मुंबई येथे आशा – गटप्रवर्तक कर्मचारी संघटनेचे धरणे आंदोलन

144

🔸शासन आदेश तात्काळ काढण्याबाबत पाठपुरावा करणार असल्याचे आ. गुट्टे यांचे आंदोलकांना आश्वासन

✒️प्रतिनिधी गंगाखेड(अनिल साळवे)

गंगाखेड(दि.29फेब्रुवारी):-महाराष्ट्र राज्य आशा – गटप्रवर्तक कर्मचारी कृती समितीचे मुंबई येथे आपल्या विविध मागण्यासाठी बेमुदत धरणे आंदोलन सुरू आहे. आज या धरणे आंदोलनास गंगाखेडचे आ.डॉ. रत्नाकर गुट्टे यांनी भेट देऊन अशा – गटप्रवर्तक कर्मचाऱ्यांच्या मागण्या समजून घेत याबाबत तात्काळ शासन आदेश काढण्याबाबत राज्याचे मुख्यमंत्री मा.ना. एकनाथजी शिंदे साहेब, उपमुख्यमंत्री मा.ना. देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि मा.ना. अजित दादा पवार साहेब यांच्याकडे पाठपुरावा करणार असल्याचे उपस्थितांना आश्वासन दिले.

राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत राज्यात सुमारे सत्तर हजार आशा स्वयंसेविका व तीन हजार पाचशे पेक्षा अधिक गटप्रवर्तक कार्यरत आहेत. सदर कर्मचाऱ्यांनी आपल्या मागण्याकरिता ऑक्टोबर,नोव्हेंबर २०२३ मध्ये राज्यव्यापी संप पुकारला होता. या पार्श्वभूमीवर राज्याचे आरोग्य मंत्री यांनी कृती समिती सोबत बैठक घेऊन वाटाघाटी करत यातून मार्ग काढत अशा स्वयंसेविका व गट प्रवर्तक कर्मचारी यांना मिळणाऱ्या मानधनात वाढ करत दिवाळी पूर्वी दिवाळी भेट देण्याचे व संप काळातील कामकाज पूर्ण केल्यास आशा – गट प्रवर्तक कर्मचारी यांना त्याचा कपात केलेला मोबदला अदा करण्या बाबत आश्वासित केले होते.

या नंतर संप स्थगित होऊन दीड महिना होऊनही अद्याप शासन निर्णय निर्गमित करण्यात आला नसल्याने सदर कर्मचाऱ्यात प्रचंड नाराजी असून हा आदेश तात्काळ निर्गमित करण्यासंदर्भात मुंबई येथे धरणे आंदोलन सुरू केले आहे. या आंदोलनास आ.डॉ. रत्नाकर गुट्टे यांनी भेट देऊन या बाबत तात्काळ सकारात्मक निर्णय घेऊन शासन आदेश काढण्याबाबत पाठपुरावा करणार असल्याचे उपस्थितांना सांगितले आहे.

याप्रसंगी आयटक संघटनेचे राज्य उपाध्यक्ष श्री मुगाची बुरुड, गुट्टे काका मित्रमंडळाचे पूर्णा तालुका प्रभारी श्री सुभाषराव देसाई यांच्यासह संघटनेचे पदाधिकारी अशा व गटप्रवर्तक कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.