अधिस्वीकृतीपत्रिका हीच पात्रता ग्राह्य धरून तातडीने पेन्शन मंजूर करावी

9

🔸असोसिएशन ऑफ स्मॉल अँड मेडियम न्यूजपेपर्स ऑफ इंडिया या संघटनेच्या राज्य शाखे मार्फत मुख्यमंत्र्यांना साकडे

✒️सांगली(पुरोगामी संदेश नेटवर्क)

सांगली(दि.20ऑगस्ट):- राज्य सरकारने ज्येष्ठ पत्रकारांसाठी सुरू केलेल्या पेन्शन योजनेंतर्गत काहीजणांना पेन्शन मंजूर झाली आहे. मात्र, उर्वरित अर्ज केलेल्या ज्येष्ठ पत्रकारांना ही पेन्शन तांतडीने द्यावी, अशी मागणी असोसिएशनऑफ स्मॉल अँड मेडियम न्यूजपेपर्स ऑफ इंडियाचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष आप्पासाहेब पाटील यांनी मुख्यमंत्री नामदार उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे.

या संघटनेचा यासाठी सातत्याने पाठपुरावा सुरू होता व आहे.सरकारने आचार्य बाळशास्त्री जांभेकर पत्रकार सन्मान योजना ही पत्रकारांसाठी पेन्शन योजना सुरू केली असून वयाची साठ वर्षे पूर्ण केलेल्या, तीस वर्षे पत्रकार म्हणून काम केलेल्या आणि किमान दहा वर्षे अधिस्वीकृती प्राप्त असलेल्या ज्येष्ठ पत्रकार, संपादक, छायाचित्रकार, स्वतंत्र व्यवसायी पत्रकार यांना पेन्शनसाठी पात्र मानले जाते. शासनाच्या नियम व निकषानुसार निवृत्तिवेतन मिळण्यास ते पात्र ठरतात.

म्हणून शासनाने अर्थसंकल्पात आचार्य बाळशास्त्री जांभेकर पत्रकार सन्मान योजनेसाठी तरतूद करून रक्कम वर्गही केली आहे.राज्य शासनाकडे केलेल्या अर्जापैकी जवळ जवळ १६३ अधिस्वीकृतीधारक ज्येष्ठ पत्रकारांना सन्मान योजना मंजूर झाली असून, उर्वरित अर्ज निर्णयाविना तसेच पडून आहेत. पेन्शनचा लाभ मिळवण्यासाठी नोकरी सुरू केली तेव्हांच्या नियुक्तीपत्रांची व पगार पत्रकाची मागणी केली जात आहे.
मात्र पूर्वी वृत्तपत्रे नियुक्तीपत्र देत नव्हते. त्यांना पगार व्हौचरवर दिला जात होता. आयुष्यभर प्रामाणिकपणे
काम करणाऱ्या पत्रकारांना माहिती कार्यालय व माहिती व जनसंपर्क संचलनालयाचे हेलपाटे मारावे लागत आहेत.

आर्थिक व प्रकृतीच्या कारणाने काही जणांना ते शक्य होत नाही. म्हणून मुख्यमंत्री नामदार उद्धव ठाकरे यांनी याकामी लक्ष घालून आणि ज्येष्ठ पत्रकारांना वृद्धापकाळात मध्ये हाल-अपेष्टा सहन करावा लागू नयेत. याकरिता हस्तक्षेप करून ३० वर्षे अनुभव व ६० वर्षे वयाची पूर्ण केलेल्या ज्येष्ठ पत्रकारांना महाराष्ट्र शासनाने ज्येष्ठ अधिस्वीकृतिधारक पत्रकार म्हणून दिलेली अधिस्वीकृतीपत्रिका हीच पात्रता ग्राह्य धरून इतर नियमाची पूर्तता करणाऱ्या पात्र पत्रकारांना योजनेचा लाभ द्यावा. अशी मागणी असोसिएशन ऑफ स्मॉल अँड मेडियम न्यूजपेपर्स ऑफ इंडियाचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष श्री. आप्पासाहेब पाटील यांनी केली असून तसे सांकडे मुख्यमंत्र्यांना घातले आहे.