हेच खरे लोकोपयोगी कार्य:कृषिभूषण दीपक आसेगावकर

  74

  बाळासाहेब ढोले, विशेष प्रतिनिधी मो. 78751 57855
  पुसद -आधुनिक काळात लग्नात लाखो रुपये खर्च होतात त्यामूळे वैयक्तिकरित्या आपल्या मुलामुलींचे लग्न करणे सर्वसामान्य वर्गाला महागाई व लग्नपद्धतीच्या पारंपरिक रुढींमुळे कठीण झाले त्यापेक्षा सर्वसामान्य लोकांनी अश्या निःशुल्क सर्वधर्मीय सामुहिक विवाह मेळाव्यात विवाह करावे जिल्हा सेवाधिकारी गणेश धर्माळे त्यांची सहचारिनी सर्व गुरुदेव भक्त, ग्राम पंचायत व आश्रयदाते हे कार्य घडवून आणतात त्याबद्दल त्यांचे करावे तेव्हढे कौतुक कमी हेच खरे लोकोपयोगी कार्य असुन पुढील वर्षी माझ्याकडून जेव्हढे जमेल तेवढी मदत मी निश्चित करेन असे आश्वासन कृषिभूषण दीपक आसेगावकर यांनी सामुहिक विवाह मेळाव्यात अध्यक्षीय भाषणात श्रीरामपूर येथे केले.

  प्रमुख अतिथी म्हणून पुसद विधानसभेचे आमदार इंद्रनील नाईक , विशेष अतिथी म्हणून महागाव तालुका काँग्रेस कमेटी अध्यक्ष माजी जि.प.सदस्य शिवाजी देशमुख सवनेकर, गावचे सरपंच आशिष काळबांडे, काकडदातीचे सरपंच अरविंद पुलाते, पंकजपाल महाराज, वारकरी परिषदेचे भारत घोगरे महाराज, माजी सरपंच नाना बेले, माजी उपसरपंच राजू डहाके, ग्रामविकास अधिकारी अनिल भगत, ग्राम पंचायत सदस्य विजय राठोड, मधूकर कलिंदर, राहुल सहारे, जलील बागबान दिनेश राठोड आदी मान्यवर उपस्थित होते.

  दरवर्षीप्रमाणे यावर्षीही गुरुदेव सेवा मंडळ श्रीरामपुर व ग्रामपंचायत श्रीरामपूर आयोजित सुसंस्कार शिबिर, किर्तनमालेचा समारोप सर्वधर्मीय सामुहिक विवाह मेळाव्यात झाला. याप्रसंगी पाच वधुवरांचा विवाह राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांना अभिप्रेत आदर्श पद्धतीने लावण्यात आला. शासनाचा निधी न घेता लोकसहभागातून निःशुल्क सामुहिक विवाह मेळाव्याचे आयोजन केले जाते. आत्तापर्यंत चाळीस जोडप्यांचे निःशुल्क विवाह लावण्यात आले त्यात भर टाकून पाच जोडप्यांचा विवाह लावल्याबद्दल सर्व उपस्थितांनी मुख्य आयोजक गणेश धर्माळे व स्मिता धर्माळे यांचे कौतुक केले. सर्वप्रथम वधुवरांनी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या प्रतिमेचे व अधिष्ठानाचे पूजन करून पुष्पहार अर्पण केला. त्यानंतर वधुवरांचा परिचय, वधुवरांना शपथ ग्रहण, मंगलाष्टके, अग्निसंस्कार, सुलग्न लावण्यात आले यावेळी पतंजली योगप्रशिक्षकांनी दिलेल्या योगदानाबद्दल प्रतिनिधिक स्वरूपात भैया पदमावार, ज्युडो कराटे व बॉक्सिंग प्रशिक्षण बद्दल जय उचाडे, कन्यादान योजने अंतर्गत पालकत्व स्विकारणारे पुसद अर्बन बँकेचे अध्यक्ष शरद मैंद, गिरीश अनंतवार, रवी ग्यानचंदानी, दिपक गंगात्रे, सुमन नुराई, सुभाष व्यवहारे, अभिजित चिद्दरवार, मनोज काळे, समीर भागवत, जगदीश जाधव,साई सेवा समिती यांचा शाल, श्रीफळ व ग्रामगीता देऊन सत्कार करण्यात आला. दात्यांच्या दातृत्वामुळे कार्यक्रमांचे यशस्वी आयोजन होत असल्याचे मत आयोजकांनी व्यक्त केले.

  या विवाह सोहळ्यात प्रमोद जयस्वाल,श्रीधर झरकर, भोला प्रसाद झाडे, डॉ. देवश्री काळबांडे यांनी सुरेल स्वागतगीत व राष्ट्रसंत तुकडोजी महाराज रचित मंगलाष्टके व सुश्राव्य गायन केले. सर्वांनी वधुवरांवर प्रेमपुष्पांचा वर्षाव केला. विवाह समारंभानंतर वधुवरांकडील हजारो पाहुण्यांना भोजन देण्यात आले.

  कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी गुरुदेव सेवा मंडळ श्रीरामपुर व ग्रामपंचायत श्रीरामपूर कर्मचाऱ्यांसह अनेकांनी अथक परिश्रम घेतले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मुख्य आयोजक गणेश धर्माळे यांनी तर आभार प्रदर्शन स्मिता धर्माळे यांनी केले.