लिफ्ट देऊन महिलेवर बलात्कार

13

✒️पुणे(पुरोगामी संदेश नेटवर्क)

पुणे(दि.6ऑगस्ट):-फातिमानगर येथील पीएमपी स्थानकावर उभ्या असलेल्या महिलेला लिफ्ट देऊन तिला दुसऱ्याच ठिकाणी घेऊन जाऊन बलात्कार करणाऱ्या आरोपीला मुंढवा पोलिसांनी २४ तासांत अटक केली.
दशरथ रामचंद्र बनसोडे (वय ५३, रा. विशाल पार्क, काळेपडळ) असे अटक केलेल्याचे नाव आहे. याबाबत पिंपळे गुरव येथे राहणाऱ्या ४५ वर्षीय महिलेने तक्रार दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार महिला घरकाम करते. रविवारी सकाळी ती फातिमानगर येथील पीएमपी स्थानकावर उभी होती. या वेळी राजेश कांबळे असे नाव सांगणाऱ्या व्यक्तीने त्यांना ‘लोणी येथे सोडतो,’ असे म्हणून लिफ्ट दिली. त्यानंतर जाताना ऑफिस दाखवितो; म्हणून महिलेला कोरेगाव पार्क परिसरातील मॅरेज लॉन येथे घेऊन गेला. महिलेचे हातपाय बांधून अंगावरील सोन्याचे दागिने जबरदस्तीने काढून घेतले. त्या ठिकाणाच्या खोलीत
महिलेवर बलात्कार केला. महिलेचे एक लाख रुपयांचे दागिने घेऊन पसार झाला. त्यानंतर महिलेने मुंढवा पोलिसांकडे धाव घेऊन तक्रार दिली.

या प्रकरणी मुंढवा पोलिस ठाण्याचे निरीक्षक सलीम चाउस यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक निरीक्षक विजय चंदन यांच्या पथकाने आरोपीचा माग काढण्यास सुरुवात केली.

असा पकडला आरोपी:-

– काळेपडळ परिसरात राहणाऱ्या दशरथ बनसोडे नावाच्या व्यक्तीने हा गुन्हा केल्याची माहिती पोलिसांना मिळाली.
– त्याला अटक करून चौकशी केल्यानंतर त्याने गुन्ह्याची कबुली दिली. गुन्हा करताना त्याने वेगळेच नाव वापरले होते.
– खोट्या नावाव्यतिरिक्त बाकी काहीही पुरावा नसताना पोलिसांनी कौशल्याने माग काढून आरोपीचा २४ तासांत शोध घेतला.