कूलरचा शॉक लागून तीन बहिणींचा मृत्यू

30

✒️यवतमाळ(पुरोगामी संदेश नेटवर्क)

यवतमाळ(दि.31जुलै):-कूलरचा शॉक लागल्याने तीन सख्या बहिणींचा जागीच मृत्यू झाल्याची दुदैवी घटना राळेगाव तालुक्यातील कोदुर्ली येथे गुरुवारी सकाळी घडली. रिया गजानन भुसेवार (वय ८) संचिता गजानन भुसेवार(वय ६) व मोना गजानन भुसेवार (वय ४) अशी या बहिणींची नावे आहेत. या मुलींचे वडील गजानन आपल्या पत्नीसह सकाळी शेतावर कामाला गेले होते. घरी या तीन बहिणीच होत्या. मोठी बहीण स्वयंपाक करीत होती. रात्री उरलेले अन्न कूलरवर ठेवले होते. अन्न ठेवलेला डबा एक बहीण कूलरवरून काढत असताना तिला शॉक लागला. ती किंचाळून खाली कोसळली. तेव्हा काय झाले म्हणून दोन्ही बहिणी धावत आल्या असत्या त्यांनाही शॉक लागला. यात तिन्ही बहिणींचा जागीच मृत्यू झाला. बराच वेळ झाला तरी घरातून मुलींचा आवाज येत नसल्याने शेजारी राहणाऱ्या आजीने भुसेवार यांच्या घरात जाऊन पहिले असता त्यांना तिन्ही बहिणी कूलरजवळ पडलेल्या दिसल्या. या घटनेची माहिती मिळताच मुलींचे आईवडील शेतातून धावत घरी आले. राळेगावचे तहसीलदार डॉ. रवींद्र कानडजे, गटविकास अधिकारी रविकांत पवार, पोलिस उपनिरीक्षक दिलीप पोटभरे यांनी घटनास्थळी भेट दिली. या घटनेने गावात शोककळा पसरली आहे.