6 ते 20 ऑगस्ट पर्यंत सूक्ष्म सिंचन संचाची सर्व्हिसिंग मोफत.

13

🔹शेतकऱ्यांनी या पंधरवाड्याचा मोठ्या प्रमाणात लाभ घ्यावा, कृषी अधिकारी यांचे आवाहन

✒️नितीन रामटेके(गोंडपिपरी,तालुका प्रतिनिधी)
मो:-8698648634

गोंडपिपरी(दि.9ऑगस्ट):- प्रधानमंत्री कृषि सिंचाई-सुक्ष्म सिंचन योजना सन 2020-21 अंतर्गत संबंधित कंपनी, वितरक यांचेकडून सुक्ष्म सिंचन संच सर्व्हिसिंग करुन घेण्याची मोहिम कृषी विभागाच्या मार्फत राबविण्यात येत आहे. मागील तीन वर्षात संच खरेदी केलेल्या शेतकऱ्यांचे करिता, दिनांक 6 ऑगस्ट ते 20 ऑगस्ट 2020 या कालावधीत सुक्ष्म सिंचन सर्व्हिंसिंग पंधरवाड्यामध्ये मोहिम राबविण्याचे निश्चित केलेले आहे. शेतकऱ्यांनी या पंधरवाड्याचा मोठ्या प्रमाणात लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी डॉ.उदय पाटील यांनी केले आहे.

केंद्र, राज्य शासनाचे ठिबक सिंचन योजना संदर्भात मार्गदर्शक सूचना : केंद्र, राज्य शासनाने ठिबक सिंचन योजना राबविणे संदर्भात मार्गदर्शक सुचना निर्गमित करण्यात आलेले आहे. यामध्ये पुढील प्रमाणे स्पष्ट सुचना आहेत. सुक्ष्म सिंचन संच उत्पादक व पुरवठादार कंपनीने विक्री करत असलेल्या प्रत्येक जिल्ह्यात विक्री पश्चात सेवा देण्यासाठी केंद्र उघडुन सेवा देणे आवश्यक आहे. पुरवठा केलेल्या संचासाठी तीन वर्षापर्यंत मोफत सर्व्हिसिंग सेवा देणे आवश्यक आहे. सुक्ष्म सिंचन संचामध्ये मोडतोड झालेली असेल तर बदलावयाच्या साहित्याची किंमत आकारुन पार्ट बदलुन देणे आवश्यक आहे.

मार्गदर्शक सुचनेप्रमाणे सुक्ष्म सिंचन कंपनी यांना सेवा देणे बंधनकारक आहे. या पंधरवाड्यात शेतकऱ्यांना ठिबक सिंचन सेवा उपलब्ध करुन देण्याबरोबर सुक्ष्म सिंचनासह सर्व तांत्रिक माहिती देणे व त्यांना प्रशिक्षित करणे आवश्यक आहे. यास्तव सर्व उपविभागीय कृषि अधिकारी, तालुका कृषि अधिकारी तसेच नोंदणीकृत वितरक व उत्पादक यांना विषयांकित मोहिम राबविण्याच्या उद्देशाने पंधरवाड्यामध्ये शेतकऱ्यांना मोफत सुविधा उपलब्ध करुन देणेबाबत कळविण्यात आलेले आहे. मार्गदर्शक सुचनेनुसार कौशल्य आधारीत कामे करणाऱ्या शेतमजुरांना कौशल्य प्रशिक्षण कार्यक्रम राबविणेबाबत सविस्तर सुचना दिलेल्या आहेत. त्यामध्ये जेथे सुक्ष्म सिंचनाखालील क्षेत्र जास्त आहे.त्या ठिकाणी सुक्ष्म सिंचनाद्वारे खतांचे वापरासाठी सेवा पुरवठादाराचे काम करणारे कुशल मजुर तयार करता येवु शकतात. अधिक माहितीसाठी नजीकच्या कृषि विभागाच्या कार्यालयाशी संपर्क साधावा अथवा कृषि विभागाच्या अधिकारी, कर्मचारी कडुन याबाबत माहिती घ्यावी.