11जून रोजी सरहद्द गांधी आत्मचरित्र प्रस्तावनेचे वाचन

106

रोशन मदनकर, उपसंपादक, मो. 88886 28986 चंद्रपूर : भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महात्मा गांधी यांच्या नेतृत्वात खांद्याला खांदा लावून लढा देणारे खान अब्दुल गफारखान उर्फ सरहद्द गांधी यांचे ‘माझे जीवन आणि संघर्ष’ या ऐतिहासिक ग्रंथाला लिहिलेल्या प्रस्तावनेचे ज्येष्ठ संपादक व साहित्यिक प्रा. सुरेश द्वादशीवार हे शनिवारी (दि. ११) सायंकाळी ५ वाजता नागपुरातील राष्ट्रभाषा संकुलातील श्रीमंत बाबुराव धनवटे सभागृहात वाचन करणार आहेत.

सरहद्द गांधी यांचे मूळ पुश्तू भाषेतील इंग्रजी अनुवादित आत्मचरित्र यापूर्वीच प्रसिद्ध झाले. इंग्रजी अनुवाद पाकिस्तानचे नामवंत लेखक इम्तियाझ अहमद साहेबजादा यांनी तर मराठी अनुवाद सविता दामले यांनी केले. इंग्रजी ग्रंथाला गांधीजींचे नातू राजमोहन गांधी यांची प्रस्तावना तर मराठी आवृत्तीची प्रस्तावना ज्येष्ठ संपादक व साहित्यिक प्रा. द्वादशीवार यांनी लिहिली. या निमित्ताने स्वातंत्र्यलढ्यातील एक महत्त्वपूर्ण दस्तावेज प्रथमच मराठी वाचकांसमोर येणार आहे, अशी माहिती विदर्भ गौरव प्रतिष्ठानचे डॉ. गिरीश गांधी, पं. शंकरप्रसाद अग्निहोत्री, ॲड. फिरदोस मिर्झा, प्रेमकुमार लुनावत, विष्णू मनोहर, रुपाली मोरे, बाळ कुळकर्णी, दिलीप जाधव, प्रगती पाटील, शुभदा फडणवीस, अतुल दुगकर, प्रफुल्ल गाडगे, निलेश खांडेकर आदींनी दिली.