एक तरी पूर्ण कला वर्षभरात शिका

17

✒️लेखक:-प्रा.राजेंद्र दशरथ सोनवणे(शिक्षणतज्ञ, कवी वादळकार,पुणे)मो:-9657348322

▪️ संकलन:-अंगद दराडे(बीड, विशेष प्रतिनिधी)मो:-8668682620

आयुष्यात एक तरी कला शिकलीच पाहिजे.कलेने माणसांचे आयुष्य समृध्द होत असते.कलेने जीवन जगण्याचा मार्ग सुकर होतो.एक ही कला नसलेला माणूस हा दगडच म्हणावा लागेल.ज्याच्यामुळे माणसांच्या भाव-भावनांचा आविष्कार होतो.ती कला ही आपल्याला एक तरी आलीच पाहीजे.

“हिच खरी कला शिकावी ।यानेच जीव तरतील भवी । मरणावरीही कीर्ति रहावी । कलाकाराची ।।८४।।ग्रामगीता।”

आज विद्यार्थ्यांची शाळा सुरु करण्या संदर्भात सर्वांच्या मनात एक भीती व नैराश्याची भावना निर्माण झाली आहे.देशाचे भविष्य हे शाळेत घडत असते.देश भविष्याचे स्वप्न शाळेत शिकणा-या विद्यार्थ्यांच्या दृष्टीने पाहत असतो.तेव्हा या वर्षी कोरोनामुळे आपल्या मुलांचे अर्धे शैक्षणिक वर्ष वाया गेलेच आहे.आता ही आपणाला पुर्णपणे व सुरक्षित शाळा सुरु करता येण्यासारखे वातावरण ही नाही.

“एकाहूनि दुसरा कलाधिकारी ।अधिक टाकी मोहनी समाजवरि। आपुले मंञ साजवी मधुरी ।वाणी-वीणा वाजवोनि ।।३१।।ग्रामगीता।”

माझ्या मते या वर्षीचे शैक्षणिक वर्ष बाद करावे.सर्व विद्यार्थ्यांना दिले जाणारे आॅनलाईन शिक्षण ही बंद करावे आणि विद्यार्थ्याला या पूर्ण वर्षात एक तरी “कला” पूर्णपणे आत्मसात करण्यास लावावी.त्यासाठी शिक्षक व शाळांचा सहभाग हा कायम ठेवून….प्रत्येक विद्यार्थ्याचा दर आठवड्याला कोणत्या कलेचा,काय पाठ शिकला आणि किती आत्मसात केला.याचा एक मोबाईवर व्हीडीओ बनवुन आपल्या वर्गशिक्षकांकडे पाठवावा.उदा.त्याने जर “तबला” हि कला शिकण्याचे ठरविले तर त्याने दर आठवड्याला किती शिकला.त्याचा व्हीडीओ आपल्या वर्ग शिक्षकांना पाठवावा.

“नाना कला,नाना रंग ।नाना स्वभाव,नाना उद्योग । नाना वस्ञे,भूषणे,उपभोग।भोगणारे निर्मिले ।।२०।।ग्रामगीता।”

वर्ग शिक्षकांनी तो पाहुन आपल्याकडे जमा करावा.तो व्हीडीओ शाळेच्या असणा-या रेकाॅर्ड काॅम्पुटर मध्ये संग्रही करुन ठेवावा.असा दिनक्रम वर्षभर त्याने करावा.त्या कलेत पारंगत व्हावे.

“कोणी शिकला चातुर्यकला ।साहित्य,अभिनय मोही जगाला। परि तेणे स्वार्थापायी घातला।समाज पतनी ।।७२।।ग्रामगीता।”

म्हणजेच या शैक्षणिक वर्षात अभ्यासक्रम न शिकता.त्याने फक्त एक कला पुर्णपणे आत्मसात करावी.त्यासाठी त्याने त्याच्या वैयक्तिक पातळीवर ती आत्मसात करावी.त्याचे एखाद्या जवळील प्रशिक्षित किंवा अनुभवी व्यक्तीकडुन ती शिकुन आत्मसात करावी.पण हि कला शिकण्यासाठी त्याला जे मनापासुन आवडते.तीच कला शिकावी.त्यात मग कोणतीही कला असो.त्यात मग अनेक प्रकारच्या कला येतील.उदा.पोहणे,योगा,गायन, तबला ,वेस्टन डान्स,चिञकला,लेखन,धावणे, स्केटींग,ढोलकी,कराटे,पियानो,बासरी,तालीम करणे,गिटार,कराटे,बाॅक्सिंग,पेटी,नृत्य इ.इ. सर्व प्रकारच्या कला मधील एक कला निवडावी.

