मेट्रोची टेलिफोन लाइन हॅक – ९ लाख ८४ हजार ५१० रुपयांची फसवणूक

    50

    नागपूर(पुरोगामी संदेश नेटवर्क)

    नागपूर(दि.2ऑगस्ट):-सिव्हिल लाइन्स येथे महामेट्रोच्या कार्यालयातील टेलिफोन लाइन हॅक करून ९ लाख ८४ हजार ५१० रुपयांची फसवणूक झाल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. महामेट्रोने याविरोधात सदर पोलिसांत तक्रार दाखल केली असून, पोलिसांनी तपास सुरू केला आहे.

    मेट्रो हाउस या कार्यालयातील एप्रिल-मे महिन्याचे टेलिफोन बिल पावणेदहा लाख रुपये आल्यानंतर टेलिफोन विभागाने यावर शंका व्यक्त केली. बीएसएनएलचे एवढे बिल अचानक कसे आले, याबाबत माहिती घेतली असता मेट्रो हाउसमधील आयएसडी कॉल हॅक करण्यात आल्याचे लक्षात आले. त्यानंतर ही लाइन ‘लॉक’ करण्यात आली. पोलिस याबाबत तपास करीत असून सायबर सेलचीही मदत घेतली जाणार आहे. टेलिफोनच्या लाइनचा वापर कुणी आणि कशासाठी केला, याचा तपास सुरू आहे. पोलिसांकडून बीएसएनएलला सर्व कॉल्सची माहिती मागविण्यात आली आहे.