भारतरत्न मागणी मागचा धूर्त कावा!

63

 

 

‘भारतरत्न’ हा सर्वोच्च नागरी पुरस्कार मानला जातो.असे असले तरी आजपर्यंतच्या हा सन्मान प्राप्त मानक-यांच्या यादीवर तुलनात्मक दृष्टीने नजर टाकली असता त्यातील काही नावं पाहून खरोखरच इतर महनीय रत्नांचा एक प्रकारे अवमान झाल्याची भावना मनात सतत घोळत राहते.

मागे काही महिन्यांपूर्वी पुणे महानगरपालिकेने एका ठरावा द्वारे देशातील महिला शिक्षणाचे प्रणेते क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिराव फुले आणि ज्ञानज्योती सावित्रीमाई फुले या समाज सुधारक दांपत्याला ‘भारतरत्न’ देण्याची शिफारस राज्य सरकारकडे पाठविण्याचे आयोजन केल्याचे वृत्त वाचण्यात आले होते. त्या गोष्टीला बराच काळ लोटला आहे.पुढे त्याचे काय झाले हे काहीच बाहेर पडले नाही. अकरा एप्रिल, चौदा एप्रिल, सव्हीस जून,आठ्ठावीस नोव्हेंबर जवळ आली की, खास करून त्यानिमित्ताने प्रसिद्धी मिळविण्याची संधी तथाकथित राजकीय नेते विशेषतः त्या महापुरुषांच्या तत्वप्रणाली नुसार वागत नसले तरी त्यांच्या नावातील ताकद ओळखून सतत ‘फुले-शाहू-आंबेडकरांच्या नावाचा जप करणारे नेते सोडत नाहीत.

वास्तविक फुले दांपत्याला भारतरत्न देण्याच्या मागणीचे वृत्त वाचून बहुजनांना काहीतरी विशेष वाटायचे किंवा आनंद व्यक्त करायचे काही एक कारण नाही. राजकारणातील सोय पाहून आणि त्यानुसार कामकाजातील प्रथेनुसार हा विनंती ठराव आता राज्य व केंद्र सरकारकडे पाठविला जाईल अथवा पाठविला गेला ही असेल.त्याबाबत पुढे काय झाले ते कळायला मार्ग नाही. असो !

केंद्रातील सत्ताधाऱ्यांची मानसिकता आणि कामाची पद्धत पाहता केंद्राला ही एक चालून आलेली संधी समजून योग्य वेळी याचा आपल्या मतलबी राजकारणासाठी कसा उपयोग करून घेता येईल याची योजना तयार केली जाईल याची आम्हाला कल्पना होतीच आणि त्यानुसार भारतीय जनता पार्टी पुणे शहर ओबीसी मोर्चाचे अध्यक्ष योगेश पिंगळे यांनी प्रधान मंत्री नरेंद्र मोदी यांना भेटून फुले दांपत्याला भारतरत्न देण्याची मागणी करणार आहोत असे म्हणाल्याची बातमी देखील वाचली. ब-याच वेळा आम्हाला ‘कु-हाडीचा दांडा गोत्यास काळ’ ही म्हण कशी आणि का तयार झाली असावी याचे गूढच उकलत नाही.NEET मध्ये २७ टक्के जागा ओबीसींना २००७ पासून मिळत होत्या. त्या २०१७ मध्ये केंद्रात भाजपची सत्ता आल्यानंतर त्यांनी काढून घेतल्या. पण नंतर उत्तर प्रदेश मध्ये येऊ घातलेल्या राजकीय मरणाची चाहूल लागल्यामुळे आणि न्यायालयाच्या दणक्यामुळं त्या पुन्हा परत द्याव्या लागल्या, ही वस्तुस्थिती तर आहेच पण सरकारच्या चुकीच्या निर्णयांना ती एक जबरदस्त चपराकच होती.पण नाक कापलं तरी भोक आहे अशी शेखी मिरवणारे अंधभक्त हे जाहीर केल्यानंतर ‘मोदी सरकारका ऐतिहासिक फैसला’ असा नाच करत असतील तर त्यांच्या इतके स्वाभिमान शून्य दुसरे असूच शकत नाहीत. इतरांचे एक वेळ राहू द्या. राष्ट्रीय ओबीसी महासंघासारख्या संघटनेनं मोदींचे फोटो छापून त्यांचं आभार मानायचे या प्रकाराला काय म्हणावे ते वाचकांनीच ठरवायचे आहे.
ओबीसींच्या राजकीय आरक्षणावर गदा आणल्यानंतर ओबीसींच्या नेत्यांकडूनच सारवासारव करण्याचा, त्यांना चुचकारण्याचा प्रयत्न म्हणजेच भाजपा ओबीसी मोर्चा कडून “भारतरत्न” पुरस्काराची मागणी करणे होय. विशेष म्हणजे आम्ही २००५ पासून याबाबत मागणी करत आहोत असे त्यांनी स्वतः सांगितले .हे सांगत असताना या मागणीकडे जर एक तपासून अधिक काळपर्यंत जर ढुंकूनही पाहिले जात नसेल तर आपण आज अजूनही भाजपामध्ये का आहोत याचा विचार ते करताना दिसत नाहीत.

