रोजगार देणारे हात निर्माण करण्‍याचा संकल्‍प–आ. सुधीर मुनगंटीवार

65

🔸पोंभुर्णा येथे अगरबत्‍ती प्रकल्‍पाचा उदघाटन सोहळा संपन्‍न

✒️नितीन रामटेके(गोंडपीपरी,विशेष प्रतिनिधी)मो:-8698648634

गोंडपीपरी(दि.29जुलै):-पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी यांनी आत्‍मनिर्भर भारताची संकल्‍पना देशवासियांसमोर मांडताना रोजगार मागणारे नको तर रोजगार तयार करणारे हात निर्माण व्‍हावे अशी अपेक्षा व्‍यक्‍त केली आहे. त्‍यांची ही अपेक्षा या परिसरात आम्‍ही निश्‍चीतपणे पूर्ण करू. आपण चीन मधून, व्‍हीएतनाम मधून अगरबत्‍ती मागवायचो. आता आपल्‍या पोंभुर्णा शहरातच आपण अगरबत्‍तीचे उत्‍पादन करीत आहोत. पंतप्रधानांच्‍या आत्‍मनिर्भर भारताची संकल्‍पना ख-या अर्थाने आपण आपल्‍या भागातच राबवित आहोत. या उपक्रमाला सहकार्य करणा-या आयटीसी कंपनीचे मी आभार व्‍यक्‍त करेन, कारण त्‍यांनी या आदिवासीबहुल भागात उभारण्‍यात आलेल्‍या या उद्योगाला मदत केली. आता आपल्‍या दैवतांच्‍या चरणी आपल्‍या भागात उत्‍पादीत होणारी अगरबत्‍ती आपण अर्पण करू, असे प्रतिपादन आ. सुधीर मुनगंटीवार यांनी केले.
 
दिनांक 28 जुलै रोजी पोंभुर्णा येथे अगरबत्‍ती प्रकल्‍पाच्‍या उदघाटन सोहळयात आ. सुधीर मुनगंटीवार बोलत होते. यावेळी पोंभुर्णा पंचायत समितीच्‍या सभापती अलका आत्राम, भाजपाचे तालुकाध्‍यक्ष गजानन गोरंटीवार, पोंभुर्णा नगर पंचायतीच्‍या अध्‍यक्षा श्‍वेता वनकर, उपाध्‍यक्षा रजिया कुरेशी आदींची प्रामुख्‍याने उपस्थिती होती. चांदा ते बांदा या योजनेअंतर्गत प्राप्‍त निधीतुन हा अगरबत्‍ती प्रकल्‍प कार्यान्‍वीत झाला असून आयटीसी या नामवंत कंपनीच्‍या मंगलदीप अगरबत्‍ती ब्रँड चे उत्‍पादन येथे घेण्‍यात येत आहे. यावेळी बोलताना आ. मुनगंटीवार पुढे म्‍हणाले, पोंभुर्णा तालुक्‍यात टूथपिक उद्योग, कारपेट उद्योग आम्‍ही सुरू केले. आदिवासी महिलांची राज्‍यातील पहिली कुक्‍कुटपालन सहकारी संस्‍था आम्‍ही पोंभुर्णा येथे सुरू केली. बांबु हॅन्‍डीक्रॉफ्ट अॅन्‍ड आर्ट युनिटच्‍या माध्‍यमातुन रोजगाराच्‍या संधी उपलब्‍ध करण्‍यात आल्‍या आहेत. टाटा ट्रस्‍टच्‍या सहाय्याने भाजीपाला क्‍लस्‍टर सुरू आहे. पोंभुर्णा हा आदिवासीबहुल तालुका आज विकासाच्‍या मार्गावर अग्रेसर आहे. 21 फेब्रुवारी 2019 रोजी हा प्रकल्‍प भाडयाच्‍या इमारतीत कार्यान्‍वीत करण्‍यात आला होता. त्‍यात 25 मशीन तात्‍पुरत्‍या बसवून उत्‍पादन सुरू करण्‍यात आले होते. या प्रकल्‍पातुन निर्माण होणा-या अगरबत्‍तीचे उत्‍पादन खरेदी करण्‍याची जबाबदारी आयटीसी कंपनीने घ्‍यावी यासाठी मी त्‍यांच्‍याशी चर्चा केली होती. त्‍यांनी सकारात्‍मक प्रतिसाद दिला याकरिता मी त्‍यांचा मनःपूर्वक आभारी आहे. पंतप्रधानांनी मांडलेली आत्‍मनिर्भर भारताची संकल्‍पना या परिसरात ख-या अर्थाने साकार करण्‍यासाठी आपण प्रयत्‍नशील आहोत व राहू, अशी ग्‍वाही त्‍यांनी यावेळी बोलताना दिली.
 
कार्यक्रमाचे प्रास्‍ताविक बांबु संशोधन व प्रशिक्षण केंद्राचे संचालक राहूल पाटील यांनी केले. या प्रकल्पाच्या प्रशस्त शेड वजा इमारतीत एकूण ७५ स्वयंचलित मशीनद्वारे कच्ची अगरबत्ती उत्पादित केली जाणार आहे. तसेच बसविण्यात आलेल्या आधुनिक संयंत्राद्वारे सेटिंग, पॅकेजिंग ही पुढील प्रक्रिया पार पाडली जाणार आहे. दरमहा ७५ मेट्रिक टन अगरबत्तीचे उत्पादन घेता येणे शक्य होणार आहे. यातून सुमारे २०० स्त्री तसेच पुरुषांना प्रकल्पात रोजगार उपलब्ध होण्याची शक्यता आहे. हा अगरबत्ती प्रकल्प साकारण्यासाठी मध्य चांदा वनविभागाने अनुसूचित जमाती व इतर पारंपारिक वननिवासी (वनहक्क मान्य करणे) अधिनियम २००६ नियम २००८ व सुधारित नियम २०१२ चे कलम ३ पोटकलम २ अंतर्गत वनजमीन मागणीचा प्रस्ताव मंजूर केला आणि चंद्रपूर जिल्हा प्रशासनाने योजना मंजुरी व निधी देण्यासंबंधात सहकार्य केले. त्यामुळे प्रकल्पाचे काम अल्पावधीत पूर्ण करता आले. हा प्रकल्‍प आ. सुधीर मुनगंटीवार यांची मुळ संकल्‍पना आहे. त्‍यांचे स्‍वप्‍न असलेला हा प्रकल्‍प आज प्रत्‍यक्षात साकार झाला याचा मनापासून आनंद असल्‍याची भावना प्रास्‍ताविकादरम्‍यान राहूल पाटील यांनी व्‍यक्‍त केली.