महाकाली मंदिर विकास कार्यक्रमाच्या धर्तीवर सोमनाथ देवस्थान परिसराचा विकास करणार

28

🔹कर्मवीर कन्नमवार यांनी उद्घाटन केलेल्या इमारतीच्या नूतनीकरणाचा शुभारंभ करण्याचे भाग्य लाभल्याचा आंनद

🔸आ. सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते मारोडा गावात ग्राम प्रशासकीय भवनाचे व सौर ऊर्जा पाणी पुरवठा योजनेचे लोकार्पण

✒️मूल(पुरोगामी संदेश नेटवर्क)

मूल(दि.16ऑगस्ट):-मारोडा या गावाला माजी मुख्यमंत्री कर्मवीर मा. सा. कन्नमवार यांच्या स्मृतींचा सुगंध लाभला आहे. या गावातील ग्रामपंचायतीच्या इमारतीचे उद्घाटन 9 डिसेंबर 1956 रोजी कर्मवीर कन्नमवारांनी केले त्याच इमारतीच्या नुतनीकरणाच्या कामाचा शुभारंभ करण्याचा बहुमान मला लाभला यासाठी मी स्वतःला भाग्यवान समजतो. या गावात अनेक विकासकामे मी पूर्णत्वास आणली . चंद्रपूरच्या माता महाकाली देवस्थान विकास आराखड्याच्या धर्तीवर सोमनाथ देवस्थानाचा विकास करणार असल्याची घोषणा माजी अर्थमंत्री आ. सुधीर मुनगंटीवार यांनी केली.

स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून मुल तालुक्यातील मारोडा गावात आयोजित ग्रामपंचायतीच्या इमारतीचे नूतनीकरण करून बांधण्यात आलेल्या ग्राम प्रशासकीय भवनाचे लोकार्पण , सौर ऊर्जेवरील पाणी पुरवठा योजनेचे लोकार्पण , ऑटोमॅटिक सॅनिटायझर मशीनचे लोकार्पण व वृक्षारोपण कार्यक्रमात आ. सुधीर मुनगंटीवार बोलत होते . यावेळी जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष सौ संध्या गुरनुले , पंचायत समितीचे सभापती चंदू मारगोनवार , संवर्ग विकास अधिकारी कपिल कलोडे ,उपसभापती घनश्याम जुमनाके, सरपंच सौ स्वाती पुनकटवार , उपसरपंच सौ सुलभा ननावरे , ग्रामपंचायत सदस्य पंकज पुल्लावार आदींची प्रामुख्याने उपस्थिती होती.

यावेळी बोलताना आ. मुनगंटीवार पुढे म्हणाले की ,लाखो शहिदांनी आपल्या प्राणांची आहुती देत स्वातंत्र्याचा मंगलकलश आपल्याला सोपविला आहे. जात पात धर्म पंथ पक्ष यांच्या भिंती बाजूला सारून देशाला विकासाच्या मार्गावर अग्रेसर करण्यासाठी आपल्याला प्रयत्न करावयाचे आहे. त्यासाठी प्रत्यक्ष कृती करण्याची गरज आहे. मारोडा ही कर्मवीर कन्नमवारांची भूमी आहे . त्यांच्या कर्तृत्ववान स्मृती जपण्यासाठी मी विरोधी पक्षात असताना त्यांचे स्मारक मूल शहरात उभारले. मा. सा. कन्नमवार ही एक विचारांची देण आहे , खजिना आहे . त्यांच्या स्मृती जपत त्यांची शिकवण अंगिकारण्याची गरज आहे. या गावात शासकीय कृषी महाविद्यालय आपण सुरू केले.

गावातील 35 वर्ष जुनी जिर्ण वितरण पाईपलाईन बदलून नवीन पाईपलाईन उपलब्ध केली ,संपूर्ण गावात एलईडी लाईट व हाईमाक्स लाईट बसविले , तीन आरो प्लॅन्ट उपलब्ध केले , जेके ट्रस्ट व टाटा ट्रस्ट च्या माध्यमातून गावाचा विकास केला , दवाखाना आधुनिकीकरण,अंगणवाडी नूतनीकरण करत गावात विविध ठिकाणी बोरवेल उपलब्ध केल्या. चांदा ते बांदा योजनेअंतर्गत दुधाळ जनावर उपलब्ध केलीत.डोळ्यांचे आँपरेशन्स व चष्मे वितरण केले . उज्ज्वला योजनेच्या माध्यमातून सिलिंडर वितरण केले . सर्व सात अंगणवाडी स्मार्ट अंगणवाड्या म्हणून विकसित केल्या. जि.प शाळा 13 वर्ग खोल्या इ लर्निंग ने सुसज्ज केल्या. नवीन शाळा ईमारत निधी उपलब्ध करून दिला अशी विकासकामांची मोठी मालिका या गावात आपण तयार केली. नागरिकांनी केलेल्या मागणीला आपण नेहमीच सकारात्मक प्रतिसाद दिला. येथील कृषी महाविद्यालय देशातील उत्तम कृषी महाविद्यालय व्हावे म्हणून आपण प्रयत्न करणार आहोत. सोमनाथ देवस्थान परिसराचा विकास प्राधान्याने आपण करणार असून रेल्वे थांब्यावर प्लॅटफॉर्म व आवश्यक सोयी सुविधा आपण लवकरच उपलब्ध करू व रस्त्याचे बांधकाम खनिज विकास निधीतून हाती घेऊ अशी ग्वाही त्यांनी यावेळी बोलताना दिली.

यावेळी उपस्थित नागरिकांना मास्क व आर्सेनिक अलब्म 30 या गोळ्यांचे वितरण करण्यात आले. आ. मुनगंटीवार यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले तसेच त्यांच्या पुढाकाराने ग्राम प्रशासकीय भवनात ऑटोमॅटिक सॅनिटायझर मशीन उपलब्ध करण्यात आले . सोशल डिस्टंसिंग पाळत कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला.