ऑगस्ट क्रांती दिवस

15

भारतीय स्वातंत्र्यलढ्यात 9 ऑगस्ट 1942 या दिवसाचे अनन्यसाधारण महत्त्व आहे.या दिवशी तत्कालीन काँग्रेसच्या नेतृत्वाने भारतातील इंग्रज सरकारला चलेजाव असा इशारा दिला. या दिवसापासून स्वातंत्र्यासाठी लढणाऱ्या भारतीयांनी करेंगे या मरेंगे अशी निर्वाणीची भूमिका घेऊन, इंग्रजांना छोडो हिंदुस्तान हा अखेरचा इशारा दिला होता.तोपर्यंत शांततेच्या मार्गाने स्वातंत्र्याचे आंदोलन करणाऱ्या काँग्रेस आणि नेत्यांनी प्रथमच क्रांतीची भाषा वापरली होती. त्यामुळे हा नऊ ऑगस्ट क्रांती दिन म्हणून पुढे ओळखला जाऊ लागला. इतकी स्पष्ट आणि कडे भूमिका घेऊनही इंग्रजांनी आणखी पाच वर्षे आपल्याला स्वातंत्र्य दिलेच नाही, म्हणून 9 ऑगस्ट क्रांती दिवस म्हणून महत्त्वाचा आहे.
1942 च्या जुलैमध्ये छोडो हिंदुस्तान चा इशारा नव्हे आदेशच इंग्रजांना देण्याचा निर्णय काँग्रेसने घेतला होता.काँग्रेसच्या या प्रस्तावात हिंदुस्थानातील ब्रिटिश राजवट ताबडतोब संपुष्टात आली पाहिजे, हिंदुस्थान स्वतंत्र होणे हे केवळ त्याच्याच हिताचे नसून साऱ्या जगाचे हित त्यात सामावलेले आहे. हुकूमशाही, साम्राज्यशाही,लष्करशाही आधी अनिष्ट प्रवृत्ती शी यशस्वी मुकाबला करण्यासाठी हिंदुस्थान स्वतंत्र होणे आवश्यक आहे असे म्हटले होते.
महात्मा गांधी, पंडित जवाहरलाल नेहरू, मौलाना आझाद, सरदार वल्लभाई पटेल अशा ज्येष्ठ नेत्यांना नऊ ऑगस्ट च्या पहाटेच इंग्रज सरकारने अटक करून अज्ञातस्थळी रवाना केले होते. काँग्रेस महासमिती सदस्य सकाळी नऊ वाजता अधिवेशनाच्या शेवटच्या दिवसाच्या कामकाजासाठी गोवलिया टॅंक मैदान या अधिवेशनासाठी जमले तेव्हा त्यांना प्रमुख नेत्यांच्या अटकेची बातमी कळली. सरकारच्या या अटकसत्रा मुळे त्यामुळे संपूर्ण देशात संतापाची लाट उसळली.
महात्मा गांधींसारख्या लोकोत्तर विभूतीने आपल्या देशबांधवांना “करेंगे या मरेंगे”या निग्रहाने चलेजाव अभियान चालवण्याचा संदेश दिला होता. पण प्रत्यक्षात कोणती पावले उचलायची, हे अभियान नेमके कसे चालवायचे, यासंबंधी काहीच सांगीतले नव्हते.इंग्रज सरकारने गांधीजी सारख्या नेतृत्व करणाऱ्या सार्‍याच प्रमुखांना काही सांगण्यापूर्वी, दिशा-निर्देश देण्याची संधी न देता स्थान बद्ध करून टाकले होते. आपली कृती शांततामय आणि अहिंसक असली पाहिजे असेही आठ ऑगस्टच्या या प्रस्तावात म्हटले होते त्यामुळे गांधीजींना लगेच अटक होईल असे कुणालाही वाटले नव्हते पण इंग्रज सरकारने काँग्रेस संघटना बेकायदेशीर ठरवली. ठिकाणच्या पक्ष कार्यालयांना सील ठोकले. मुखपत्राचे प्रकाशन थांबवले. देशात दहशतीचे वातावरण निर्माण व्हावे असाच प्रयत्न इंग्रज सरकारचा त्यावेळी होता. या सरकारी उरेरावी व दडपशाहीविरुद्ध 9 ऑगस्टला तीव्र प्रतिक्रिया उमटली. त्याची पहिल्या दिवसाची केंद्रे मुंबई पुणे व अहमदाबाद होती. पुढे देशभर हे आंदोलन पसरले.
त्यावेळी चा स्वातंत्र्यलढा गांधीजी आणि काँग्रेसचे नेतृत्वातअसला तरी समाजवादी पक्षाची भूमिका या गांधीजींनी इंग्रजांविरुद्ध लढाऊ पवित्र घेतला पाहिजे अशीच होती. त्यामुळे नऊ ऑगस्ट पासून च्या चले जाव आंदोलनात समाजवादी पक्षाने त्यांची भूमिका बजावून त्याला प्रखरता मिळवून दिली होती. समाजवाद्यांनी नामांतर, वेशांतर करून, भूमिगत होऊन जनजागृती सुरू केली. त्या आंदोलनात रेल्वेरूळ उखडणे, स्थानकाची मोडतोड करणे, टपाल कार्यालय जाळणे, उद्ध्वस्त करण्याचे प्रकार देशभर झाले. विशिष्ट बंगाल आणि महाराष्ट्रात प्रतिसरकारची स्थापना झाली. या प्रतिसरकार मुळे मूळ इंग्रज सरकार खवळले आणि त्यांनी दडपशाही सुरू केली. त्यात 10 हजाराहून अधिक मृत्यू, तितकेच जखमी, महिलांची विटंबना, घरांची पोलिसाकडून जाळपोळ, लाखोना अटक अशा नोंदी आहे. ही चलेजाव चळवळ सेनापतीच्या अनुपस्थित सैनिकांनी केलेल्या लढाई सारखी होती, असेही तिचे वैशिष्ट्य मानले गेले आहे. या क्रांती लढ्याला वंदन.

✒️सौ.भारती दिनेश तिडके
रामनगर, गोंदिया.
मो:-8007664039.