. आपल्या मतदारसंघाच्या ग्रामीण भागात सुध्दा मजबूत रस्त्यांचे जाळे आणि विविध मुलभूत सुविधांची कामे पूर्णत्वास जात आहे. अनेक नव्या कामांना चालना मिळाली आहे. ही सर्व गुणवत्तापूर्ण असावीत, याकडे मी वैयक्तीक लक्ष देत आहे. इतरही आवश्यक विकासकामांना निधीची कमतरता पडू देणार नाही, अशीही ग्वाही आ.डॉ.गुट्टे यांनी दिली.
याप्रसंगी बोलताना मित्र मंडळाचे जिल्हाध्यक्ष प्रल्हादराव मुरकुटे म्हणाले की, विकासाची हि घौडदौड पाहून आम्ही गुट्टे समर्थक असल्याचा अभिमान वाटतो. ग्रामीण व शहरी भागात गुट्टे साहेब कमालीच्या वेगाने काम करीत आहेत.
याप्रसंगी बोलताना रासपचे जिल्हाध्यक्ष ॲड.संदीप आळनुरे म्हणाले की, सर्व समाज घटकांना एकत्र घेवून पुढे जाण्याची भूमिका गुट्टे साहेब यांची नेहमी असते. त्यामुळे त्यांना मोठा जनाधार आहे. म्हणून त्यांनी मराठा व धनगर आरक्षणास पाठींबा देवून पुढाकार घेतला आहे. त्यांच्या सारखे नेतृत्व या भागाला मिळणे, हि भाग्याची गोष्ट आहे.
अध्यक्षीय समारोपात माजी जिल्हा परिषद सदस्य किशनराव भोसले म्हणाले की, भूमिपूजन सोहळे घेणे सोपे असते. मात्र, त्यासाठी निधी उपलब्ध करताना संयमांची परीक्षा घेतली जाते. वारंवार पत्र, निवेदने, स्मरणपत्रे व प्रत्यक्ष भेटून विनंत्या कराव्या लागतात. ती धमक आ.डॉ.गुट्टे यांच्यात आहे. म्हणून त्यांच्या कष्टाचं सहकारी या नात्याने आम्हाला कौतुक आहे. दगडाला देवपण उगीच येत नाही. तर त्यासाठी आधी झिजावं लागलं. गाडून घ्यावं लागतं. हे आ.डॉ.गुट्टे यांनी वेळोवेळी दाखवून दिले आहे.
अतिशय उत्साहात आणि भव्यदिव्य स्वरूपात संपन्न झालेल्या या कार्यक्रमाचे अध्यक्ष माजी जिल्हा परिषद सदस्य किशनराव भोसले यांच्यासह उपविभागीय अधिकारी जीवराज डापकर, मुख्याधिकारी जयवंत सोनवणे, शहर अभियंता रमेश वाघमारे, मित्र मंडळाचे जिल्हाध्यक्ष प्रल्हादराव मुरकुटे, रासपचे जिल्हाध्यक्ष ॲड.संदीप आळनुरे, कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती साहेबराव भोसले, उपसभापती संभाजीराव पोले, संचालक संभुदेव मुंढे, प्रशांत काबरा, प्रमोद धुळे, सुशांत चौधरी, मारूतराव साळवे, माणिक आळसे, माजी नगरसेवक शहराध्यक्ष ॲड.सय्यद अकबर, सत्यपाल साळवे, ॲड.शेख कलीम, दिपक तापडीया, गोविंद यादव, नागनाथ कासले, राजेश दामा, प्रविण काबरा, गोविंदभाई ओझा, राजू पटेल, ॲड.मोहन सानप, रामराजे फड, माजी उपनगराध्यक्ष राधाकिशन शिंदे, प्रभारी हनुमंत मुंढे, तालुकाध्यक्ष रामप्रसाद सातपुते, रासपा शहराध्यक्ष धनंजय भेंडेकर, जेष्ठ व्यापारी सुभाष काका नळदकर, अनिल यानपल्लेवार, सचिन महाजन, मातोश्री दगडूबाई गुट्टे प्रतिष्ठानचे सचिव ॲड.मिलिंद क्षिरसागर, व्यापारी शहराध्यक्ष सचिन नाव्हेकर, विधानसभा अल्पसंख्याक अध्यक्ष एकबाल चाऊस, उद्धव चोरघडे, सुदाम वाघमारे, मोहन सानप, रामराजे फड, सतिश भाऊ घोबाळे, राजू खान, इन्तेसार सिद्दीकी, सुमित कामत, प्रताप मुंढे, उध्दव शिंदे, शेख साबेर, सचिन जाधव, सय्यद चॉंद भाई, शेख खालेद, वैजनाथ टोले तसेच पत्रकार, नागरिक, महिला, युवक, पदधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते
आकडेवारीचा वाचला पाढा…
कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून बोलताना आ.डॉ.गुट्टे यांनी गेल्या चार वर्षातील कामगिरीचा आकडेवारीसह आलेख मांडला. तसेच महत्त्वाच्या कामांची यादीही वाचली. त्यानुसार गंगाखेड ३ हजार १३१ कोटी, पालम ९२९ कोटी ३३ लाख आणि पूर्णा १ हजार ५६२ कोटी ४ लाख रूपये निधीच्या आकडेवारीचा पाढाच आ.डॉ.गुट्टे यांनी जाहीरपणे वाचून दाखविला.
कौतुकाचा वर्षाव, तरीही शांत व संयमी…
कार्यक्रमाचे औचित्य साधून अनेक वक्त्यांनी आपली मनोगते मांडताना आ.डॉ.गुट्टे यांच्या कामगिरीचे तोंड भरून कौतुक करताना गौरवोद्गार काढले. माजी नगरसेवक गोविंद यादव यांनी आ.डॉ.गुट्टेंना ‘बुलेट ट्रेन’ तर सभापती साहेबराव भोसले यांनी ‘विकासरत्न’ हि उपमा दिली. तसेच शहराध्यक्ष ॲड.सय्यद अकबर यांनी ‘गंगाखेडचा सह्याद्री’ असे म्हटले. पुढे सुभाष नळदकर, इंतेसार सिद्दीकी, खालेद शेख यांनी शेरो-शायरी मधून कौतुकाचा वर्षाव केला.
मी तितका मजबूत होईन
विकासकामात मी कधीच राजकारण केले नाही. विकास हाचं माझा अजेंडा आहे. म्हणून माझ्या सोबत माय-बाप जनता आहे. त्यांच्या साथीने मी कोणत्याही संकटाला भिडायला तयार आहे. मात्र, काही लोक वारंवार अफवा पसरवत आहेत. त्यामुळे इथून पुढे सहन करणार नाही. लोकशाही पध्दतीने तुम्ही लढा. माझ्या विरोधात एकत्र या. पण, विकास कामात खोडा घालू नका. तुम्ही जितके माझ्या विरोधात एक व्हाल, तितकाच मी अधिक मजबूत होत जाईन, अशीही इशारावजा तंबी आ.डॉ.गुट्टे यांनी विरोधकांना दिली आहे.