नुकसान झालेल्या पिकांचे तत्काळ पंचनामे करा – आ.डॉ.गुट्टे

54

 

अनिल साळवे,प्रतिनिधी

गंगाखेड (प्रतिनिधी):-
नुकत्याच झालेल्या अवकाळी पावसाने गंगाखेड विधानसभा मतदारसंघाला अक्षरशः झोडपून काढले आहे. परिणामी, अनेक भागात वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस पडला. त्यामुळे खरीप हंगामातील हातातोंडाशी आलेली पिके भुईसपाट झाली. यामध्ये शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे नुकसान झालेल्या पिकांचे तत्काळ पंचनामे करा, असे आदेश स्थानिक आ.डॉ.रत्नाकर गुट्टे यांनी प्रशासनाला दिले आहेत.
गेल्या दोन दिवसांपासून राज्यात अवकाळी पाऊस झाला आहे. त्याचा फटका आपल्या गंगाखेड विधानसभा मतदारसंघाला सुध्दा बसला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे पिक व पशु नुकसान, घरांची गोठ्यांची पडझड झाल्याने
अतोनात नुकसान झाले आहे.
सततच्या नापिकीने आधीच मेटाकुटीस आलेल्या शेतकऱ्यांच्या शेतात सध्या गहू, हरभरा ही रब्बी पिके अंकुरलेली असून अनेक भागात तूर, कापूस पिके काढणीच्या अवस्थेत असताना
अवकाळी पावसाने शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला भास हिरावून गेला आहे. त्यामुळे तत्परतेने पंचनामे करून अहवाल सादर करा, असेही आ.डॉ.गुट्टे यांनी प्रशासकीय अधिकाऱ्यांना म्हटले आहे.
आपल्या मतदारसंघात बेमोसमी पावसाने धिंगाणा घातल्याने शेतीचे प्रचंड नुकसान झाले आहे. प्रचंड वादळी वारे, मुसळधार पाऊस यामुळे भरपूर नुकसान झाले आहे. त्यामुळे शेतीसह घराच्याही नुकसानीचे तात्काळ पंचनामे करून अहवाल तयार करा, असा आदेश उपविभागीय अधिकारी व गंगाखेड, पालम आणि पूर्णा येथील तिन्ही तहसीलदार यांना दिले आहेत. त्यामुळे आपली काही अडचण असल्यास किंवा पंचनामे विषयी काही माहिती द्यायची असल्यास आपल्या तालुका तहसीलदार यांना प्रत्यक्ष भेटावे, असेही आवाहन आ.डॉ.गुट्टे यांनी सोशल माध्यमातून केले आहे.
दरम्यान, आ.डॉ.गुट्टे यांनी सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते यांना आपापल्या गावातील, भागातील शेतकऱ्यांना दिलासा द्या. त्यांचे नुकसान समजून घ्या. त्यांच्या वतीने प्रशासनास बोला, अशा सूचना दिल्या आहेत.
शेतकरी बांधवांनो, धीर धरा! बळीराजाला भावनिक साद
बंधुंनो, नेहमी येणाऱ्या संकटांशी बळीराजा हिमतीने लढत आला आहे. संकटांना चिवटपणे लढा देणे, हा शेतकऱ्यांचा स्थायीभाव आहे. म्हणून हतबल व निराश होऊ नका, आपण मिळून मार्ग काढू. आपणास मदत मिळवून देण्यासाठी मी कटिबद्ध आहे. म्हणून थोडा धीर धरा, अशी भावनिक साद आ.डॉ.गुट्टे यांनी शेतकऱ्यांना घातली आहे.