राज्यातील ठाकरे सरकार फार काळ टिकणार नाही; राज ठाकरेंचं भाकीत

30

✒️मुंबई(पुरोगामी संदेश नेटवर्क)

मुंबई(दि.31जुलै):-राज्यातील मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील आघाडी सरकारमध्ये कोणताही संवाद नाही. काहीही ताळमेळ नाही, त्यामुळे हे सरकार फार काळ टीकेल असं वाटत नाही, असं भाकीत मनसेचे राज ठाकरे यांनी वर्तवलं आहे.
राज्यात उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली तीन पक्षाचं सरकार आलं होतं. तेव्हाच मी सांगितलं होतं, हे सरकार फार काळ टिकणार नाही. आताही या तीन पक्षांमधील सावळागोंधळ पाहता हे सरकार फार काळ टिकणार नाही असं वाटतं. या सरकारमधील तिन्ही पक्षाचा एकमेकांशी संवाद नाही. ताळमेळ नाही. त्यामुळे हे सरकार लवकर जाईल, असं वाटतं, असं राज ठाकरे म्हणाले. एबीपी माझा या वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी हे भाकीत वर्तवलं.

माझ्या मनातील महाराष्ट्र कसा असेल हे मी महाराष्ट्राचा विकास आराखडा मांडून सांगितलं आहे. माझ्या हातात सत्ता आल्यावरच महाराष्ट्र कसा असावा ते दाखवता येईल. त्याशिवाय महाराष्ट्र कसा घडवता येईल? जगाला हेवा वाटणं हे माझं स्वप्न आहे. त्यासाठी जनतेने आशीर्वाद द्यायला हवा, असं सांगतानाच मला जे वाटतं ते आताच्या सरकारमधील लोकांना सांगून काय उपयोग. ते त्यांच्या पद्धतीने सत्ता राबवत आहेत. माझ्या मतानुसार त्यांनी काही करावं, अशी अपेक्षा करणं बरोबर नाही, असंही ते म्हणाले.

उद्धव ठाकरे टीव्हीवर दिसले; काम दिसलंच नाही- राज ठाकरे
दरम्यान, ‘मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे मला फक्त टीव्हीवर दिसले. त्याचा कारभार दिसलाच नाही,’ अशी खोचक टीकाही राज यांनी केली. प्रशासकीय कामकाजाचा अनुभव नसतानाही उद्धव ठाकरे यांनी करोनाची परस्थिती उत्तम हाताळली, असं कौतुक सुरुवातीला झालं होतं. एका संस्थेनं देशातील टॉप टेन मुख्यमंत्र्यांच्या यादीतही उद्धव यांचा समावेश केला होता. त्या अनुषंगानं विचारलं असता राज यांनी मुख्यमंत्र्यांना टोला हाणला. ‘करोना आणि त्यानंतरच्या लॉकडाऊनमुळं लोकांच्या मनात विनाकारण भीती निर्माण झाली आहे. सरकारचे निर्बंध, टीव्हीवरील बातम्या आणि व्हॉट्सअॅपवरील मेसेजेसमुळे यात भर पडत आहे. काळजी घेणं गरजेचं आहे पण घरात बसून राहणंही योग्य नाही. त्यामुळं सरकारनं लवकरात लवकर सर्वकाही सुरळीत करायला हवं,’ असं ते म्हणाले.