✒️नागपुर(पुरोगामी संदेश नेटवर्क)

नागपूर(दि.3ऑगस्ट):-बहीण-भावाच्या अतूट नात्याचा सण असलेल्या रक्षाबंधनापुढे करोनारूपी संकटानेही गुडघे टेकले आहेत. करोनामुळे बहिणीकडे कसे जायचे, यंदा राखी बांधायची राहून तर नाही ना जाणार, असे प्रश्न अनेकांच्या मनात घर करून होते. पण, या सर्वांवर आधुनिक तंत्रज्ञानाच्या साहाय्याने मात करत यावर्षी हा सण विशेष करण्याचा संकल्प काही बहीण-भावांनी केला आहे.

करोनामुळे काहींना बहिणीकडे जाणे शक्य नसल्याने ओवाळणी, शुभेच्छांची देवाणघेवाण, गिफ्ट हे सारे काही ऑनलाइन पद्धतीने होत आहे. याबाबत सांगताना प्रा. सतीश चाफले म्हणाले, ‘शेजारच्या अपार्टमेंटमधील दोन व्यक्तींचा करोनामुळे मृत्यू झाल्याने परिसर सील करण्यात आला आहे. त्यामुळे मला बहिणींकडे जाणे वा त्यांनी माझ्याकडे येणे शक्य नाही. त्यावर उपाय म्हणून दोन्ही बहिणींचे (कांचन घोडखांदे आणि दर्शना मस्के) पती अपार्टमेंटबाहेर कर्तव्यावर असलेल्या पोलिस कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून राखी पोहचविणार आहेत. त्यांच्याचद्वारे दोन्ही बहिणींना ओवाळणी देण्यात येईल.’ ‘पुणे येथे असलेला भाऊ (डॉ. दिनेश सोलंके) हा राखीनिमित्त कधी यायचा. तर कधी मी स्पीडपोस्टने त्याला राखी पाठवायची. सध्या पुण्यात करोनाने घातलेला थैमान पाहता ऑनलाइन शॉपिंग पोर्टलवरून राखी आणि गिफ्ट भावाला पाठविले. त्यानेदेखील राखी मिळाल्यानंतर लागलीच रिटर्न गिफ्ट धाडले. आता राखीच्या दिवशी व्हिडीओ कॉलिंगद्वारे ओवाळणी करणार आहे,’ अशी माहिती दीपाली ढोमणे यांनी दिली.

‘गुगल मीट’ जिंदाबाद

‘माझी बहीण (सुषमा यादव) अलाहाबादला असते. प्रत्येक वर्षी राखीच्या दिवशी मी जायचो. यावेळी परिस्थिती पूर्णपणे बदलली आहे. दरवर्षीची रित खंडित होणार की काय, असे वाटत असतानाच बहिणीच्या गावी असलेल्या अन्य एका नातेवाइकाने ऑनलाइन पर्याय सुचविला. स्वत:च्या ऑनलाइन पेमेंट अॅपवरून तिने मला राखी पाठविली. घरी आलेले कुरिअर पाहून आश्चर्याचा धक्काच बसला. आता गुगल मीटद्वारे दोघेही व्हर्च्युअल भेटीचा आनंद घेणार आहोत,’ अशी प्रतिक्रिया प्रा. वीरेंद्र यादव यांनी दिली.

पहिल्यांदाच लांब दरवर्षी अत्यंत आतुरतेने रक्षाबंधनाची प्रतीक्षा असते. त्यानिमित्ताने वर्षातून एकदा औरंगाबाद येथे असलेल्या बहिणीकडे (वीणा कांबळे) जाणे होते. यावेळी पहिल्यांदाच तिच्यापासून लांब आहे. प्रत्यक्ष नाही पण ऑनलाइन पद्धतीने हे पवित्र बंधन निभावणार असल्याचे प्रा. प्रशांत गोवर्धन म्हणाले.

आध्यात्मिक, धार्मिक , नागपूर, मनोरंजन, राज्य, रोजगार, लाइफस्टाइल, विदर्भ, सामाजिक , सांस्कृतिक, हटके ख़बरे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

©️ALL RIGHT RESERVED