सागर, लगे रहो ! सच्चा पत्रकारांसाठी खटले म्हणजे अंगावरची आभुषणे असतात !!

16

✒️दत्तकुमार खंडागळे( संपादक वज्रधारी)मो:-9561551006

नुकतेच मँक्स महाराष्ट्राचे पत्रकार सागर गोतपागर यांच्यावर काही भामट्यांनी खंडणीचा खोटा गुन्हा दाखल केला आहे. जनतेचा पैसा घेवून निकृष्ठ काम करत स्वत:चाच देश व समाज कुरतडणार्या भामट्यांच्या, समाज मंदिरातले संडास खाणा-या ठेकेदारांच्या भानगडी बाहेर काढल्याने सागर यांच्यावरती खोटा खटला दाखल करण्यात आला आहे. सागर गोतपागर यांच्यावर खंडणीचा खोटा गुन्हा दाखल करताना सदर तक्रारीत म्हंटले आहे की सागर गोतपागर दहा जुलै या तारखेला आमच्याकडे आला व त्याने पैसे मागितले. तसेच त्याला पंधरा जुलैला दुपारी दहा हजार रूपये दिले. शेवटी लबाडी ती लबाडी असते. चोर कितीही हूशार असले तरी चुका करतातच. गाढवाने वाघाचे कातडे पांघरले तरी त्याची मुळची औकाद दिसून येतेच. ते जेव्हा डरकाळी फोडायला जाते तेव्हा कळते की हा वाघ नाही गाढव आहे. लबाडांचेही असेच आहे. त्यांनी कितीही लबाडी केली तरी ती उघडी पडतेच. त्यांची लबाडी लपून रहात नाही. कारण सत्याची चमक आणि तेज वेगळेच असते.

