कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर वेल्हाणे येथील श्री.चांगदेव महाराजांची यात्रा रद्द

25

✒️धुळे(पुरोगामी संदेश नेटवर्क)

धुळे(दि.1ऑगस्ट) :- धुळे तालुक्यातील वेल्हाणे हे गाव श्री.चांगदेव महाराजांच्या नावाने फक्त धुळे जिल्ह्यालांच नव्हे तर संपूर्ण खान्देशाला सोबत महाराष्ट्र व मध्यप्रदेशाला सुद्धा सुपरिचित आहे.
यावर्षी संपूर्ण जगात कोरोना आजाराने थैमान घातलेले असताना चांगदेव यात्रा स्थानिक स्वरुपात साजरी करण्याचा निर्णय वेल्हाणे ग्रामस्थ व ग्रामपंचायत प्रशासन तसेच भक्त-सेवेकरी मंडळी यांनी घेतला आहे.
दरवर्षी महाराष्ट्राच्या कान्याकोपऱ्यातून भाविक यात्रेसाठि येत असतात ह्या वर्षी त्यांनी यात्रेला येऊ नये अशी विनंती कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे करण्यात आली आहे, तरी भाविकांनी याची नोंद घ्यावी अशी विनंती ग्रामपंचायत प्रशासन, मंदिर प्रशासन, ग्रामस्थ यांच्यावतीने करण्यात आली आहे.
श्री.चांगदेव हे स्वयंभू व जागृत देवस्थान आहे, जवळपास सातशे वर्षांची परंपरा या गावाला लाभली आहे. महाभारतातील पाच पांडव यांनी कौरवांचा कुरुक्षेत्राच्या मैदानात केलेला पराभव त्या पराभवातून घडलेला रक्तपात गांधारीच्या शापाने भगवान श्रीकृष्णांचा यादव कुळाचा झालेला विनाश हे सगळे पाप माथी घेऊन भटकत असतांना त्यांनी बोद अवतार घेण्याचे ठरवले, आणि त्याप्रमाणे जेष्ठ पांडव युधिष्ठिर यांनी वाघळी(चाळीसगाव), अर्जुन म्हणजेच चांगसुल्तान वेल्हाणे अश्या स्वरुपात अवतार घेऊन गावाचा,कुळाचा आणि भक्तांचा उद्धार केला, चांग आणि सुलतान असे दुहेरी नावाचे हे दैवत हिंदु व मुस्लिम ऐक्याचे प्रतीक आहे.
देवाच्या अनेक आख्यायिका आहेत, वेल्हाणे गावातिल ज्यांना सगळ्यात आधी देवाचा साक्षात्कार झाला ते निंबाबा भगत व त्यांचे सेवेकरी अजेबसिंग पवार यांची पिढी आजही ती परंपरा प्रामाणिकपणे पार पाडत आहे.
चांगदेव हे गवळी-धनगर या दोन्हींची दैवत आहे, मंदिराच्या पायथ्याशी रतन तलाव आहे, वेल्हाणे हे गाव हेल्या गवळी या व्यक्तीच्या नावावरून गावाचे नाव हे वेल्हाणे असे पडले आहे.
देवाने दिल्ली, हस्तिनापुर मध्ये साखळी सुल्तान नाव धारण करून आसु आणि कासु या दोन भावांचा उद्धार केला आहे. तसेच शिरुड या गावात कुकाबा, दगडुबा आणि लखमनबा यांचा सुद्धा उद्धार केला आहे. असे हे जागृत देवस्थान या दैवताच्या जवळ प्रामाणिकपणे जो भाविक आपले दुःख दूर करण्याच्या इच्छेने भेट देतो त्या भाविकाचे दुःख चांगसुल्तान हे दैवत दूर करते, अशा अनेक आख्यायिका भक्तांच्या बैठकीतून कानी पडतात.
श्रावण शुद्ध चतुर्दशीच्या दिवशी चांगदेवांनी दगड फोडून स्वयंम् अवतार घेतला आहे, म्हणूनच श्री चांगदेव महाराजांची वेल्हाणे येथील यात्रा श्रावण शुद्ध चतुर्दशीच्या दिवशी म्हणजे यंदाच्या 2 ऑगस्ट 2020 रोजी भरणार होती. श्रावण शुद्ध तेरस या दिवशी पाच देवांच्या नावाने पाच काट्या बसवल्या जातात, व श्रावण शुद्ध चतुर्थीच्या दिवशी त्या काठ्या उठवुन भक्तांच्या समूहाने गावभर वाजत-गाजत मिरवल्या जातात. आणि गावाबाहेरच्या मंदिराजवळ त्या काठ्यांची स्थापना केली जाते, आणि रक्षाबंधन(राखीपौर्णिमा) या दिवशी गावकऱ्यांची यात्रेमध्ये खरेदी-विक्री होते, अर्थात गावकऱ्यांची यात्रा हि रक्षाबंधन(राखीपौर्णिमा) या दिवशी असते. अतिशय हास्य आणि उल्हासात हे तीन दिवस चांगदेव भक्त-भाविक व गावकऱ्यांसाठी असतात. कानाकोपऱ्यातून आलेल्या वेगवेगळ्या भाविकांचे नवस या दिवशी फेडतात, हिंदू धर्मात अतिशय महत्त्वाचे स्थान असलेला श्रावण महिना गावकऱ्यांसाठी आणि भाविकांसाठी चांगदेव यात्रेच्या निमित्ताने एक नवी पर्वणी घेऊन येत असतो.
आज जगावर जी परिस्थिती आहे तीच परिस्थिती त्रिपार युगात जेव्हा रामराज्य होतो त्यावेळेस रावणासारखी महामारी तर द्वापार युगात श्रीकृष्णांसाठी कंसरुपी महामारी होती, त्यावेळेस आदिमायेने दिलेला शाप हा आज कलियुगात जेव्हा-जेव्हा पाप वाढेल तेव्हा – तेव्हा संकटे येतील अशा स्वरुपात आज या कोरोना नावरुपी महामारीने पसरवला आहे.
वेल्हाणे गावाच्या व पंचक्रोशितील आराध्य दैवताला एकच विनंती करतो, जे संकट या जगावर, देशावर, राज्यवर आले आहे ते लवकरात लवकर दूर करा. व पुन्हा एकदा तो हसता-खेळता महाराष्ट्र नावारूपाला येऊ द्या.
🙏🙏🚩||जय चांगसुल्तान||🚩🙏🙏
लेखक:-जयदिप लौखे-मराठे(युवा जिल्हाध्यक्ष शंभुसेना युवा आघाडी धुळे जिल्हा) मो.नं.8805220740,7218973382
मार्गदर्शक:-गौतम(दादा) वाघ,वेल्हाणे
विनीत:- समस्त ग्रामस्थ, श्री चांगदेव महाराज भक्त-सेवेकरी, श्री चांगदेव महाराज मंदिर प्रशासन, ग्रामपंचायत प्रशासन,पोलीस प्रशासन व ग्रामस्थ वेल्हाणे(देवाचे),धुळे