क्रांतीसुर्य महात्मा जोतिबा तात्या आणि ज्ञानज्योती माता सावित्रीमाई यांना “भारतरत्न”द्या अशी मागणी करणे कितपत योग्य आहे हेच त्यांना कळत नाही. बावन्न टक्के संख्या असलेल्या समाजाने साडेतीन टक्के संख्या असलेल्यांकडे ‘वसतिगृहे द्या, ओबीसी मंत्रालय द्या’अशा मागण्या मागाव्यात इतकी सोपी ही मागणी वाटावी का ? “भारतरत्न” द्या ही मुख्य मागणी असू शकते का? असावी का ?
वेळोवेळी अशी मागणी हे लोक कुणाच्या इशाऱ्यावर आणि आदेशानुसार करत असतील हे कळायला डोकं लागत नाही.
अशा गुलामीत आपलं पुढारीपण करणा-या संघटनांच्या नेतृत्वात ओबीसींचा उद्धार होऊ शकेल का ?
संघ प्रणित भाजप हा आरक्षण, ओबीसी आणि बहुजन विरोधी पक्ष आहे. त्यामुळे जो भाजपमध्ये असेल तो ओबीसींचा हितचिंतक असूच शकत नाही किंवा ओबीसींच्या हिताची ज्याला प्रामाणिक तळमळ असेल, तो भाजपामध्ये जाऊच शकत नाही, ही गोष्ट, हे सूत्र कायम लक्षात ठेवायला हवे.

आतापर्यंत, पुणे शहरातील ज्येष्ठ शिक्षणतज्ञ महर्षि धोंडो केशव कर्वे आणि प्रख्यात शास्त्रीय गायक पंडित भीमसेन जोशी यांना भारतरत्न प्राप्त झाला आहे. या दोघांना पुरस्कार देण्याबाबत आमचे काहीही म्हणणे नाही. ‘भारतरत्न’ हा जरी सर्वोच्च नागरी पुरस्कार असला तरी भारतातील तमाम बहुजनांनी फुले दांपत्याला हा पुरस्कार प्रदान करण्याची मागणी करायलाच नको .हे सदसद्विवेकबुद्धी शाबूत असलेल्या सत्ताधारी शासनाने स्वतःहून करायचे परम कर्तव्य आहे. इ.स.१८२७ मध्ये जन्मलेल्या ज्योतिराव फुले यांनी स्त्रियांना शिक्षित करण्याचे प्रयत्न करीत असतानाच अस्पृश्यता आणि जातीयता निर्मूलनासाठीही भरीव कार्य केले.शोषित जातींमधील लोकांना समान हक्क मिळवून देण्यासाठी आणि उत्पीडित वर्गाच्या उन्नतीसाठी जोतिबांच्याच नेतृत्वाखाली ‘सत्यशोधक समाजा’ची स्थापना करण्यात आली. त्यांनी भिडेवाडा येथे १८४८ मध्ये पुण्यातील पहिली मुलींची शाळा देखील सुरू केली. इ.स.१८३१ ला जन्मलेल्या सावित्रीमाई फुले यांनी देखील ज्योतिबांच्या समाजनिर्मितीच्या आणि शिक्षण प्रसाराच्या कार्यात त्यांच्या खांद्याला खांदा लावून देशातील महिला शिक्षणाला चालना दिली. शिक्षणाच्या कार्यासाठी या दोघांनी आपले आयुष्य वाहून घेतले. अठ्ठावीस नोव्हेंबर अठराशे नव्वद मध्ये ज्योतिबांचे निर्वाण झाले. त्यानंतर पुढे पुणे येथे प्लेगच्या महामारीत जनतेची सेवा बजावत असताना सावित्रीमाईंना ही त्याची बाधा होऊन इ.स. अठराशे सत्याण्णव रोजी त्यांचेही निर्वाण झाले.

