जवान सुधीर वानखडे देत आहेत मेळघाटातील विद्यार्थ्यांना मोफत प्रशिक्षण

7

🔹अमरावती जिल्ह्याच्या तिवसा तालुक्यातील शेंदोळा खुर्द येथील सुधीर वानखडे हे अठरा मॅटिलिय बटालियनमध्ये पंजाब राज्यात गेल्या अनेक वर्षापासून कार्यरत आहेत.

✒️शेखर बडगे(अमरावती जिल्हा प्रतिनिधी)मो:-9545619905

अमरावती(दि.30जुलै): – लॉकडाऊनमुळे मागील तीन महिन्यांपासून बहुतांश क्षेत्रातील नोकरदारांना सुट्ट्या आहेत. त्यामुळे सुट्टीचा आनंद घेत ते कुटूंबासोबत वेळ घालवत आहेत. परंतु, देशाचे रक्षण करणारे जवान मात्र आजही सीमेवर तैनात आहेत. याच जवानांपैकी लॉकडाऊनपूर्वी सुट्टीवर आलेल्या अमरावती जिल्ह्यातील शेंदोळा खुर्दमधील जवान मात्र त्याची सुट्टी कुटूंबासोबतच मेळघाटमधील सहा गावातील ३५ आदिवासी तरुणांसोबत घालवत आहे. या दरम्यान मागील तीन महिन्यांपासून त्यांनी या तरुणांना पोलीस भरतीपासून ते सैन्याच्या भरतीसाठीचे सर्व प्रशिक्षण देत आहे. अमरावती जिल्ह्याच्या तिवसा तालुक्यातील शेंदोळा खुर्द येथील सुधीर वानखडे हे अठरा मॅटिलिय बटालियनमध्ये पंजाब राज्यात गेल्या अनेक वर्षापासून कार्यरत आहेत. अशातच लॉकडाऊन दरम्यान २४ तारखेला सुट्टी घेऊन सुधीर वानखेडे हे जवान त्यांच्या मुळगावी शेंदोळा येथे आले होते. त्यांची पत्नी दीपाली वानखडे या मेळघाटातील चिखलदरा तालुक्यातील बोराळा या गावात आरोग्य सेविका म्हणून कार्यरत आहेत. त्यामुळे सुधीर वानखडे हे सुद्धा बोराळा येथे आपल्या कुटूंबासोबत सुट्टी घालवण्यासाठी गेले. सुट्टीवरील जवान मेळघाटातील तरुणांना देतोय मोफत भरतीचे प्रशिक्षण याच दरम्यान या गावातील काही आदिवासी तरुण पोलीस भर्तीसाठी सकाळी व्यायाम करत असल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यावेळी त्यांनी त्या आदिवासी तरुणांना पोलीस ते सैन्य भर्तीपर्यतचे सर्व प्रशिक्षण मोफत देण्याचे ठरवले. त्याला आदिवासी तरुणांनीही प्रतिसाद दिला. सुरुवातीला पाच आदिवासी तरुणांपासून सुरू झालेल्या संख्या आता ३५ वर गेली आहे. यामध्ये चिखलदरा तालुक्यातील बोरळा गावसोबतच परिसरातील ५ गावातील तरुणही या प्रशिक्षणात सहभागी होत आहेत. मेळघाटातील आदिवासी बांधवांवर अंधश्रद्धांचा मोठा पगडा आहे, त्यामुळे पोलीस प्रशिक्षनाबरोबरच अंधश्रद्धा निर्मुलनाचे कामही हा जवान करतोय. गाव साखर झोपेत असतानाच पहाटे चार वाजल्यापासून हा जवान तरुणांच्या मोफत प्रशिक्षनाला सुरुवात करतो. जवळपास सकाळी साडे सहा वाजेपर्यंत व सायंकाळी 2 तास या तरुणांना कसरतीचे प्रशिक्षण हा जवान देत आहे. मागील तीन महिन्यांपासून सुरू असलेल्या या कठीण प्रशिक्षणामूळे अनेक सकारात्मक बदल या तरुणांमध्ये दिसून येत आहेत. यामध्ये या गावातील मुलीही सहभागी होत असतात. पोलीस व सैन्य भरतीसाठी लागणारे प्रशिक्षण हे हा जवान अगदी मोफत देत असल्याची जाणीव ठेवून हे तरुण देखील त्यांच्या या कार्याला प्रतिसाद देत आहेत. आगामी काळात होणाऱ्या पोलीस व सैन्य भर्तीमध्ये ३५ पैकी ८ ते १० तरुणांची निवड होईल, असा आत्मविश्वास देखील सुधीर वानखडे यांना आहे. प्रशिक्षणासाठी लागणाऱ्या साहित्यांचा खर्च देखील वानखडे यांनी केला आहे. या प्रशिक्षणावर वानखडे सांगतात, मेळघाटातील मुलं हे खूप जिद्दी व कर्तृत्ववान आहेत. सुरुवातीला त्यांच्यामध्ये असलेली इच्छाशक्ती, जिद्द हे पाहून आपणही यांच्यासाठी काहीतरी करावं असे वाटलं. कारण आपण ज्या परिस्थितीमधून गेलो त्या परिस्थितीतून हे तरुण जाऊ नये, असे वानखडे म्हणाले. दरम्यान, वानखडे देत असलेल्या प्रशिक्षणामुळे आमच्यात मागील तीन महिन्यात खूप बदल झाला आहे. त्यामुळे पोलीस भर्ती शारीरिक चाचणीत आम्ही पास होऊ, पण आम्हाला अभ्यास करायला एक वाचनालय व व्यायाम करायला एक जिम सुरू करायची मागणी या तरुणांनी केली आहे. सुधीर वानखडे हे तरुणांना परीक्षण देण्यासाठी झटत असतानाच त्यांची पत्नी दीपाली वानखडे या आरोग्य सेविका असल्याने कोरोना काळात कोरोना योद्धा म्हणून त्या मेळघाटात उत्तम काम करत आरोग्य सेवा देत आहे. जवान वर्षभर हा सीमेवर तैनात असतो. वर्षभरापासून मिळालेली एक सुट्टी त्याच्यासाठी सर्वात मोठी आनंदाची गोष्ट असते. परंतु या सुट्टीतही देशासाठी सैनिक घडवण्याच्या जिद्दीने मात्र सुधीर यांना स्वस्त बसू दिले नाही. मागील तीन महिन्यांपासून मेळघाटातील आदिवासी तरुणांसाठी ते घेत असलेल्या मेहनत नक्कीच त्या तरूणांसाठी आशादायी आहे.