✒️मुज़म्मिल हुसैन(नंदुरबार,जिल्हा प्रतिनिधी)मो:-9763127223

नंदुरबार(दि.30जुलै):- कोरोनासारख्या संकटाचा सामना करताना विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी करण्यात येणाऱ्या सातत्यपूर्ण प्रयत्नांचे निती आयोगाने कौतुक केले आहे. आकांक्षित जिल्ह्याच्या फेब्रुवारी ते जून या कालावधीतील शैक्षणिक प्रगती संदर्भात देशातील आकांक्षित जिल्ह्यापैकी नंदुरबारचा चौथा क्रमांक आला आहे.

विद्यार्थ्यांचे स्थलांतर रोखण्यासाठी स्थलांतर, बालरक्षक कार्यशाळेचे आयोजन, शिक्षण हमी कार्ड वितरण, मुलींना उपस्थिती भत्ता देणे व मोफत पाठ्यपुस्तक व गणवेश वाटपात जिल्ह्याने चांगली कामगिरी करीत प्राथमिक ते उच्च प्राथमिक वर्गात 99.59 गुण तर उच्च प्राथमिक ते माध्यमिक वर्गात 93.33 गुण मिळविले आहेत.

आंकाक्षित जिल्हा अंतर्गत 62 शाळांना 65 स्वच्छतागृह मंजूर करून पुर्ण करण्यात आले आहेत. एनएएसच्या धर्तीवर प्रत्येक ‍जिल्हा परिषद शाळेत विद्यार्थ्यांकडून भाषा आणि गणित विषयासाठी सराव चाचणी घेण्यात आली आहे. तसेच केंद्र स्तरावरील शिक्षण परिषदेत गुणवत्ता वाढीसाठी विशेष उपाययोजना करण्यात आल्या आहेत.

प्रथम फाऊंडेशन, ग्यान प्रकाश, पिरॅमल फाऊंडेशन व कराडीपाथ आदी स्वयंसेवी संस्थांच्या मदतीने गुणवत्ता वाढीचे उपक्रम शाळांमधून राबविण्यात येत असून त्याचा चांगला परिणाम दिसून आला आहे. अशा उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांना विविध क्षेत्रातील माहिती मिळणे शक्य झाले आहे.

जिल्ह्यात निरंतर शिक्षण विभागाकडून साक्षर भारत उपक्रम राबविण्यात आला. त्यात 1 लाख 17 हजार निरक्षर स्त्री-पुरुषांना साक्षर करण्यासाठी प्रशिक्षण देऊन परिक्षेचे आयोजन करण्यात आले. त्यात 1 लाख 6 हजार नवसाक्षरांची संख्या वाढली असून त्यात 55 हजारपेक्षा अधिक महिला आहेत.

शाळेला नळ कनेक्शन किंवा हातपंपाद्वारे पाणी उपलब्ध करून देणे व विद्युत सुविधा असणे आदी बाबींचाही गुणांकनामध्ये समावेश आहे. मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागामार्फत विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी सातत्यपूर्ण प्रयत्न होत असून त्याला निती आयोगाने ट्टिवटच्या माध्यमातून केलेल्या कौतुकामुळे अधिक वेग मिळणार आहे.

कोरोना ब्रेकिंग, महाराष्ट्र, स्वास्थ 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

©️ALL RIGHT RESERVED