धक्कादायक! ७ वर्षीय मुलानं ४ वर्षांच्या मुलाचा चिरला गळा

  53

  ✒️बरेली(पुरोगामी संदेश नेटवर्क)

  बरेली(दि.25ऑगस्ट):-घराबाहेर खेळण्यावरून वाद झाल्यानंतर एका सात वर्षांच्या मुलानं आपल्या चार वर्षांच्या चुलत भावाचा चाकूने गळा चिरल्याची धक्कादायक घटना बरेली जिल्ह्यातील नवाबगंज परिसरात घडली. यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली. यात गंभीर जखमी झालेला मुलगा खासगी रुग्णालयात मृत्यूशी झुंज देत आहे. रविवारी ही घटना घडली.

  नवाबगंज शहरातील चोपुला परिसरात दोन्ही मुलांचे कुटुंबीय राहतात. त्यांचे पालक मोलमजुरीची कामे करतात. मुलाचे वडील रविवारी कामासाठी घराबाहेर गेले होते. घराबाहेर ही दोन्ही मुले खेळत होती. त्याचवेळी त्यांच्यात वाद झाला. अचानक सात वर्षांचा मुलगा रागात घरात गेला आणि त्याने घरातून चाकू आणला. त्याने चार वर्षांच्या चुलत भावाच्या गळ्यावर फिरवला. यात तो गंभीर जखमी झाला. रक्तस्राव मोठ्या प्रमाणात झाल्याने तो बेशुद्ध पडला.

  गंभीर जखमी झालेल्या मुलाला जवळच्या रुग्णालयात तातडीने नेण्यात आले. प्रथमोपचार केल्यानंतर त्याला अद्ययावत खासगी रुग्णालयात उपचारासाठी हलवण्यात आले. या प्रकरणी मुलाच्या आईने पोलिसांत तक्रार दाखल केली. जावेच्या सांगण्यावरून मुलाने माझ्या मुलाला मारण्याचा प्रयत्न केला, असा आरोप तिने केला होता. मात्र, नंतर हा आरोप मागे घेतला. नवाबगंज पोलीस ठाण्याचे प्रमुख सुरेंद्र सिंह पचोरी यांनी सांगितले की, लहान मुलांचे भांडण झाले होते. त्याच्या हातून चुकून ही घटना घडल्याचे पालकांनी सांगितले. त्यामुळे दोन्ही कुटुंबीयांनी आपांपसात मिटवून घेतले. यात कोणतीही कारवाई करू नये, अशी विनंती त्यांनी केली आहे.

  आम्ही पोलिसांचे एक पथक रुग्णालयात पाठवले आहे. पीडित मुलाच्या प्रकृतीची चौकशी केली जात आहे. या प्रकरणात कोणतीही कायदेशीर कारवाई होऊ शकत नाही. मुलाला काही झालं तर आम्हाला कायदेशीर मार्गाने कारवाई करावी लागेल, असेही त्यांनी स्पष्ट केले.