सागर गोतपागर हे दिनांक नऊ जुलै ते पंधरा जुलैपर्यंत विट्याच्या तहसिल ऑफिस समोर बेमुदत ठिय्या आंदोलनात बसलेले आहेत. विटा ग्रामिण रूग्णालयातील भ्रष्ट कारभाराविरूध्द प्रहार जनशक्ती पक्षाच्यावतीने जे आंदोलन सुरू होते त्या आंदोलनात सागर आमच्यासोबत सात दिवस बसलेले आहेत. मी स्वत: व माझ्यासोबत प्रहार जनशक्ती पक्षाचे जिल्हाध्यक्ष सुनिल सुतार, डॉ मयूर गायकवाड, सागर गोतपागर, भरत कांबळे आदी मंडळी होती. या सात दिवसात शेकडो लोक येवून आम्हाला भेटून गेले आहेत. पंधरा तारखेला सकाळी आमचं आमरण उपोषण सुरू झाले होते. आम्ही चौघेच आमरण उपोषणाला बसलो होतो. या चौघात सागर गोतपागर होते. दुपारी एकच्या सुमारास ग्रामिण रूग्णालयाची वैद्यकीय टिम येवून आमची आरोग्य तपासणी करून गेली आहे. सायंकाळी साडे सहा ते सात वाजता सिव्हील सर्जन संजय साळूंखे यांनी अँडिशनल सिव्हील सर्जन अधिक पाटील यांना आमच्याशी चर्चा करायला पाठवून दिले होते. त्यांनी आमच्याशी चर्चा केली, आमच्या मागण्या मान्य केल्या आणि साधारण सात ते साडे-सातनंतर आमचे आंदोलन संपले. यावेळी विट्याचे तहसिलदार ऋषिकेत शेळके साहेब तिथे आहेत. त्यांच्यासोबत त्यावेळचे आमचे फोटो आणि शुटींगही आहे. ग्रामिण रूग्णालयाची टिम तिथे आहे, काही पत्रकार तिथे आहेत. विट्यातील अँड तानाजीराव जाधव यांच्यासह काही वकील मंडळीही तिथे आहेत. विशेष म्हणजे याच काळात सागर गोतपागर यांनी सदरची बातमी मँक्स महाराष्ट्रच्या फेसबुक पेजवर लाईव्ह केली आहे. त्यांनी आंदोलन यशस्वी झाल्याची लाईव्ह बातमी दिली आहे. सदरची बातमी फेसबुकवर सुमारे दहा ते वीस हजार लोकांनी तरी पाहिली असेल. नऊ ते पंधरा तारखेपर्यंत हा माणूस सतत आमच्यासोबत आंदोलनात आंदोलक म्हणून आहे. त्याची रितसर नोंदही आहे. असे असताना या बांडगुळांनी सागर गोतपागर यांच्याविरूध्द खोटी तक्रार दाखल केलीय. खंडणी मागितल्याची खोटी तक्रार तब्बल एक महिन्यानी दाखल केली आहे ? जर खंडणीच मागितली होती तर हे तेव्हा झोपले होते का ? जेव्हा मागितली तेव्हा का केस केली नाही ? एक महिन्यांनी तक्रार द्यायला का पुढे आले ? ठेकेदार राहूल साळूंखे याच्याविरूध्द तक्रार दाखल केल्यावरच यांना जाग कशी आली ? दहा जुलैला खंडणी मागितली आणि पंधरा जुलैला पैसे दिले म्हणणारे एक महिना गांजा पिवून पडले होते काय ? या लबाडांच्याकडे एकही पुरावा नसताना निव्वळ सागर गोतपागर यांचा मानसिक छळ आणि त्यांचे खच्चीकरण करण्याच्या उद्देशाने त्यांनी हा प्रकार केला आहे. या लबाडांची लबाडी मोडून पडेल, उघडी पडेल यात तिळमात्र शंका नाही. त्यांनी एका प्रामाणिक माणसावर खोटी तक्रार केली आहे. खंडणीचा आळ घेतला आहे पण इथून पुढे त्यांनी सत्याचा आवाज ऐकावा. ज्यांचा धंदाच लबाडीचा आहे त्यांनी इथून पुढे जपून रहावे. आत्तापर्यंत एक सागर गोतपागर तुमच्याशी भांडत होता. इथून पुढे तुमच्याशी भांडायला शेकडो सागर गोतपागर तयार आहेत. तुमच्या बोगस ठेकेदारीची पोलखोल करायला शेकडो सागर गोतपागर सक्षम आहेत. तीन अपत्ये जन्माला घालूनही सरकारच्या डोळ्यात धुळफेक करत घरात पोलिस पाटलाचे पद कसे घेतले जाते ? पोलिस पाटील म्हणून कसे मिरवता येते ? सरकारची फसवणूक कशी करता येते व केली जाते ? याचाही हिशोब हे शेकडो सागर गोतपागर मांडतील. बेट्यांनो इथून पुढे तुमच्या प्रत्येक कामावार हे सर्व सागर गोतपागर लक्ष ठेवतील. बरं झालं तुम्ही खोटी तक्रार दाखल केलीत ! अजूनही काही तक्रारी दाखल करायच्या असतील तर करून घ्या. बघूया सत्य जिंकतय की लबाडांची टोळी ?

खरेतर सच्चा पत्रकारांसाठी खटले म्हणजे आभुषणं असतात. सागर तुमच्यावरची केस हा तुमच्या इमानदारीचा गौरव आहे. तुमच्यावर दाखल झालेली केस ही तुमच्या इमानदारीची उदघोषणा आहे. लबाडी करणारे, खंडणी मागणारे आणि देणारे मांडवली करून मोकळे होतात. मिटवामिटवीसाठी येरझा-या घालतात. जसे की तुम्ही तक्रार द्यायला आला तेव्हा काही बांडगुळ येरझा-या घालत होती आणि मिटवामिटवीचे निरोप धाडत होती. लबाडांच्या केसेस पोलिस ठाण्यापर्यंत जात नाहीत. त्यांच्यावर कुणी केसेस घालतही नाही. कारण त्यांच्यावर ती वेळच येत नाही. तुम्ही कमळापुरातील प्रस्थापित ठेकेदाराच्या बुडाखाली इमानदारीचा जाळ घातलाय. बुडाला त्याचे चटके बसू लागल्याने ते सैरभैर झाले आहेत. स्वत:ला वाचविण्यासाठी त्यांनी तुमच्यावर खोटी केस दाखल केलीय. हा तुमच्या नव्हे तर त्यांच्या अस्तित्वाचा विषय आहे. सागर, तुम्ही असेच तळपत रहा, अन्याविरूध्द न्यायाचा व सत्याचा आवाज बुलंद करत रहा. तुम्ही बरोबर आहात, तुम्ही प्रामाणिक आहात याचीच साक्ष ही घटना देत राहिल. यातून या लबाडांचे तोंड काळे पडेल यात शंका नाही.

