मारबत-बडग्याविना पोळा

43

✒️नागपूर(पुरोगामी संदेश नेटवर्क)

नागपूर(दि.18ऑगस्ट):-ऐतिहासिक परंपरेसह सामाजिक प्रश्नांवर प्रहार करणाऱ्या मारबत उत्सवाविना यंदाच पोळा नागपूरकर अनुभवणार आहे. शेकडो वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदा ही मिरवणूक रद्द करण्यात झाली आहे. त्यामुळे ‘घेऊन जा गे मारबत’च्या आरोळ्या, डीजे-संदलच्या तालावर नाचत-गाजत मिरवणुकीसोबत फिरणे आणि एकमेकांची टर उडविणे, राजकारणी-पाकिस्तानच्या नावाने शिव्याची लाखोळी वाहणे आदी गोष्टींना नागपूरकर मुकणार आहेत.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘स्वच्छता अभियाना’ला सुरूवात केली. मात्र गेली कित्येक वर्षी नागपुरात अशी स्वच्छता अभियानाची एक अनोखी परंपरा आहे. ‘मारबत व बडग्या’ हा जगातला एकमेव असा मिरवणुक प्रकार फक्त नागपूरातच आहे. या काळात रोगराई वाढते. त्यामुळे साधारणत: दरवर्षीच ‘ईडा पिडा घेऊन जाऽऽ गे मारबत’ अशी घोषणा देत या उत्सवाला प्रारंभ करण्यात येतो. मारबत आणि बडग्या हे वाईट शक्तींचे प्रतीक मानले जातात. त्यामुळे या वाईट शक्तींची धिंड काढून त्यांना शहराबाहेर दहन करण्याची आणि शहर स्वच्छ, प्रदूषणमुक्त आणि समस्याविरहित ठेवण्याचा उद्देश या उत्सवामागे आहे. यात काळी आणि पिवळी मारबत महत्त्वाची मानली जाते. तान्हा पोळ्याच्या दिवशी मारबत काढण्याची परंपरा १४० वर्षांपासून आजतागायत सुरू आहे. समाजातील अनिष्ट रुढी, रोगराई दूर करण्याचे साकडे घालत ‘ईडा पिडा घेऊन जाऽऽ गे मारबत’ असे म्हणत मारबतीची मिरवणूक काढण्यात येते. त्याचबरोबर राजकारणी, भ्रष्टाचार, दहशतवाद आदी मुद्यांवर बडगे उभारण्यात येतात. वर्षभर चर्चेत राहणाऱ्या समस्या, प्रश्नांना या माध्यमातून वाचा फोडण्यात येते. यावर्षी मात्र, करोनाच्या पार्श्वभूमीवर मारबत मिरवणूक रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे यंदाचा पोळा मारबतीविना सुनासुना वाटत असला तरी प्रादुर्भावाचा विचार करता घेण्यात आलेला निर्णय योग्य असल्याची भावना आहे.

पिवळी, काळी मारबत तयार

गर्दी होऊ नये यासाठी पूर्ण काळजी घेण्यात आली आहे. मारबत उत्सवांतर्गत पोळ्याच्या सात दिवस आधीपासून होणारे डहाका, खडी गंमत, पोवाडा, गोंधळ आदी कार्यक्रम यावर्षी घेण्यात आले नाही. मात्र, परंपरा खंडीत होऊ नये यासाठी मस्कासाथ येथील तऱ्हाणे तेली समाजाची पिवळी तसेच बारदाना मार्केटमधील काळी मारबत तयार करून नेहमीच्या जागी पूजेसाठी ठेवण्यात आली. या दोन्ही मारबतींची पोळ्याच्या दोन्ही दिवशी पूजा करण्यात येणार आहे. त्यानंतर तान्हा पोळ्याच्या सायंकाळी अत्यंत साधेपणाने दहन करण्यात येईल.