मोर्शी तालुक्यात अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीच्या पंचनाम्याची चेष्टा ! शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसानाबाबत संबंधित विभाग उदासीन ! अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीची मदत तत्काळ जमा करण्याची मागणी !

166

 

मोर्शी तालुका प्रतिनिधी /
मोर्शी तालुक्यात अवकाळी पाऊस पडल्यानंतर तातडीने या नुकसान झालेल्या पिकाची पाहणी करून पंचनामे करून शेतकऱ्यांना दिलासा देण्याची मागणी होत असताना कृषी विभाग व महसूल विभाग मात्र वेगळ्याच कामात व्यस्त आहे. पाऊस पडून चार दिवस उलटले, तरी शेतकऱ्यांना अवकाळी पावसामुळे झालेल्या भरपाईच्या पंचनाम्याची प्रतीक्षा आहे. शेतकऱ्यांच्या या उदासीन धोरणाबाबत शेतकरी वर्गातून नाराजीचा सूर उमटत आहे.
मोर्शी तालुक्यामध्ये दिनांक २६ नोव्हेंबर ते १ डिसेंबर पर्यंत अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या पिकांच्या पंचनाम्याबाबत महसुल व कृषी विभाग उदासीन असल्याचे
चित्र आहे. परंतु प्रशासन पातळीवर ‘पंचनाम्याची चेष्टा होत असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुका उपाध्यक्ष रुपेश वाळके यांनी केला आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पाठवलेल्या पत्रात म्हंटले
आहे की, सहा दिवसांचा कालावधी उलटून गेला तरी अजून पंचनामे बाकी आहेत. वास्तविक सरसकट नुकसानभरपाई फॉर्म भरून घेणे आवश्यक असताना तोंड बघून पंचनामे दिशाभूल करणारे ठरणार आहेत. त्यात महसूल व कृषी विभागाच्या पातळीवरील निरुत्साही भावना शेतकऱ्यांच्या अडचणी वाढवणारी ठरते आहे. यांचे कर्मचारी कधी संपावर, कधी रजेवर, कधी दुसऱ्या कामात अडकल्यावर पंचनामा होई पर्यंत लोकांनी शेत मशागत करायचं थांबायचं का? अजून अवकाळी पाऊस पडणारा पडण्याची शक्यता बाकी आहे, ते नव्यानं नुकसान वेगळंच होणार असताना आत्ता शेतकऱ्यांच्या शेतातून ओढ्या सारखं पाणी वाहून गेलं, आज रोजी ते पाणी आटून गेलं, मग वास्तव पाहणीत पाणी नाही, अवकाळी पावसामुळे कपाशीच्या वाता झाल्या असून तूर भाजीला, चना गहू यासह संत्रा मोसंबी उत्पादक शेतकऱ्यांचे कधीही भरून न निघणारे नुकसान झाले असताना ते क्षेत्र टाळणे योग्य आहे का ? हे नुकसान ए सी मध्ये बसून काम करणाऱ्या अधिकाऱ्यांना कसं कळणार ? राज्य व जिल्हाधिकारी पातळीवर संबंधित अधिकाऱ्यांना सूचना द्या सरसकट नुकसान भरपाई फॉर्म भरून त्वरित शेतकऱ्यांना नुकसानभरपाई खात्यावर वर्ग करा अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुका अध्यक्ष नरेंद्र जिचकार, महिला राष्ट्रवादी काँग्रेसच्या तालुका अध्यक्ष सौ वृषालिताई वीघे, युवक शहर अध्यक्ष अंकुश घारड, राष्ट्रवादी तालुका उपाध्यक्ष रुपेश वाळके, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक प्रकाश विघे, उमेश गुडधे, वीलास राऊत, रोशन राउत, हितेश उंदरे, पंकज शेळके, यांनी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, कृषी मंत्री धनंजय मुंडे, मदत व पुनर्वसन सचिव यांच्याकडे केली आहे.
मोर्शी तालुक्यातील बळीराजा शेतकरी अवकाळी पावसामुळे पूर्ण हादरून गेला आहे. महागडी बी-बियाणे वापरून, त्यावर खताच्या माऱ्यासाठी केलेला खर्च, कपाशी संत्रा पिकावर काढलेले सेवा सोसायटीचे कर्ज, शेतीपिकावर अवलंबून असलेले सण ते प्रापंचिक गरजा भागविण्याचे एकमेव उत्पादनाचे साधन असलेली शेती लहरी पावसावर अवलंबून असते. यंदा हाता-तोंडाशी आलेला घास अवकाळी पावसाने हिरावून घेतला. सात दिवसांपासून तालुक्यात अवकाळी पावसाने हजेरी लावल्याने शेतीपिकाचे अतोनात नुकसान झाले. शेतामध्ये खराब झालेला कापूस, तूर, कुजलेला भाजीपाला माणसांच्याच नव्हे, तर प्राण्याच्या खाण्यायोग्य राहिले नाही. या नुकसानीचे वेळेवर पंचनामे झाले तर शेतकऱ्यांना भरपाई मिळण्याची अपेक्षा आहे, मात्र मागील चार दिवसांपासून अद्याप सरकारी यंत्रणेने बघ्याची भूमिका घेत असल्याचे चित्र बघायला मिळत आहे.

मोर्शी तालुक्यामध्ये अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले असताना सुद्धा कृषी व महसूल विभागाचे जबाबदार अधिकारी वेगळ्याच तोऱ्यात वावरतांना दिसत असल्यामुळे शेतकरी त्यांना शेतकरी पंचनामे करण्याची मागणी करत असताना सुद्धा आम्हाला अजून पांचानाम्याचे आदेश मिळाले नसल्याचे सांगून वेळ मारून नेण्याचा प्रयत्न करतांना दिसत आहे. मोर्शी तालुक्यातील शेतकऱ्यांचे नुकसान होऊन चार दिवसांचा कालावधी लोटून सुद्धा शेतकरी पीक पंचनाम्याच्या प्रतीक्षेत आहे.