लबाडांच्या आणि चोरांच्या टोळ्या नेहमी सत्याचा आवाज दाबण्याचा प्रयत्न करत असतात. त्यांना सत्याचा आवाज ऐकवत नाही, पेलवत नाही. तो आवाज ऐकावा इतपत त्यांच्या कानात धमक नसते. त्यांच्या मनात प्रामाणिक व इमानदार लोकांची सतत भिती असते. म्हणून ही भामटी व लबाड माणसं प्रामाणिक माणसांना नालायक ठरवण्याचा, त्यांच्यावर खोट्या केसेस टाकण्याचा प्रयत्न करतात. त्यांना त्यांची स्वत:ची औकाद माहिती असते म्हणूनच ते कारस्थानं करून सत्याला नामोहरम करण्याचा प्रयत्न करत असतात. म्हणूणच सागर तुम्ही निर्भयपणे लढत रहा. लबाडाच्या छातीवर पाय देवून पहाडासारखे उभे रहा. विजय तुमचाच असेल. सह्याद्री जेवढा बुलंद आहे तेवढे बुलंद तुमचे इरादे ठेवा. सत्याचा बुलंद सह्याद्री जेव्हा समोर उभा ठाकतो तेव्हा या लबाड व खुज्या टेकड्याचे काय अस्तित्व ? यांना कोण मोजतो ? पत्रकारितेच्या वाटेवर प्रामाणिकपणे प्रवास करताना अशा लबांडांच्या टोळ्या खुप भेटतात. लाचारांच्या, दलालांच्या व चमच्यांच्या झुंडी जागोजाग भेटतात. पण या झुंडीत सत्यासमोर उभी रहायची औकाद आणि हिम्मत नसते. त्यामुळेच ते अशा गोष्टींचा आधार घेतात. या वाटेवर चालत असताना अशी कैक बांडगुळ येतील, गोंगाट करतील, दमदाटी करतील, धमकावतील, भिती घालतील. तुमचा आवाज दाबण्यासाठी खुप प्रयत्न करतील पण दबायचं नाही, डगमगायचं नाही. शेवटी दुस-या झाडावर वाढलेल्या बांडगुळांची औकाद ती काय असते ? ज्याला स्वत:ला जमिनीत रूजता येत नाही, ज्याला स्वत:ची मुळं नसतात अशी बांडगुळं इमानदार व प्रामाणिक माणसाची पाळमुळं कशी काढू शकतील ? त्यांचे ते कामही नाही. तेव्हा सागर निकराने लढत रहा. विरोधात तक्रार केली म्हणून डगमगू नका. अशा वळचणीच्या चिल्यापिल्यांना पाठीशी घालणारी सत्ता कितीही मोठी असली तरी त्याहून मोठे असते ते सत्य. त्यामुळे लबाडांची लबाडी लवकरच उघडी पडेल. काचेच्या घरात राहणार्या माकडांनी लोखंडाच्या घरावर दगड मारल्याने काही फरक पडत नाही. फक्त किंचीत आवाज होतो त्यापेक्षा काही फरक पडत नाही. पण जेव्हा लोखंडाच्या घरातला दगड काचेच्या घरावर पडतो तेव्हा अशा चोरांची घरंच नव्हे तर साम्राज्ये भुईसपाट झाल्याचा इतिहास आहे. तुमच्यावरची खोटी केस ही नव्या इतिहासाची नांदी आहेच पण लबाडांच्या साम्राज्याला लागलेली ओहोटी आहे इतकेच लक्षात ठेवा.