निवृत्तीनंतरही खुर्ची सुटेना!

    50

    ✒️नागपूर(पुरोगामी संदेश नेटवर्क)

    नागपूर(दि.7ऑगस्ट):-जिल्हा परिषदेचे पशुसंवर्धन अधिकारी डॉ. अरविंद ठाकरे अलीकडेच सेवानिवृत्त झालेत. पण ते अजूनही त्याच पदावर कायम असून, शासकीय अधिकारांचा वापर करीत आहेत. त्यांच्या या वर्तनामुळे वरिष्ठ अधिकाऱ्यांपासून कर्मचाऱ्यांपर्यंत सर्वच अवाक झाले आहेत तसेच त्यांची सेवा सुरू ठेवण्याचे आदेश लवकरच शासनाकडून येणार असल्याचीही चर्चा सध्या जिल्हा परिषदेच्या वर्तुळात रंगतेय. तरीही रितसर पुनर्नियुक्ती होण्यापूर्वीच त्यांनी परत एकदा या पदावर आपला अधिकार दर्शविल्याची चर्चा आहे.

    वयोमर्यादेच्या नियमानुसार ठाकरे ३१ जुलै रोजी सेवानिवृत्त झाले. नियमानुसार, त्यांनी आपल्या पदाची जबाबदारी संबंधित कनिष्ठ अधिकाऱ्यांकडे सोपविणे अपेक्षित होते. परंतु त्यांची सेवा कायम ठेवण्यात येणार असून, त्यांची पुनर्नियुक्ती होणार असल्याचे सांगितले जात आहे. त्यांनी पुनर्नियुक्तीच्या पत्राची वाट न बघता, या पदाची जबाबदारी पार पाडणे सुरूच ठेवले आहे. या सर्व प्रकाराची माहिती सर्वच विभाग प्रमुख आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांना आहे. सेवानिवृत्तीनंतर अधिकारी किंवा कर्मचाऱ्याला सेवामुक्त करण्याची जबाबदारी त्या अधिकाऱ्याच्या संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्याची असते. मात्र, वरिष्ठांच्या देखत हा सगळा प्रकार सुरू आहे.

    त्यामुळे ठाकरेंवर कारवाई का होत नसल्याचा प्रश्न निर्माण होत आहे. स्थायी समितीच्या बैठकीत एका सदस्याने हा विषय अधिकाऱ्यांच्या व पदाधिकाऱ्यांच्या लक्षातही आणून दिला. पण कुणीही कारवाई केली नाही. एका मंत्र्याचा वरदहस्त असल्याने अधिकारीही कारवाईचा बडगा उभारण्यास धजावत नसल्याची चर्चा दब्या आवाजात सुरू आहे तसेच ते काँग्रेसच्या एका आमदाराचेही नातेवाईक असल्याचे सांगितले जाते. त्यामुळे आपल्या पुनर्नियुक्तीचे पत्र येणारच, असा विश्वास त्यांना आहे.