तेजाचे तारे तुटले

23

तेजाचे तारे तुटले, मग मळेचि सगळे पिकले!’, ‘चाफा बोलेना..चाफा चालेना चाफा खंत करी काही केल्या फुलेना’, ‘गाई पाण्यावर काय म्हणुनि आल्या?’ अशा एकापेक्षा एक सवाई व काळाच्या पडद्याआड न जाणाऱ्या काव्यरचनांचे जनक कविवर्य बी यांचा आज स्मृतिदिन.

प्रेमाच्या अद्वयानंदाचे उदात्त स्वरूप दर्शवणारे ‘चाफा बोलेना..चाफा चालेना’ याअविस्मरणीय गीतातून लतादीदींच्या मधुर आवाजाने व वसंत प्रभू सारख्या मेलडी किंगच्या समर्थ संगीतसुरांनी बोलका केलेला हा चाफा केव्हाच तुमचा आमचा झालाय.

कविवर्य बी म्हणजेच नारायण मुरलीधर गुप्ते यांचा जन्म १ जून १८७२ रोजी बुलढाणा जिल्ह्यातील मलकापूर येथे झाला. वडिलांच्या वकिली व्यवसायामुळे बी यांचे शिक्षण प्रथम यवतमाळ नंतर अमरावतीत झाले. वडिल अर्धांगवायूमुळे अकस्मात निधन पावल्यावर त्यांना मॅट्रिक न होताच सरकारी कारकुनाची नोकरी करावी लागली. त्यांनी १९११ सालापासून ‘बी’ या टोपणनावाने कविता लेखनास प्रारंभ केला. नोकरीमुळे वाशिम, मुर्तीजापुर, अकोला इ. गावी राहिलेल्या बी यांनी आयुष्याचा बराच काळ अकोला येथे घालविल्याने ते स्वतःला अकोलेकरच मानत असत. अकोला येथेच ते सेवानिवृत्त झाले.
त्यांचा ‘फुलांची ओंजळ’ नावाचा ३८ कविता असलेला काव्यसंग्रह १९३४ मध्ये प्रथम प्रकाशित झाला. वैशिष्ट्यपूर्ण लेखन शैली, जीवनविषयक उदात्त तत्त्वज्ञान या काव्यगुणांनी संपन्न अशा कवितांमुळे या कवितासंग्रहाने काव्यसृष्टीत आपले स्वतंत्र स्थान निर्माण केले. हा काव्यसंग्रह मुंबई व नागपूर विद्यापीठातून अभ्यासक्रमासाठी सुद्धा लावण्यात आला होता.
आचार्य अत्रे फुलांची ओंजळ साठी दिलेल्या विस्तृत प्रस्तावनेत बी बद्दल म्हणतात “ते जरी नावाने B असले तरी त्यांचे कर्तृत्व A1 दर्जाचे आहे”.

काव्यातील कल्पनावैभवाच्या दिप्तीमुळे फुलांची ओंजळ वाचताना महान रत्नभांडारात प्रवेश केल्याचा आनंद होतो. बींच्या काव्याच्या धनसंपन्नतेच्या रत्नभांडारात डोकावून पाहताना ‘अलिबाबा आणि चाळीस चोर’ या गोष्टीत वर्णिलेल्या गूढरम्य गेल्यासारखे वाटते. कमळा, बकुळ, बुलबुल, भगवा झेंडा, वेडगाणे, पिंगा, डंका सारख्या घोटीव व रेखीव शब्दांच्या तेज:पुंज राशी मंत्रमुग्ध करून सोडतात. त्यातील प्रतिमा सर्वत्र वाहणारे रूपप्रेम यांचे अचाट वैभव पाहून रसिक थक्क होतो.

चाफा या त्यांच्या अतिरम्य प्रेम काव्यातील रुसलेल्या प्रियकराला प्रसन्न करण्याची प्रेयसीने चालवल्या प्रयत्नातील अवीट माधुरी मनाला भुरळ पाडते. शब्दांच्या पलीकडील भावनांची जाणीव करून देते. मराठी काव्यात अमर झालेल्या चाफ्यासारखी अनेक मनोहारी पुष्पे फुलांच्या ओंजळीत दिमाखाने दरवळत आहेत. मोहक कल्पकता, कलापूर्ण रचना, अर्थपूर्ण आणि नादवाही शब्दांची निवड हे काव्यगुण व थोडक्या शब्दात विपुल तसेच गहन अर्थ सांगण्याची हातोटी ओंजळीतील प्रत्येक काव्यमय पुष्पाचा रसास्वाद घेण्यास बाध्य करतात.

