मेलबर्नमध्ये प्राध्यापक असल्याचे सांगून लग्न

33

✒️नागपूर(पुरोगामी संदेश नेटवर्क)

नागपूर(दि.31जुलै):-ऑस्ट्रेलियातील मेलबर्न विद्यापीठात प्राध्यापक असल्याचे सांगत युवकाने केमिकल इंजिनीअर तरुणीशी लग्न करून फसवणूक केली. पती व सासरच्या छळाला कंटाळलेल्या तरुणीने बजाजनगर पोलिसांत तक्रार दिली. पोलिसांनी तरुणीचा पती, त्याची आई व बहिणीविरुद्ध फसवणूक तसेच हुंड्यासाठी छळ करीत असल्याचा गुन्हा दाखल केला.

स्वयम संजीव जोशी (वय २९), त्याची आई अर्चना संजीव जोशी (वय ५४) आणि बहीण सेजल संजीव जोशी (वय २५, सर्व रा. यवतमाळ), अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्यांची नावे आहेत. अपूर्वा स्वयम जोशी (वय २८, रा. नीरी कॉलनी, बजाजनगर) यांच्या तक्रारीवरून हा गुन्हा दाखल करण्यात आला.

अपूर्वा या पुण्यातील एका कंपनीत कार्यरत होत्या. सप्टेंबर २०१८मध्ये त्यांनी लग्नासाठी शादी डॉट कॉमवर माहिती पोस्ट केली. दरम्यान, त्यांची संजीवसोबत ओळख झाली. मेलबर्नमधील विद्यापीठात प्राध्यापक असल्याची माहिती संजीवने शादी डॉट कॉमवर पोस्ट केली. अपूर्वा यांनी संजीवसोबत संपर्क साधला. त्यांचे लग्न ठरले. अपूर्वा यांनी नोकरी सोडली. दोघांचे लग्न झाले. लग्नात अपूर्वा यांच्या नातेवाइकांनी २५ लाख रुपये किमतीच्या भेटवस्तू दिल्या. अपूर्वा या यवतमाळ येथे राहायला लागल्या. लग्नानंतर कार व दागिन्यांसाठी स्वयम, त्याचे नातेवाइक अपूर्वा यांचा छळ करायला लागले. स्वयम हा मेलबर्न विद्यापीठात नोकरीवर नसल्याचेही अपूर्वा यांना कळाले. त्यांनी स्वयमला विचारणा केली असता त्याने अपूर्वा यांना मारहाण केली. अपूर्वा माहेरी परतल्या व नातेवाइकांना माहिती दिली. त्यानंतर अपूर्वा यांनी बजाजनगर पोलिस स्टेशन गाठून तक्रार दिली. पोलिसांनी फसवणुकीसह विविध कलमान्वये गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.