आय. टी.आय. च्या आॕनलाईन प्रवेश प्रक्रियेला सुरूवात

13

✒️गडचिरोली(पुरोगामी संदेश नेटवर्क)

गडचिरोली(दि.31जुलै):-व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालय, द्वारा केंद्रीय ऑनलाईन आय.टी.आय प्रवेश प्रक्रियेला सुरूवात झालेली आहे.
राज्यातील सर्व शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील (आय.टी.आय.) शिल्प कारागीर प्रशिक्षण योजनेतंर्गत (Craftsman Training Scheme) ऑगस्ट २०२० सत्रातील प्रवेशासाठी ऑनलाईन प्रवेश अर्ज दि.१ ऑगस्ट ते १४ आॕगस्ट पर्यंत उपलब्ध असणार आहे.
प्रवेशोच्छुक उमेदवारांनी व पालकांनी माहिती पुस्तिकेत देण्यात आलेली माहिती, प्रवेश पध्दती व नियमांचा अभ्यास करुनच ऑनलाईन प्रवेशप्रक्रीयेमध्ये सहभागी व्हावे. आॕनलाईन प्रवेश अर्ज http://admission.dvet.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आलेले आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदा आयटीआय प्रवेशाची प्रक्रिया केंद्रीयभूत ऑनलाईन पद्धतीने करण्यात येणार आहे. प्रवेश प्रक्रियेबाबत निःशुल्क मार्गदर्शन कक्ष प्रत्येक शासकीय औ.प्र.संस्थेमध्ये सुरू करण्यात आलेला असून इच्छूकांनी शंकेचे निरसन करून घ्यावे .
प्रवेशासाठी दहावी उत्तीर्ण व अनुत्तीर्ण अशी किमान शैक्षणिक पात्रता आहे. किमान शैक्षणिक अर्हता किंवा त्यापेक्षा उच्च दर्जाची शैक्षणिक अर्हता धारण करणारे १४ वर्षावरील उमेदवार आयटीआय अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेऊ शकतात. प्रवेशासाठी उच्च वयोमर्यादा निर्धारित करण्यात आलेली नाही, जेणेकरुन वयाच्या कोणत्याही टप्प्यावर इच्छूक उमेदवार प्रवेश घेऊ शकतात. यंदा प्रवेश अर्ज व नोंदणी शुल्क भरणे, आयटीआय केंद्रांची निवड करणे, प्रवेश अर्जात सुधारणा, दुरुस्ती करणे, हरकती नोंदविणे आदी सर्व कामे विद्यार्थ्यांना ऑनलाईन करता येणार आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रवेशासाठी गर्दी होऊ नये, विद्यार्थ्यांना प्रवास करावा लागू नये याकरिता प्रवेश प्रक्रियेच्या सर्व सुविधा ऑनलाईन उपलब्ध करुन देण्यात आलेल्या आहेत.
दहावी उत्तीर्ण, अनुत्तीर्ण इच्छूक विद्यार्थ्यांनी निर्धारित वेळेत आयटीआयसाठी अर्ज करावा.
राज्यात प्रत्येक तालुक्यात किमान एक शासकीय आयटीआय आहे.
वेबसाईटवर इत्यंभूत माहिती जसे प्रवेशासंबंधित नियम, उपलब्ध जागा, आवश्यक दस्तऐवजांची माहिती व संपूर्ण प्रवेश कार्यपद्धती, याबाबत विस्तृत माहिती समाविष्ट असलेली माहिती पुस्तिका, प्रवेशाचे वेळापत्रक, आयटीआय वसतीगृहांची उपलब्धता आदी माहिती वेबसाईटवर दिलेली आहे. उमेदवारांना आवाहन करण्यात येते की, प्रवेश नियमावली काळजीपूर्वक वाचूनच प्रवेशासाठी अर्ज करावा.
उमेदवाराने एकच अर्ज भरावा. एकापेक्षा जास्त अर्ज भरल्यास त्या उमेदवाराचे सर्व अर्ज रद्द होतील.प्रत्येक प्रवेश फेरीत निवड झालेल्या उमेदवारांना निवडपत्र आॕनलाईन उपलब्ध करून देण्यात येईल. उमेदवारानी निवडपत्राची छापील प्रत घेऊन दिलेल्या वेळापत्रकानुसार दिलेल्या औ.प्र. संस्थेत उपस्थित रहावे . प्रवेश निश्चित करतांना आवश्यक दस्तऐवज संबंधित संस्थेत तपासणीसाठी सादर करावे लागेल. प्रवेशाकरीता आॕनलाईन प्रवेश अर्ज तसेच व्यवसाय, संस्थानिहाय विकल्प व प्राधान्य १४ आॕगस्ट पर्यंत सादर करता येईल. प्राथमिक गुणवत्ता यादी दि.१६ आॕगस्टला संकेतस्थळावर प्रसिद्ध होईल . पहिल्या प्रवेश फेरीसाठी प्रवेशाची प्रत्यक्ष कार्यवाही दि.२१ आॕगस्ट ते २६ आॕगस्ट दरम्यान होईल. दुसरी प्रवेशफेरी ३१ आॕगस्ट ते ३ सप्टेंबर या दरम्यान होईल. तिसरी प्रवेश फेरी ८ सप्टेंबर ते ११ सप्टेंबर या दरम्यान होईल . चौथी प्रवेश फेरी १६ सप्टेंबर ते १९ सप्टेंबर ह्या दरम्यान होईल. विहीत मुदतीत प्रवेश अर्ज सादर करू न शकलेल्या उमेदवारांना समुपदेशन फेरीत संधी उपलब्ध करून देण्यासाठी आॕनलाईन प्रवेशअर्ज दि. १ सप्टेंबर ते १९ सप्टेंबर या दरम्यान स्विकारले जातील तसेच २१ सप्टेंबर रोजी समुपदेशन फेरीसाठी एकत्रित गुणवत्ता यादी प्रसिद्ध होईल. सर्व शासकीय औ.प्र.संस्थेत चौथ्या प्रवेश फेरीच्या समाप्तीनंतर शिल्लक राहिलेल्या जागा जिल्हास्तरीय समुपदेशन फेरीद्वारे भरण्यासाठी उपलब्ध राहतील. गुणवत्ता क्रमांकानुसार प्रवेशाच्या जागांचे वाटप दि.२४ सप्टेंबर ते २७ सप्टेंबर ह्या दरम्यान होईल. उमेदवाराने त्याचा प्रवेश खात्याचा पासवर्ड कुणासही देऊ नये. आॕनलाईन प्रवेश प्रणाली व्यतिरिक्त प्रवेश घेणाऱ्या उमेदवाराचे प्रवेश ग्राह्य धरण्यात येणार नाही याची सर्व उमेदवारांनी नोंद घ्यावी , असे गडचिरोली शास . औ.प्र. संस्थेचे प्राचार्य संतोष साळुंके यांनी कळविले आहे.