✒️मुंबई(पुरोगामी संदेश नेटवर्क)

मुंबई(दि.31जुलै):-राज्यातील महाविकास आघाडीचं सरकार हे एक कुटुंबाप्रमाणे असल्याचं दाखवलं जातं. पण खरं तर हे कुटुंब नाहीच आहे. एकमेकांशी सुसंवाद नसलेलं हे सरकार म्हणजे कुटुंब नसून लिव्ह इन रिलेशनशिप आहे, अशी टीका विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आज केली.
मी इतिहासाचा अभ्यासक आहे. अशा प्रकारचं सरकार कधीच चालेलं नाही. या सरकारमध्ये काँग्रेस आहे. त्यामुळे काँग्रेस हे सरकार चालू देणार नाही. काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात काहीही म्हणो काँग्रेसनेही असं सरकार कधीच चालू दिलेलं नाही. लिव्ह इन रिलेशनशिपमधलं हे सरकार अंतर्विरोधानेच पडेल, असंही ते फडणवीस म्हणाले. एबीपी माझा या वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी ही टीका केली.

राज्यात करोनाचं संकट असल्यामुळे हातपाय गाळून बसणं परवडणार नाही. राज्याची अर्थव्यवस्था उभी करायची असेल तर राज्य सरकारने धाडसी निर्णय घेण्याची गरज आहे. निदान अर्थचक्र गतीमान करण्यासाठी नेमलेल्या समितीने दिलेल्या अहवालाची अंमलबजावणी तरी केली पाहिजे, असा सल्लाही त्यांनी दिला.राज्यात करोनाचं संकट आहे. त्यामुळे सरकारला दोन आघाड्यांवर लढावं लागणार आहे. करोनाशी सामना करतानाच राज्य सरकारला राज्याची अर्थव्यवस्थाही रुळावर आणावी लागेल. त्यासाठी आजपासूनच तयारी करावी लागेल. त्याकरिता धाडसी निर्णय घेतले पाहिजे. नाही तर आगामी काळात उद्योग आणि सेवा क्षेत्रावर त्याचा परिणाम होऊ शकतो. हातपाय गाळून बसणं राज्याला परवडणार नाही, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले. राज्याचं अर्थचक्र गतिमान करण्यासाठी काही कमिट्या स्थापन केल्या होत्या. या समित्यांनी अहवाल दिला आहे. त्याची अंमलबजावणी केली पाहिजे. अहवाल आलेत आणि ते तसेच पडून आहेत, असं असेल तर ते योग्य ठरणार नाही, असंही त्यांनी सांगितलं.

राज्यातील छोट्या व्यावसायिकांपासून मोठ्या उद्योजकांपर्यंत प्रत्येकाला मोठी आर्थिक झळ पोहोचली आहे. त्यांना मदतीचा हात देण्याची गरज आहे. त्यासाठी सरकारने विशेष प्लानिंग केलं पाहिजे. शेतीचंही नियोजन केलं पाहिजे. छोट्या घटकांना पुढे नेण्यासाठी आणि प्रोत्साहन देण्यासाठी विशेष भर दिला पाहिजे. हे नियोजन केलं तरच करोनानंतरच्या काळात वेगानं झेप घेणं शक्य होईल, असंही त्यांनी सांगितलं.

करोना नियंत्रणात तर मृत्यूदर का वाढतोय?
मुंबईत करोना नियंत्रणात असल्याचं सांगितलं जातं. मग मुंबईतील करोनाचे मृत्यू का वाढत आहेत? असा सवाल फडणवीस यांनी केला. आपल्याकडे टेस्ट कमी होत आहेत. त्यामुळे रुग्णसंख्या कमी दिसत आहे. आपल्याकडे कॅपिसिटी असतानाही पाहिजे तेवढ्या टेस्ट होत नाही. उलट लोकांनाच टेस्ट करायला सांगितलं जातं. हे चुकीचं आहे. महाराष्ट्राने दिल्लीप्रमाणे टेस्टची संख्या वाढवली पाहिजे. टेस्टची संख्या अधिक वाढवल्यास रुग्णांची संख्या वाढेल. पण करोना लवकरात लवकर नियंत्रणात येईल, असं ते म्हणाले. मुंबईत टेस्ट कमी होत असल्याने कोविड सेंटर रिकामे पडलेले आहेत, अशी टीकाही त्यांनी केली.

महाराष्ट्र, मिला जुला , मुंबई, राजकारण, राजनीति, राज्य, सामाजिक 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

©️ALL RIGHT RESERVED