बींच्या शाळेतील अभ्यासक्रमात बरेच वर्षे असलेल्या ‘माझी कन्या’ रचनासुद्धा वात्सल्यरसाची ओतप्रोत भरणी व उपमांच्या पेरणीमुळे आजही मनावर राज्य करत राहते. शाळेतील मुलीला कोणीतरी भिकारी म्हटल्यावर मुलगी रडत असताना ‘गाई पाण्यावर काय म्हणुनि आल्या’ म्हणत बापाने तिला मनवण्यासाठी तिच्या सौंदर्याचं केलेलं ममत्वपूर्ण वर्णन, तिचं रडणं थांबवण्यासाठी तिला दाखवलेली आमिषे, अनेक अंगांनी छकुलीची घातलेली समजूत व लाडकीची मनधरणी करताना बापाची होणारी दमछाक तसेच एवढं करूनही त्याचा काहीच उपयोग होत नाही हे उमजून संवेदनशील बापाच्या भावनांच्या हळूहळू फुटत चाललेला बांध आपसूकच आपल्याला असहाय बापाच्या दुःखात सहभागी करतो व डोळे डबडबतात.

समाज परिवर्तनाचे विचार कवितेतून तळमळीने मांडणाऱ्या बींना प्रेमाच्या पायावर समतेची इमारत रचणारी शांतीमय उत्क्रांती हवी असल्याचे आढळते. नव्या काळाला अनुसरून नवीन ध्येये निर्माण केली पाहिजेत,आर्यांची परंपरा, संस्कृती, शिष्टरूढी इ. मृत कल्पनांची भुते गाडली गेली पाहिजेत असे डंका कवितेतून सांगणाऱ्या बींच्या कल्पनेला बऱ्याच ठिकाणी अध्यात्माची झाक आहे.’टला-ट रीला-री, जन म्हणे काव्य करणारी’ सांगणाऱ्या वेडगाणे कवितेतून काव्यशक्तीची क्षमता दर्शवणारी नेत्रदीपक कल्पकता पाहून मन थक्क होते.

फुलांची ओंजळ च्या प्रथम आवृत्तीनंतर बीं यांनी लिहिलेल्या कविता पुढील आवृत्तीमध्ये ‘पिकले पान’ या स्वतंत्र विभागात संग्रहित करण्यात आले आहेत. त्यामध्ये गाविलगड, पिकले पान, एक दृश्य, रूपमुग्ध सारख्या एका पेक्षा एक नितांत सुंदर कविता आहेत.

‘विदर्भाच्या डोंगरात आहे गाव नाव बुलठाणे। वनलक्ष्मीच्या शृंगाराची अमोलिक लेणे।।’ सारख्या ओळीत बी यांनी बुलढाण्याच्या घाटाचे व आसपासच्या निसर्गसौंदर्याचे अतिशय मनोहर वर्णन केले आहे. प्रसिद्धीपराङ्‌मुख व निस्पृह असलेले बी हे थोर कवी आपले उर्वरित आयुष्य त्यांचे छिंदवाडा येथील जावई श्री प्रधान यांच्याकडे व्यतीत करताना ३० ऑगस्ट १९४७ रोजी हृदयक्रिया बंद पडून त्यांची प्राणज्योत मालवली.

बी यांच्या कवितेतील भाषासौंदर्य व कल्पनासौंदर्यामुळे इतक्या वर्षांनंतरसुद्धा त्यांच्या रचना रसिक मनावर मोहिनी घालत आहेत, यातच त्यांचे मोठेपण सामावले आहे. छोट्याशा पण वैशिष्ट्यपूर्ण फुलांच्या ओंजळीच्या योगाने कविवर्य बी मराठी रसिकांच्या अंतःकरणाला सात्विक आनंद देत राहतील यात शंका नाही. स्मृतिदिनाच्या निमित्ताने या स्वयंप्रकाशित कवीस विनम्र श्रद्धांजली.

✒️पंकज वसंत पाटील
मलकापूर
मो.9850430579