सिंचनाचा अनुशेष दूर करण्यासाठी येलदरी धरणातून डावा कालवा मंजूर करण्याची मागणी

35

✒️शेख आवेज(सेनगाव,विशेष प्रतिनिधी)
मो:-8308862587

सेनगाव(दि.25ऑगस्ट):- हिंगोली जिल्ह्यातील सिंचनाचा अनुशेष दूर करण्यासाठी येलदरी धरणातून डावा कालवा मंजूर करावा अशी मागणी सेनगाव नगरपंचायतच्या उपनगराध्यक्षा कुसुमताई ओंकारआप्पा महाजन यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.हिंगोली जिल्ह्यातील येलदरी धरणातील पाणी सिंचनासाठी एक कालवा असून यातून वसमत, औंढा नागनाथ व पूर्णा तालुक्यातील काही भागांना पाणीपुरवठा होत‌ असतो. वास्तविक येलदरी धरण निर्मिती करीता सर्वाधिक जमिनीही सेनगाव तालुक्यातील शेतकऱ्यांच्या गेल्या असून धरणातील पाण्याचा फायदा मात्र इतर तालुक्यातील नागरिकांना होत आहे. त्यामुळे येलदरी धरणातील पाण्याची उपलब्धता लक्षात घेता नवीन डावा कालवा काढल्यास सेनगाव व इतर तालुक्यातील कोरडवाहू शेती ही ओलिताखाली येईल.यासंदर्भात जिल्ह्याचे खासदार श्री हेमंत पाटील यांनीही पत्र मुख्यमंत्र्यांना दिले आहे. तरी येलदरी धरणाचा नवीन डावा कालवा काढून हजारो हेक्टर जमिनी ओलिताखाली आणून हिंगोली जिल्ह्याचा पर्यायाने सेनगाव तालुक्याचा सिंचनाचा अनुशेष कमी करावा अशी मागणी सेनगाव नगरपंचायतीच्या उपनगराध्यक्षा कुसुमताई ओंकारआप्पा महाजन यांनी निवेदनाद्वारे मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.