“कोणी कल्पिली गायनकला । वाद्य कला,चिञकला,तंतुकला । शब्दकला,नृत्य,शृंगारकला ।मोहावया अन्य जीवांसि ।।३२।।ग्रामगीता।”

आपल्या घरी परंपरागत चालत आलेली एखादी कोणती ही कला तो शिकू शकतो.पण त्या विद्यार्थ्याने आपल्या वर्गशिक्षकांस मला हि कला आवडते.हि मी वर्षभर कला शिकणार आहे.अशी नोंद शाळेत करावी.दर दोन महिन्यांनी त्याच्या कलेचा सराव पाहुन त्याला श्रेणी द्यावी.म्हणजे पहिल्या,दुस-या चाचणी प्रमाणे श्रेणी व सहामाही व वार्षिक ला श्रेणी देणे.त्याचे वर्षभरातील कलेचे शिक्षण पुर्ण होईल.एक भारतातील एक उत्तम कलाकार म्हणुन उदयाला येईल.याचा देशाला,राष्टाला काय फायदा होईल पहा.जर एका शाळेत दोनशे ते पाचशे विद्यार्थी शिकत आहेत.त्यातील किमान वीस विद्यार्थ्यांनी नुसती ढोलकी वाजविण्यास शिकला तरी विद्यालयास डोलकी वाचविणा-या कलाकारांची उणीव कधीच भासणार नाही.देशात लाखोच्या पटीत विद्यार्थी शिकत आहे.त्याप्रमाणे लाखो ढोलकी वादक तयार होतील.केवळ ढोलकी वादकच नाही तर..सर्व कला मध्ये पारंगत असणारे कलाकार तयार होतील.हि कला त्यांना पुढे जीवनात जगण्याचे बळ देईल.

“रहाणे कला,पाहणे कला।बोलणे कला,हसणे कला ।सर्वामाजी सौदर्य कला ।ओतप्रोत दर्शवी ।।३३।।ग्रामगीता।”

मला माहित आहे.हे करणे शक्य नाही.पण अवघड ही नाही.तेव्हा हे शैक्षणिक वर्ष रद्द करा आणि प्रत्येक विद्यार्थ्याला “एक तरी कला” परिपुर्ण शिकण्यास लावा….म्हणजे आपल्या भारताच्या संस्कृतीचे जतन होईल.कलासक्त समाज निर्माण होईल.

“एरवी चौदा विद्या,चौसष्ट कला ।काय करावे शिकोनि गलबला ?।जो दुस-याच्या कामी न आला । व्यर्थ मेला अभिमानाने ।।८५।।ग्रामगीता।”

अनेकदा यश आणि अपयश यामध्ये प्रयत्नाच्या एका पायरीचा फरक असतो.सहकार्याची भावना कुठलीही योजना राबवताना महत्वाचे काम करु शकते.वेदनेशिवाय निर्मिती होत नाही.एकदा स्वत:ला कामाची बांधिलकी,समर्पित भावना यांनी प्रेरित केले ,की कामाची गुणवत्ता अधिक वाढविण्याकडे आपण आपोआप प्रयत्नशील राहतो. कलेच्या शिक्षणामुळे येणारी पिढी गुन्हेगारीवृत्तीकडे न वळता.ती एक सधन नागरिक म्हणुन पुढे येतील.देशाला एका कलासक्त नागरीकांची पिढी मिळेल.चला तर…हे शैक्षणिक वर्ष रद्द करु या..!आणि एक कला शिकण्यासाठी हे वर्ष अर्पण करु या..!