सुग्रीष्मक: अपभ्रंश शिमगा! (होळी व धूलिवंदन सण विशेष.)

49

 

होळी भारतात वसंत ऋतूचे आगमन, हिवाळ्याचा शेवट आणि प्रेमाचा बहर साजरी करते. होळी सण वसंत ऋतूतील धान्य कापणीच्या चांगल्या हंगामासाठी देखील एक आवाहन आहे. हा सण एक रात्र आणि एक दिवस चालतो, हिंदू कॅलेंडरप्रमाणे फाल्गुन महिन्याच्या पौर्णिमेच्या संध्याकाळी सुरू होतो, जो ग्रेगेरियन कॅलेंडरमध्ये मार्चच्या मध्यभागी येतो.
फाल्गुन पौर्णिमेच्या दिवशी येणारा होळी हा सण भारतामध्ये, विशेषतः उत्तर भारतामध्ये उत्साहाने साजरा होणारा एक सण आहे. याला वेगवेगळ्या प्रदेशात वेगवेगळ्या नावाने संबोधले जाते. होळी हा रंगाचा सण आहे. होळी या उत्सवाला होळी पौर्णिमा, होलिकोत्सव, होलिकादहन, अशी विविध नावे आहेत. होळी हा सण लोक आनंदाने साजरा करतात. आता तर होळी खेळताना सेल्फी घेण्याचा आधुनिक पॅशन झाला आहे. पण हे धोकादायक ठरू शकते. या उत्सवाला होलिकादहन किंवा होळी, शिमगा, हुताशनी महोत्सव, फाग, फागुन दोलायात्रा, कामदहन अशा वेगवेगळ्या संज्ञा आहेत. कोकणात शिमगो म्हणतात. फाल्गुन महिन्याच्या शेवटच्या दिवशी साजरा होणाऱ्या या लोकोत्सवाला फाल्गुनोत्सव आणि दुसऱ्या दिवशी सुरू होणाऱ्या वसंत ऋतूच्या आगमनानिमित्त वसंतागमनोत्सव किंवा वसंतोत्सव असेही म्हणण्यात येते. देशी नाममाला या ग्रंथात हेमचंद्र याने या सणालाला सुग्रीष्मक असे नाव दिले आहे. यातूनच “शिमगा” असा अपभ्रंश तयार झाला असावा असे मानले जाते. होलिकादहन हे एका स्त्रिरुपाचे दहन करण्याची शिकवण देते, म्हणून जाणकारांनी या सणावर बहिष्कार घालण्याची मागणी रेटून धरल्याचे कळते. कारण एकीकडे स्त्रीला लक्ष्मी म्हणून पूजले जाते आणि येथे जाळले जाते. या दोन्ही कृतीत विसंगती आढळते.
महाराष्ट्रातील खेड्यांत होळीच्या दिवशी समिधा म्हणून काही लाकडे मंत्रोच्चारात जाळतात, पण हे योग्य नाही. त्याऐवजी काट्या, प्लास्टिक आणि अविघटनशील कचरा जाळावा. पेटलेल्या होळीभोवती बोंबा मारत लोक प्रदक्षिणा घालतात. त्यात अश्लील, अर्वाच्य शब्द उच्चारणे टाळले पाहिजे. होळीला नारळ अर्पण करून नैवेद्य दाखवतात. महाराष्ट्रात पुरणपोळीचा नैवेद्य दाखविण्याची रीत आहे. होळीनंतर ५ दिवसांनी रंगपंचमी हा सण साजरा केला जातो. होळीच्या दुसऱ्या दिवशी धूलिवंदनाचा सण साजरा केला जातो. याला धुळवड असेही म्हणतात. या दिवशी होळीची रक्षा अंगाला फासली जाते किंवा ओल्या मातीत लोळण घेतली जाते. एकमेकांना गुलाल लावून रंगांची उधळण करणे, सर्वांनी एकत्र येणे, बंधुभाव आणि एकतेचे प्रतीक म्हणून याकडे पहिले जाते.
भारतातील शेतकरी वर्गात होळी या सणाचे खास महत्त्व आहे. पौराणिक इतिहास पाहता या सणाचे आणि कृष्ण-बलराम यांचे नाते दिसून येते. होळीच्या निमित्ताने या दोन्ही देवतांचे स्मरण आणि पूजा करतात. या दिवशी हाती आलेल्या पिकाबद्दल देवाला धन्यवाद देण्यासाठी प्रार्थना करतात. होळीच्या दुसऱ्या दिवशी गव्हांच्या ओंब्या भाजण्याची प्रथा आहे. या दिवसात गव्हाचे पीक तयार होते, हे त्यामागील कारण असू शकते. नवीन पीक अग्नी देवतेला समर्पित करण्याचीही प्रथा आहे. लहान मुलांना पीडा देणाऱ्या होलिका, ढुंढा, पुतना यासारख्या राक्षसींच्या दहनांच्या कथांमधे या उत्सवाच्या परंपरेचा शोध काही लोक घेतात. एका पौराणिक कथेनुसार भगवान विष्णूचा भक्त असलेल्या प्रल्हादाला मारण्यासाठी हिरण्यकश्यपूने धाडलेल्या होलिकादेवतेचा श्रीविष्णू देवाने वध केला होता. होलिकेला वर होता की तिला अग्नी जाळू शकणार नाही, परंतु प्रल्हादाला जाळण्यासाठी तिने त्याला मांडीवर घेऊन अग्निकुंडात प्रवेश केला. प्रल्हाद बचावला व होलिकेचे दहन झाले अशी आख्यायिका प्रचलित आहे. अशाप्रकारे हिंदूंच्या इतर सणाप्रमाणे होलिकादहन देखील वाईटावर चांगल्याचा विजयाचे चांगले प्रतीक आहे. वाईट गोष्टींवर विजय मिळवणे ही या सणाची व्याख्या आहे. राधा आणि कृष्ण यांच्या प्रेमाचे वर्णन असणारे होळी सणाचे संदर्भ दिसून येतात. गर्गसंहिता या ग्रंथात कृष्णाने होळी साजरी केल्याचा उल्लेख आहे, असे मानले जाते. होळीच्या जोडीने रंग उधळून राधा, गोपी यांनी कृष्णासह रंगाचा उत्सव साजरा केला अशीही आख्यायिका प्रचलित आहे.
!! होळी व धूलिवंदन सणाच्या सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा !!


– संकलन व सुलेखन –
श्री कृष्णकुमार आनंदी-गोविंदा निकोडे गुरूजी.
रामनगर वॉर्ड, गडचिरोली.
फक्त व्हॉट्सॲप- 9423714883.