अनैतिक संबंधांत अडथळा; ५० वर्षीय सावत्र आईने मुलाचा घेतला जीव

18

✒️यवतमाळ(पुरोगामी संदेश नेटवर्क)

यवतमाळ(दि.12ऑगस्ट):-अनैतिक संबंधात मुलाचा अडथळा निर्माण होत असल्याने सावत्र आईने प्रियकराच्या मदतीने मुलाचा खून केल्याची घटना मोझर येथे उघडकीस आली. कमलेश दगडू चव्हाण (वय ३२) असे मृताचे नाव आहे. या प्रकरणी नेर पोलिसांनी मृताची सावत्र आई शोभा दगडू चव्हाण (वय ५०) व तिचा प्रियकर नरेंद्र ज्ञानेश्वर ढेंगाळे (वय ४२) यांना अटक केली आहे.

मोझर येथील चिकन व्यावसायिक कमलेश दगडू चव्हाण याचा मृतदेह ४ ऑगस्ट रोजी सकाळी मोझर येथील स्मशानभूमीजवळ पडलेला आढळून आला होता. त्याच्या अंगावर असलेल्या जखमांवरून त्याचा खून करण्यात आल्याचे दिसून येत होते. याप्रकरणी नेर पोलिसांनी गुन्हा नोंदवून तपास सुरू केला. पोलिसांनी केलेल्या चौकशीत मृत कमलेशची सावत्र आई शोभा चव्हाण हिचे गावातील व्यावसायिक नरेंद्र ज्ञानेश्वर ढेंगाळे या दोघांमध्ये अनैतिक संबंध होते. सावत्र मुलगा कमलेशला आपल्या आईचे असे संबंध पसंत नसल्याने त्यांच्यामध्ये नेहमी वाद होत असत. ३ ऑगस्टच्या रात्री याच कारणावरून कमलेशचा आई शोभा आणि नरेंद्र ढेंगाळे यांच्याशी जोरदार वाद झाला होता. त्यामुळे नरेंद्र ढेंगाळे व शोभा या दोघांनी कमलेशला बेदम मारहाण केली. त्यानंतर नरेंद्रने कमलेशला उचलून स्मशानभूमीत नेले व त्याठिकाणीही त्याच्यावर चाकूने वार केले. तसेच त्याठिकाणी पडलेल्या दारूच्या फुटक्या बाटलीनेही त्याला भोसकले.

दरम्यान ४ ऑगस्ट रोजी सकाळी कमलेशचा मृतदेह आढळून आल्याने गावात खळबळ उडाली. नेर पोलिसांनी नरेंद्र ढेंगाळे व शोभा चव्हाण या दोघांना ताब्यात घेऊन त्यांची चौकशी सुरू करताच सुरुवातीला त्यांनी काही सांगण्यास टाळाटाळ केली. पण पोलिसांनी आपला हिसका दाखवताच त्यांनी, आपल्या संबंधात अडसर ठरत असल्यानेच कमलेशचा खून केल्याचे त्यांनी पोलिसांना सांगितले. उपविभागीय पोलिस अधिकारी उदयसिंग चंदेल यांच्या मार्गदर्शनात नेरचे ठाणेदार प्रशांत मसराम, पोलिस उपनिरीक्षक स्वप्नील निराळे यांच्या पथकाने हा तपास केला.