पालकमंत्री ना.वडेट्टीवार यांचे शुभहस्ते 11ऑगस्टला रानभाजी महोत्सवाचा शुभारंभ

29

🔹जिल्ह्यात सर्वच तालुक्यात रानभाजी महोत्सवाचे आयोजन

🔸 कोरोनाच्या पार्श्वभूमीवर विशेष खबरदारी घेऊन शेतकरी व ग्राहकांनी सहभागी होण्याचे आवाहन

✒️चंद्रपूर(पुरोगामी संदेश नेटवर्क)

चंद्रपूर(दि.5ऑगस्ट):-जिल्ह्यातील ग्रामीण भागामध्ये मोठ्या प्रमाणात रानभाज्या आढळून येत असल्याने व रानभाज्या आरोग्याच्या दृष्टीने उपयुक्त असल्याने रानभाज्यांचे महत्त्व लोकांपर्यंत पोहोचणे व त्यातून आदिवासी शेतकऱ्यांना उत्पन्नाचे स्त्रोत मिळावे यासाठी दिनांक 11 ऑगस्ट रोजी सकाळी 11 ते संध्याकाळी 5 पर्यंत जिल्हास्तरावर व तालुकास्तरावर कृषी विभागाअंतर्गत रानभाजी महोत्सव तालुका फळरोपवाटीका चंद्रपूर येथे आयोजित करण्यात येत आहे. या रानभाजी महोत्सवाचा शुभारंभ राज्याचे मदत व पुनर्वसन, आपत्ती व्यवस्थापन, इतर मागास, बहुजन कल्याणमंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री ना. विजय वडेट्टीवार यांचे शुभहस्ते होणार आहे. संपूर्ण तालुक्यामध्ये रानभाजी महोत्सव आयोजित होणार आहे. सर्व शेतकरी व ग्राहकांनी या रानभाजी महोत्सवाचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा कृषी विभागांतर्गत करण्यात आले आहे.

रानभाजी महोत्सवामध्ये जिल्हा परिषदेचे अध्यक्षा संध्याताई गुरनुले, जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमनार, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल कर्डिले तसेच कृषी विभागाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थिती असणार आहेत.

कोरोना संसर्ग काळामध्ये सामाजिक अंतर राखून, मास्कचा वापर करून, परिसराचे निर्जंतुकीकरण इत्यादी सुरक्षेची विशेष खबरदारी घेऊन रानभाजी महोत्सव होणार आहे.

रानभाज्या या पावसाळ्याच्या सुरुवातीला आढळून येत असून गुणधर्माने परिपूर्ण असल्याने आरोग्याच्या दृष्टीने अतिशय उपयुक्त आहेत. रानभाज्यामध्ये कंदभाज्या उदा. करांदे, कणगर, कडूकंद, कोनचाई, अळू इत्यादी आहेत. हिरव्या भाज्या उदा. तांदुळजा, काठेमाठ, कुडा, टाकळा, कोहळा, कुई, घोळ, कवळा, लोथ इत्यादी आहेत. फळभाज्या उदा. करटोली, वाघेटी, चीचुर्डी, पायार, मोह, कपाळफोडी, काकड इत्यादी आहेत. फुलभाज्या उदा. कुडा, शेवळ, उळशी तसेच विदर्भातील तरोटा कुड्याच्या शेंगा या रानभाज्यांची ओळख, आरोग्याच्या दृष्टीने त्याचे महत्व, पाककृती इत्यादीविषयी माहिती शहरी भागातील ग्राहकांना होण्याच्या दृष्टीकोनातून “रानभाजी महोत्सव” आयोजित करण्याबाबत कृषी मंत्री ना. दादाजी भुसे यांनी सूचना दिलेल्या आहेत.

या ठिकाणी होणार रानभाजी महोत्सव:-

चंद्रपूर तालुक्यामध्ये तालुका फळरोप वाटीका चंद्रपुर येथे रानभाजी महोत्सव होणार आहे. बल्लारपूर तालुक्यांमध्ये तालुका कृषी अधिकारी परिसर बल्लारपूर, मुल तालुक्यामध्ये तालुका कृषी अधिकारी परिसर मुल, सावली तालुक्यामध्ये प्रशासकीय भवन सावली, वरोरा तालुक्यामधील आनंदवन चौक आठवडी बाजार वरोरा, भद्रावती तालुक्यामध्ये पंचायत समिती सभागृह भद्रावती, चिमूर तालुक्यामध्ये तालुका बीज गुणन प्रक्षेत्र मालेवाडा तालुका चिमूर, ब्रह्मपुरी तालुक्यामध्ये कृषी उत्पन्न बाजार समिती ब्रह्मपुरी, सिंदेवाही तालुक्यामध्ये कृषी विज्ञान केंद्र सिंदेवाही, राजुरा तालुक्यामध्ये तालुका फळरोपवाटीका देव्हाडा तालुका राजुरा, कोरपना तालुक्यामध्ये दत्त मंदिर सभागृह माथाफाटा तालुका कोरपना, जिवती तालुक्यामध्ये तालुका कृषी अधिकारी परिसर जिवती, गोंडपिंपरी तालुक्यामध्ये तालुका कृषी अधिकारी परिसर गोंडपिंपरी, पोंभूर्णा तालुक्यामध्ये तालुका कृषी अधिकारी परिसर पोंभूर्णा येथे रानभाजी महोत्सव दिनांक 11 ऑगस्ट पासून सकाळी 11 ते संध्याकाळी 5 वाजेपर्यंत आयोजित करण्यात येणार आहे. कोरोनाची सद्य परिस्थितीचा विचार करून नागभीड तालुक्यामधील 11 ऑगस्ट रोजी रानभाजी महोत्सव जिल्ह्याच्या ठिकाणी आयोजित होणार आहे.