…तर महाराष्ट्रातील सत्ता सोडू; विजय वडेट्टीवारांनी वाढवले महाविकास आघाडीचे टेन्शन

20

✒️मुंबई(पुरोगामी संदेश नेटवर्क)

मुंबई(दि.24ऑगस्ट):-राहुल गांधी हे काँग्रेसचे अध्यक्ष झाले आणि त्यांनी राज्यातील महाविकास आघाडीतून बाहेर पडण्याची सूचना केली तर सत्ता सोडू,’ असं मत मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी व्यक्त केलं आहे. त्यांच्या या वक्तव्यामुळं आता वेगळीच चर्चा सुरू झाली आहे.

पक्षाच्या अध्यक्षपदावरून सध्या काँग्रेसमधील अंतर्गत वातावरण ढवळून निघालं आहे. सोनिया गांधी यांनी हंगामी अध्यक्षपद सोडण्याचे संकेत दिल्याने नव्या नेतृत्वाची चर्चा सुरू झाली आहे. काही नेत्यांचा राहुल गांधी यांच्या नावाला पाठिंबा आहे तर काहींनी आडमार्गाने विरोध दर्शवला आहे. त्याच पार्श्वभूमीवर विविध नेते आपापली मतं मांडत आहेत.

अशोक चव्हाणांप्रमाणेच विजय वडेट्टीवार यांनीही राहुल गांधी यांच्या नावाला पाठिंबा दर्शवला आहे. मात्र, महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकारच्या स्थापनेबाबत राहुल गांधी फारसे अनुकूल नव्हते, अशी चर्चा आहे. यावरही वडेट्टीवार यांनी भाष्य केलं. ‘महाविकास आघाडीच्या स्थापनेच्या प्रक्रियेत राहुल गांधी हे देखील होते. त्यांनी सखोल चर्चा करूनच महाविकास आघाडी सरकार स्थापण्यास होकार दिला होता. उद्या ते अध्यक्ष झाले आणि सरकारमधून बाहेर पडण्याच्या सूचना केल्यास आम्ही सत्ता सोडू,’ असं वडेट्टीवार म्हणाले. ‘गांधी घराण्यातीलच व्यक्ती पक्षाचा अध्यक्ष व्हावा, अशी अपेक्षा व्यक्त करतानाच, काँग्रेसचे कार्यकर्ते म्हणून आम्ही हायकमांडच्या निर्णयासोबत राहू, अशी ग्वाही त्यांनी दिली.