गुरांच्या लम्पी आजारावर चंद्रपूर जिल्ह्यात२ लक्ष ३० हजार लसीकरणाचे नियोजन : ना. विजय वडेट्टीवार

25

🔸६४ हजार लसीचे लसीकरण सुरू ;बाधीत जनावरे वेगळी ठेवा

✒️चिमुर(पुरोगामी संदेश नेटवर्क)

चिमुर(दि.१६ऑगस्ट):-चंद्रपूर जिल्ह्यातील ग्रामीण भागात गुरांना लम्पी या त्वचेच्या आजाराला प्रतिबंध करणाऱ्या 64 हजार लसीचे जिल्ह्यात वितरत करण्यात आले आहे. सोमवारपासून बाधित जनावरे असणाऱ्या भागात लसीकरणाची मोहीम राबविण्यात येणार आहे, अशी माहिती राज्याचे मदत व पुनर्वसन, आपत्ती व्यवस्थापन, इतर मागास बहुजन कल्याण मंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री ना. विजय वडेट्टीवार यांनी चिमूर येथे दिली.
चिमूर येथे उपविभागीय कार्यालयात कोरोना संदर्भात विभागाची आढावा बैठक घेत असताना शेतकऱ्यांच्या शिष्टमंडळाने या आजाराबाबत तातडीने पावले उचलण्याची मागणी केली. तथापि, या लसीचे वितरण शुक्रवारपासूनच सुरू झाले आहे. सोमवारपासून बाधित अधिक असणाऱ्या भागात लसीकरण राबवण्यात येईल, असे त्यांनी सांगितले.

काल 15 ऑगस्ट रोजी आपल्या भाषणामध्ये या संदर्भात उल्लेख केला होता. जिल्हाधिकार्‍यांना यासंदर्भात निर्देश दिले आहेत. याशिवाय दोन दिवसांपूर्वीच पुणे येथील संबंधित कार्यालयाशी संपर्क साधून उर्वरित लसीची उपलब्धता करून देण्याबाबत निर्देश दिले असल्याचे त्यांनी सांगितले.

जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी, जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त यांना यासंदर्भात अवगत करण्यात आले आहे. शुक्रवारीच 64 हजार लसी जिल्ह्यात पोहचल्या असून जिल्हा परिषदेमार्फत जिल्हा पशुसंवर्धन अधिकाऱ्यांमार्फत लसीचे वितरण देखील सुरू झाले आहे. सोमवारपासून यासंदर्भात जिल्हाभरात अभियान राबविण्यात येणार आहे. तथापि, शेतकऱ्यांनी ज्या जनावरांना बाधा झाली आहे. अशांना वेगळे ठेवावे, असे आवाहन त्यांनी केले.

बाधित झालेल्या जनावरांवर उपचार आणि जे बाधित झाले नाही, त्यांना तातडीचे लसीकरण मोहीम जिल्ह्यात राबविण्यात येत आहे. या मोहिमेचा लाभ घ्यावा, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.
जिल्ह्यातील पशुधनावर आलेल्या या आजारात संदर्भातील माहिती राज्याचे पशुसंवर्धन मंत्री सुनील केदार यांना देण्यात आली आहे. त्यांनी देखील जिल्ह्यामध्ये तातडीने उपचाराच्या सोयी उपलब्ध होईल यासाठी प्रयत्न करण्याचे स्पष्ट केले आहे.

जिल्ह्याच्या सर्वदूर भागांमध्ये सध्या जनावरांवर हा आजार आला असल्याचे वृत्त आहे. त्यामुळे काल जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये झालेल्या आढावा बैठकीत जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी या दोनही अधिकाऱ्यांना उपाययोजना सक्त व सुलभतेने करण्याचे निर्देश देण्यात आले आहे. एकूण दोन लाख 30 हजार लसींचा प्रस्‍ताव सादर करण्यात आला होता. त्यापैकी ६५ हजार लसी पोहचल्या आहेत. उर्वरित लसी संदर्भात आपला पाठपुरावा सुरू असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. यावेळी शिष्टमंडळातील शेतकऱ्यांना तातडीने मदत मिळावी यासाठी चिमूर उपविभागीय अधिकारी संपकाळ यांना यावेळी त्यांनी निर्देश दिले.