समाज सुधारक ज्योतीराव फुले आणि सावित्रीमाई फुले यांना भारतरत्न देण्याचा ठराव मंजूर करणारी पुणे महानगरपालिका ही देशातील पहिली नागरी संस्था असली तरी हा पुरस्कार जाहीर करायला महाराष्ट्रासारख्या पुरोगामीत्वाचा डांगोरा पिटणा-या राज्याला सव्वाशे वर्षे लागली ही खरोखरच अत्यंत लाजीरवाणी गोष्ट आहे.

ज्योतिराव फुले आणि सावित्रीमाई फुले यांच्या सामाजिक कार्याशी भारतातील समस्त बहुजन समाजाचा विशेषतः पुण्यातील नागरिकांचा भावनिक संबंध आहे. असे असूनही किती तरी वर्षाआधी त्यागमय वृत्तीने केलेल्या फुले दांपत्याच्या या समाज परिवर्तनीय ऐतिहासिक कार्याला किनार करून इतरांना आधी पुरस्कार दिले गेले हे निश्चितच भूषणावह नाही.आजपर्यंत सर्वोच्च नागरी पुरस्कारांच्या यादीवर जर सूक्ष्म नजर टाकली तर फुले दांपत्यांच्या नखांची सर येणार नाही अशी कितीतरी नावे त्यात आढळतात. व्यवसायाच्या दृष्टिकोनातून करोडो रुपयांची माया गोळा केलेले, केवळ स्वतःचे वैयक्तिक उच्चांक प्रस्थापित करण्यासाठी आपल्या संघ आणि सहका-यांचा बळी देणारे, समाज आणि देशहितासाठी शून्य कामगिरी असलेल्या काल परवा डोळे उघडलेल्यांचा जर फुले दांपत्याच्या आधी पुरस्कारासाठी विचार केला जात असेल आणि असामान्य कर्तृत्व असलेल्या फुले दांपत्यांचा त्यांच्या मृत्यूनंतर सव्वाशे वर्षे आणि स्वातंत्र्योत्तर पाऊणशे वर्षांनी आज आणि तेही राजकीय लाभासाठी मागणी करण्याचा विचार केला जात असेल तर हा तमाम बहुजनांचा घोर अपमान आहे. तसे पाहिले तर,या पुरस्काराने त्या दोघांच्या सन्मान आणि लौकिकात काहीच भर अथवा फरक पडणार नाही. कारण क्रांतीसुर्य ज्योतीबा तात्या, ज्ञानज्योती सावित्रीमाई, राजर्षी शाहू महाराज,डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे कार्य या पुरस्कारांपेक्षा किती तरी अधिक उंचीवरचे आहे ते जगन्मान्य ‘विश्वभूषण’ आहेत. त्यामुळे त्यांची अशा व्यवसायिक लोकांच्या श्रेणीत गणना करायची ही कल्पनाच आम्हा बहुजनांना संतापजनक वाटते. म्हणून तमाम बहुजनांनी फुले दांपत्याला भारतरत्न देण्याची मागणी करुन आपल्या लाचखोरीचे प्रदर्शन करणे टाळले पाहिजे. हीच क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा तात्या फुलेंना मनापासून आदरांजली ठरेल. इतकेच. क्रांतीसूर्याला विनम्र अभिवादन!

 

विठ्ठलराव वठारे
अध्यक्ष
जन लेखक संघ, महाराष्ट्र
joshaba1001@gmail.com