गणेशोत्सव मर्यादीत व घरच्या घरी साजरा करावा – खासदार बाळू उपाख्य सुरेश धानोरकर

14

🔹जिल्हा शांतता समितीची बैठक संपन्न

✒️चंद्रपूर(पुरोगामी संदेश नेटवर्क)

चंद्रपूर(दि.17ऑगस्ट):- गणेशोत्सव साजरा करताना यावर्षी सर्व घरगुती व सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांमध्ये मातीपासून बनविण्यात आलेल्या कमी उंचीच्या मूर्तींची प्रतिष्ठापना करण्याचे तसेच सार्वजनिक स्वरूप न देता घरच्या घरीच उत्सव साजरा करावा असे आवाहन खासदार बाळू उपाख्य सुरेश धानोरकर यांनी केले. पोळा व गणेशोत्सव व येणाऱ्या आगामी उत्सवाच्या निमित्ताने पोलीस मुख्यालयात आयोजित शांतता समितीच्या बैठकीत ते बोलत होते.

जिल्हा प्रशासन आगामी काळात येणारे उत्सव व त्याचे नियोजन शांतता कमिटीच्या माध्यमातून बैठका घेऊन तालुका व ग्रामीण स्तरावर चांगले नियोजन करण्यास सक्षम आहे. सामाजिक अंतर राखून उर्वरित सण साजरे केले तसेच येणारे उत्सव सुद्धा काळजीपूर्वक व नैतिकतेने पार पाडण्याच्या सूचना खासदार बाळू उपाख्य सुरेश धानोरकर यांनी केले.

यावेळी आमदार किशोर जोरगेवार, महापौर राखी कचंर्लावार, जिल्हाधिकारी अजय गुल्हाने, अपर जिल्हाधिकारी विद्युत वरखेडकर, मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल कर्डिले, जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ.महेश्वर रेड्डी , चंद्रपूर महानगरपालिका आयुक्त राजेश मोहिते, अतिरिक्त पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे, उपजिल्हाधिकारी श्रीमती कर्डिले, शांतता समितीचे पदाधिकारी व गणेश मंडळाचे सदस्य प्रामुख्याने उपस्थित होते.

कोरोना संसर्गाची परिस्थिती लक्षात घेता गणेशोत्सव, पोळा व आगामी काळात येणारे उत्सव अगदी साधेपणाने पार पाडायचे आहेत, कोणताही उत्सव साजरा करताना पोलीस प्रशासन, महानगरपालिका कडून रीतसर परवानगी घ्यावी. गणेशोत्सव साजरा करताना यावर्षी धातूची व लाकडाची मूर्तीची प्रतिष्ठापना करावी. मास्क, सॅनीटायजरचा वापर करावा.सामाजिक अंतर पाळावे.वृद्ध मंडळी, लहान मुले यांनी शक्यतो उत्सव टाळावेत. अशा सूचना जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी दिल्यात.

आगामी काळात येणारा गणेशोत्सव अगदी साध्या पद्धतीने घरच्या घरी साजरा करावा, गणपतीच्या आगमन व विसर्जनाच्यावेळी कुठल्या प्रकारची गर्दी होऊ नये, व मिरवणूका काढण्यासाठी सक्त मनाई करण्यात आली आहे.कोणत्याही व्यक्तीने अथवा गणेश मंडळाने दिलेल्या सूचनांचे पालन करून प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहन जिल्हा पोलीस अधीक्षक डॅा. महेश्वर रेड्डी यांनी केली आहे.

मानवी जीवनापेक्षा कोणताही उत्सव मोठा नाही त्यामुळे कोरोना संसर्गाच्या काळात बाहेर न पडता घरीच उत्सव साजरा करून प्रशासनाला सहकार्य करावे. व लॉकडाउनचे सर्व नियमांचे पालन करावे त्यासोबतच आगामी कोरोना काळात येणारे सर्व उत्सव शांततेत पार पडतील याकडे लक्ष द्यावे त्यासोबतच गणेशोत्सव काळात विसर्जनासाठी दोन तारखा ठरवून दोन दिवसाची विसर्जनाची परवानगी देण्यात यावी. कोरोनाचा मुकाबला करण्यास आपले महत्त्वाचे योगदान द्यावे असे मत जिल्ह्याचे आमदार किशोर जोरगेवार यांनी यावेळी व्यक्त केले.

कोरोना संसर्गाच्या काळात स्वतःचे रक्षण स्वतः करा, स्वतः सोबतच इतरांच्या आरोग्याची सुद्धा काळजी घ्या. असा मोलाचा संदेश महापौर राखी कंचर्लावार यांनी उपस्थितांना दिला. यावर्षी महानगरपालिका प्रशासनातर्फे घरोघरी जाऊन विसर्जित मूर्ती घेणार यासाठी मोबाईल विसर्जन कुंड हा उपक्रम जिल्ह्यात राबविण्यात येणार असल्याचे देखील त्यांनी यावेळी सांगितले.

या बैठकीत शांतता समितीचे सदस्य सदानंद खत्री, सय्यद रमजान अली, धनंजय दानव, अंजली घोटेकर, प्रशांत हजबल,उमाकांत धोटे, नरेंद्र बोबडे, शालिनी भगत व अन्य उपस्थित मान्यवरांनी आपल्या सुचना व समस्या देखील मांडल्या.

कार्यक्रमाचे संचालन सय्यद रमजान अली यांनी केले. कार्यक्रमाचे प्रास्‍ताविक जिल्‍हा पोलीस अधीक्षक डॉ.महेश्वर रेड्डी तर आभार प्रदर्शन अतिरिक्त पोलिस अधीक्षक प्रशांत खैरे यांनी केले.