करोना बाधित मातेने बाळाला जन्म देऊन हसतमुखाने घेतला जगाचा निरोप!

5

✒️नागपूर(पुरोगामी संदेश नेटवर्क)

नागपूर(दि.30जुलै):-करोना संसर्गाची बाधा झालेल्या गर्भवती महिलेने बाळाला जन्म दिल्यानंतर हसतमुख चेहऱ्याने जगाचा निरोप घेतला. मेयोत घडलेल्या या हृदयद्रावक घटनेने सारेच गहिवरले. त्या मातेला निरोप देताना डॉक्टर, परिचारिकांच्याही डोळ्यांच्या कडा पाणावल्या.
ही गर्भवती महिला अत्यवस्थ स्थितीत बुधवारी मेयोत उपचाराला आली होती. तिला प्रसववेदना होत असल्याने मेयोतील कोविड रुग्णालयाने तातडीने उपचारासाठी दाखल केले. गरोदरपणातील उच्च रक्तदाबाचा त्रास असलेल्या या महिलेला मेयोतील टीमने तातडीने अतिदक्षता विभागात दाखल करून घेत कृत्रिम श्वासोच्छ्वास प्रणालीवर उपचार सुरू केले. असह्य प्रसवकळा येत असल्याने तिला तातडीने लेबर रूममध्ये शिफ्ट करण्यात आले.

अधीक्षक डॉ. रवी चौहान, उपवैद्यकीय अधीक्षक डॉ. सागर पांडे यांच्या नेतृत्वाखालील टीमने शर्थीचे प्रयत्न सुरू केले. तोवर तिच्या घशातील स्राव नमुना तपासणीसाठी पाठविण्यात आला. त्याचा अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर तातडीने कृत्रिम श्वासोच्छ्वास यंत्रणेच्या आधारे तिची प्रसूती करण्याचा निर्णय घेण्यात आला. मात्र, यादरम्यानच्या काळात तिने बाळाला जन्म देताच अवघ्या काही क्षणांत जगाचा निरोप घेतला.

नागपूरकरांची चिंता वाढली
नागपूर जिल्ह्यात करोना बाधितांची संख्या वाढतच असून बुधवारी यात आणखी ३०५ रुग्णांची भर पडली. जिल्ह्यातील करोना बाधितांची एकूण संख्या आता ४ हजार ७९२ झाली आहे. आणखी ११ जणांचा करोनामुळे मृत्यू झाल्याने नागपुरातील मृतांची संख्या आता १०७ झाली आहे. आतापर्यंत पॉझिटिव्ह आलेल्यांपैकी ३ हजार ६९ रुग्ण बरे झाले असून १६१६ रुग्णांवर सध्या उपचार सुरू आहेत. मृतांमधील दोघे नागपूरच्या बाहेरील आहेत. मृतांमध्ये पंचशीलनगर येथील ५० वर्षीय महिला, नारी रोड येथील येथील ६८ वर्षीय महिला, भरतनगर येथील ६५ वर्षीय महिला, गांधीबाग येथील ५८ वर्षीय पुरुष यांचा समावेश आहे. मध्य प्रदेशातील २० वर्षीय महिलेचाही मृत्यू झाला. एकीकडे रुग्णसंख्या वाढत असताना बरे होणाऱ्या रुग्णांचे प्रमाण दिलासा देणारे आहे. बुधवारी ३७९ रुग्ण बरे झाले. आतापर्यंत ३ हजार ६९ रुग्ण बरे झाले असून बरे होण्याची टक्केवारी ६४.४ टक्के आहे. ग्रामीणमध्येही रुग्ण वाढीचा वेग वाढला असून बुधवारी एकाच दिवशी ८० रुग्ण पॉझिटिव्ह आढळले. ग्रामीणमधील रुग्णांची संख्या आता १२५३ झाली असून आतापर्यंत १६ जणांचा मृत्यू झाला. आजच्या स्थितीला ग्रामीणमध्ये ६५१ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.