कोरोना काळात अन्नधान्याची साखळी मजबूत

  44

                  ▪️विशेष लेख▪️

  कोरोना प्रादुर्भावामुळे सर्वांचे जनजीवन विस्कळीत झाले आहे. जनजीवन सुरळीत होण्यासाठी तसेच नागरिक उपाशी राहणार नाही. गरीब, गरजू, स्थलांतरित, कष्टकरी, बेघर नागरिकांना अन्नधान्य मिळावे यासाठी अन्न नागरी पुरवठा विभागांतर्गत कोरोना काळामध्ये उल्लेखनीय कामगिरी केली आहे.या काळात अन्नधान्याचे वितरण व शिवभोजन थाळी वितरणातून जिल्ह्यामध्ये आम्ही कुणीच उपाशी राहणार नाही, यासाठी आम्ही प्रामाणिक प्रयत्न केल्याचे समाधान आहे.

  जिल्ह्याचा पालकमंत्री या नात्याने जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत पुरवठा विभाग यांच्या वेळोवेळी बैठकी घेतल्या. यापुर्वीचे जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमनार, जिल्हा पुरवठा अधिकारी राजेंद्र मिस्किन यांनी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पुरवठा विभागाची साखळी खंडित होणार नाही यासाठी नियोजन करून त्याप्रमाणे कार्य केले.

  या सर्व केलेल्या नियोजनामुळे जिल्ह्यात मार्च महिन्यापासुन तर आजपर्यंत 3 लाख 59 हजार 719 शिवभोजन थाळींचे वितरण करण्यात आले आहे. तर राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेत गहू व तांदूळ 3 लाख 89 हजार 714 क्विंटल, प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेत गहू व तांदूळ 2 लाख 99 हजार 704 क्विंटल, केशरी शिधापत्रिकांना गहू 7 हजार 566 क्विंटल व तांदूळ 4 हजार 933 क्विंटल, तर आत्मनिर्भर योजनेत तांदूळ 5 हजार 520 क्विंटल व चना 358 क्विंटल अन्नधान्याचे वितरण सर्वांपर्यंत सुरळीत झाले .

  जिल्ह्यामध्ये अंत्योदय अन्न योजना शिधापत्रिकांची संख्या 1 लाख 37 हजार 838 असून लाभार्थी संख्या 5 लाख 20 हजार 407 आहे. प्राधान्य कुटुंब लाभार्थी शिधापत्रिकांची संख्या 2 लाख 58 हजार 949 असून लाभार्थी संख्या 10 लाख 37 हजार 173 आहे.

  प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेचे अंत्योदय अन्न योजनेत 5 लाख 20 हजार 407 लाभार्थी आहे.तर प्राधान्य कुटुंबातील 10 लाख 37 हजार 173 लाभार्थी आहे. एपीएल अर्थात केशरी शिधापत्रिकांची 46 हजार 198 संख्या असून 1 लाख 59 हजार 804 लाभार्थी आहेत.

  आत्मनिर्भर भारत योजनेअंतर्गत 32 हजार 642 शिधापत्रिकाधारक असणाऱ्या 1 लाख 16 हजार 124 लाभार्थ्यांना मे व जुन महिन्यांमध्ये मोफत तांदूळ व अख्खा चना वाटप करण्यात आला आहे.

  कोरोनाच्या काळामध्ये जिल्हा पुरवठा कार्यालय, तालुका पुरवठा कार्यालय, स्वस्त धान्य दुकान या सर्वांनीच उत्तम कार्य करून शिवभोजन थाळी वितरण व अन्नधान्याचा पुरवठा सुरळीत होण्यासाठी उत्तम कार्य केले आहे.

  राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची महत्वाकांशी शिवभोजन योजना जिल्ह्यात नागरिकांच्या पसंतीला उतरली. भोजन थाळीचा आस्वाद कोरोनाच्या काळामध्ये जिल्ह्यातील नागरिकांनी अवघ्या 5 रुपयात घेतला. सर्वसामान्यांना शिवभोजन थाळी मिळावी या हेतूने शिवभोजन केंद्राचा विस्तार करून जिल्ह्यात 22 ठिकाणी शिवभोजन केंद्रे सुरू करण्यात आली आहे. लॉकडाऊनच्या काळामध्ये हातावर पोट असणाऱ्या नागरिकांना कमी किमतीमध्ये भोजन मिळण्यासाठी 10 रुपये असणाऱ्या भोजन थाळीची किंमत कमी करून फक्त 5 रुपयात शिवभोजन थाळी वितरित करण्यात आली.

  कोरोना संसर्ग होणार नाही यासाठी विशेष खबरदारी घेऊन वेळोवेळी शिवभोजन केंद्राचे निर्जंतुकीकरण करण्यात येत आहे. लाभार्थ्यांचे थर्मल स्क्रीनिंग करणे, सॅनीटायजर, मास्कचा वापर करून शिवभोजन थाळी पॅक फुडमध्ये वितरित करण्यात येत आहे. भोजन बनवितांना सुद्धा विशेष काळजी घेण्यात येत आहे.

  जिल्ह्यातील प्रत्येक नागरिकांपर्यंत अन्नधान्याचा पुरवठा होण्यासाठी राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजना, प्रधानमंत्री गरीब कल्याण योजना, आत्मनिर्भर योजना या सर्व योजनेअंतर्गत अन्नधान्याचे वितरण करण्यात आले आहे. तसेच केशरी कार्डधारकांना सुद्धा अन्नधान्याचा लाभ मिळावा यासाठी विशेष प्रयत्नातून वितरण करण्याच्या सुचना वेळोवेळी पालकमंत्री या नात्याने संबंधितांना दिलेत. त्यामुळे आज सर्व नागरिकांना अन्नधान्य मिळत आहे.

  लॉकडाऊनच्या काळात परराज्यातील, परजिल्ह्यातील कामगार जिल्ह्यात अडकलेले होते तसेच अनेक नागरिकांकडे शिधापत्रिका नसल्याने त्यांना अन्नधान्य मिळण्यासाठी अडचण जात होती. ही अडचण लक्षात घेता जिल्ह्यामध्ये अन्नधान्य किटचे वाटप करण्यात आले.

  नागरिकांना अन्नधान्य संदर्भात कोणत्याही प्रकारची अडचण अथवा माहिती उपलब्ध व्हावी यासाठी वेगळा दूरध्वनी क्रमांक सुरू करण्यात आला. याअंतर्गत अनेक नागरिकांच्या अन्नधान्य संदर्भातील अडचणी दूर करून त्यांच्यापर्यंत अन्नधान्य पोहोचविता आले. महानगरपालिका अंतर्गत कम्युनिटी किचन, जेवणाची व्यवस्था सुरू करण्यात आली. तसेच लॉकडाऊनच्या काळात जीवनावश्यक वस्तूंचे वहन करणाऱ्या वाहनांना परवानगी देण्यात आली.

  राज्य शासनाने वेळोवेळी अन्नधान्य असो वा शिवभोजन थाळी असो यासाठी विशेष निर्णय घेण्यात आले. कोरोना सदृश्य परिस्थितीत स्वस्त धान्य दुकानात अतिरिक्त महिन्याचे अधिकचे धान्य उपलब्ध करण्यात येत आहे. त्यामुळे जिल्ह्यात कोणत्याच प्रकारचा धान्याचा तुटवडा जाणवत नाही.

   

  ✒️ना. विजय वडेट्टीवार

  (मंत्री- मदत व पुनर्वसन,आपत्ती व्यवस्थापन,इतर मागास बहुजन कल्याण विकास,तथा पालकमंत्री)

  ——————————————————————–