‘जीपीएस’ लावलेल्या आफ्रिकेतील पक्ष्याचा महाराष्ट्रात मृत्यू

27

पूर्व आफ्रिकेतून सुमारे साडेतीन हजार किलोमीटर (हवाई अंतर) पार करून ‘सूटी टर्न’ हा पक्षी महाराष्ट्रात आला. तुंगारेश्वरजवळ तो जखमी झाला, पण दुर्दैवाने उपचारादरम्यान तो मृत पावला. विशेष म्हणजे, अभ्यासासाठी या पक्ष्याच्या पाठीवर जीपीएस तसेच पायात धातूची रिंग लावण्यात आली होती.

भारतातील विविध राज्यांमध्ये तिन्ही ऋतूत विदेशातून विविध प्रजातीचे पक्षी येतात. याच क्रमात पूर्व आफ्रि के जवळील सेशल्स बेटावरून दरवर्षी ‘सूटी टर्न’ हा पक्षी कोकण किनारपट्टीवर ऑगस्ट ते सप्टेंबरदरम्यान स्थलांतरण करतो. सेशल्स ते तुंगारेश्वर हे अंतर सुमारे तीन हजार ३०० किलोमीटर असून सेशल्स ते मुंबई भागात ही प्रजाती स्थलांतरित करून येण्याचा हा पहिलाच अनुभव आहे. २८ जुलैला तुंगारेश्वरजवळ एका व्यक्तीला हा पक्षी जखमी अवस्थेत आढळल्यानंतर त्याने वनखात्याला सूचना दिली. स्थानिक वनविभागाने तातडीने त्याची रवानगी बोरिवलीतील डॉ. संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात केली. उद्यानातील पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. शैलेश पेठे यांनी त्याच्यावर उपचार केले. उपचारादरम्यान त्याने काही ताजे मासे खाल्ल्यानंतर त्याच्या बरे होण्याची अपेक्षा बळावली. मात्र, २९ जुलैला तो मृत पावला. महाराष्ट्रातील सिंधुदुर्ग जिल्ह्य़ातील वेंगुर्ला रॉक्स बेटावर या पक्ष्याच्या प्रजननासाठी चांगला अधिवास आहे. महाराष्ट्राच्या पश्चिम किनारपट्टीवर त्याच्या अनेक नोंदी आहेत. मात्र, सेशल्स ते मुंबई या त्याच्या प्रवासाची ही पहिलीच नोंद असल्याने पेंढा भरून हा पक्षी जतन करून ठेवला जाणार आहे.

सेशल्स बेटावर वाईल्डविंग बर्ड मॅनेजमेंट समूहाचे ख्रिस्तोफर फेअर व त्यांच्या चमूने ऑगस्ट २०१९ मध्ये १५ ‘सूटी टर्न’ या पक्ष्यांना सौर पॅनलसह ई-मेल पत्ता असलेले जीपीएस टॅग व रिंग लावली होती. त्यातलाच हा एक पक्षी होता. टाटा इन्स्टिटय़ूट ऑफ फंडामेंटल्स रिसर्च मुंबई येथे त्याच्या नोंदी आहेत. २६ मे १९८० ला मृत नर प्रजातीचा नमुनाही घेण्यात आला होता. तो बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटीच्या संग्रहात जोडण्यात आला. महाराष्ट्रात गेल्या काही वर्षांत ईबर्डवर त्याची कोणतीही नोंद नाही. त्यामुळेच हा पक्षी आता पेंढा भरून ठेवणार असून ज्याचे जीपीएस टॅग व रिंग हे सेशल्सला परत पाठवण्यात येणार आहेत.