करुणेचा सागर आई – मदर टेरेसा

27

    ▪️मदर टेरेसा जन्म दिवस (26ऑगस्ट) – विशेष लेख▪️

निराधारांचा आधार तू
गांजलेल्या ची सेविका तू
दिनदुबळ्यांची आई होऊनी
विश्वासी करुणामय केलेस तू
दुःखाचे परिमार्जन तू
ख्रिस्तांची शिकवण तू
अनाथांची आई होऊन
संतपदास सार्थ तू
                                                       – राजेन्द्र बन्सोड

26 ऑगस्ट 1910 साली मसेदोनियातील स्कॉप्जे येथे एक साधारण व्यापारी निकोला बोयाजू यांच्या घरी अगनेस गोंझा बोयाजिजू ने जन्म घेतला होता. यानांच पुढे मदर टेरेसा म्हणुन जग ओळखु लागले. गोंझा चा अर्थ अलबेनियन भाषेत ’कळी’ (फुल) असा होतो. त्यांचे वडील निकोला बोयाजू धार्मिक प्रवृत्तीचे व्यक्तिमत्व होते, ईसा मसीह यांच्यावर त्यांचा फार विश्वास. त्या ज्यावेळी 8 वर्षांच्या होत्या त्यावेळी त्यांच्या वडिलांचे निधन झाले. वडिलांच्या निधनानंतर तिचा सांभाळ तिची आई द्राना बोयाजूंनी केला. त्या एक धर्मपरायण आणि आदर्श गृहीणी होत्या, मदर टेरेसांवर आईच्या संस्कारांचा आणि शिक्षणाचा फार प्रभाव पडला. वडिलांच्या अकाली जाण्याने त्यांच्या घरातील परिस्थीती अत्यंत हालाखीची झाली होती त्यामुळे मदर टेरेसा यांचे लहानपण फार संघर्षमय परिस्थीतीतुन गेले. मदर टेरेसा लहानपणी आपल्या आई आणि बहिणीबरोबर चर्च मधे जाऊन धार्मिक गीत गायन करीत असे. ती ज्यावेळी केवळ 12 वर्षांची होती तेव्हां एका धार्मिक यात्रेला गेलेली असतांना येशुच्या परोपकार आणि समाजसेवेच्या शिकवणीला जगभरात पोहोचविण्याचा त्याचा प्रचार प्रसार करण्याचा निर्णय घेतला व आपले संपुर्ण जीवन गरिबांच्या सेवेत समर्पित करण्याचा तिने मनोमन निश्चय घेतला होता. 1928 साली ज्यावेळी मदर टेरेसा फक्त 18 वर्षांची होती तेव्हां त्यांनी नन चा समुदाय ’सिस्टर्स ऑफ लोरेटो’ त सहभागी होण्याचा निर्णय घेतला आणि घर सोडले. पुढे त्या आयरलैंड येथे गेल्या आणि इंग्लिश भाषा शिकल्या कारण ’लोरेटो’ च्या सिस्टर्स इंग्रजी माध्यमातुनच भारतात लहान मुलांना शिकविण्याचे कार्य करत होत्या. या दरम्यान त्यांनी एका इन्स्टीटयुट मधुन नन होण्याचे ट्रेनिंग पुर्ण केले. नन झाल्यानंतर त्यांचे सिस्टर मेरी टेरेसा असे नामकरण करण्यात आले. पुढे आपले संपुर्ण जीवन गरीब आणि असाहय्य लोकांच्या मदतीकरता त्या व्यतीत केले.
कलकत्ता येथे डबलिनच्या सिस्टर लोरेंटो यांनी संत मैरी स्कूल ची स्थापना केली होती. मदर टेरेसा याठिकाणी गरीब आणि असाहय्य मुलांना शिकवीत असत. त्यांचे हिंदी आणि बंगाली या दोन्ही भाषांवर चांगले प्रभुत्व होते. सुरूवातीपासुनच त्या अत्यंत मेहनती होत्या त्यामुळे त्यांनी हे काम देखील अत्यंत प्रामाणिकतेने आणि निष्ठापुर्वक केले, त्या विद्याथ्र्यांच्या आवडत्या शिक्षीका झाल्या. या दरम्यान त्यांच लक्ष आजुबाजुला पसरलेल्या गरीबी, अनारोग्य, लाचारी, व अज्ञानावर गेलं. ते पाहुन त्या अत्यंत दुःखी झाल्या. हा तो काळ होता जेव्हां दुष्काळामुळे कलकत्ता शहरात मोठया संख्येने मृत्यु होत होते व गरिबीमुळे तेथील जनतेची परिस्थीती अत्यंत हालाखीची झाली होती. हे पाहुन मदर टेरेसा यांनी गरीब, असाहाय्य, आजारी आणि गरजवंतांची सेवा करण्याचा निश्चय केला.

 7 ऑक्टोबर 1950 ला मदर टेरेसा यांना समाजाच्या हिताकरीता कार्य करणारी मिशनरी ऑफ चॅरिटी ही संस्था स्थापन केली. मदर टेरेसा यांच्या या संस्थेचा उद्देश गरीब, गरजवंत, रूग्णं, आणि लाचारांची सहाय्यता करणे आणि त्यांच्यात जगण्याची आस निर्माण करणे हाच होता. या व्यतिरीक्त करूणाहृदयी मदर टेरेसा यांनी ’निर्मल हृदय’ आणि ’निर्मला शिशु भवन’ नावाचे आश्रम सुरू केले. या आश्रमात गरीब आणि आजारी रूग्णांवर उपचार केले जात असत आणि अनाथ व बेघर मुलांची मदत केली जात असे

मदर तेरेसा धाडसीही होत्या. बैरूतला वेढा पडलेला असताना त्यांनी इ.स. १९८२ मध्ये पॅलेस्टेनियन बंडखोर आणि इस्रायली सैनिक यांच्यात तात्पुरता समझोता घडवून आणून रेडक्रॉसच्या मदतीने ३७ लहान मुलांची सुटका घडवून आणली. त्या स्वतः युद्धभूमीवर हिंडल्या. पूर्व युरोप ज्या वेळी अधिक मोकळा व्हायला लागला होता, त्या वेळी त्यांनी कम्युनिस्ट देशांमध्ये ‘मिशनरीज ऑफ चॅरिटी’ चा प्रसार केला. इथिओपियामधल्या भुकेलेल्यांना त्यांनी आधार दिला. त्या तिथे गेल्या, ज्या काळात चेर्नोबिलच्या किरणोत्सर्गाची घटना घडली तेव्हाही आपल्याला त्याचा त्रास होईल किंवा नाही याची चिंता करत बसण्यापेक्षा त्यांनी तिथे जाऊन ज्यांना तो त्रास झाला त्यांना आधार दिला.
इ.स. १९७९ मध्ये त्यांना शांततेसाठी ‘नोबेल पुरस्कार’ मिळाला तेव्हा आणि इ.स. १९८० मध्ये त्यांना ‘भारतरत्न’ हा किताब देण्यात आला.१९८५ साली त्यांना मेडल ऑफ फ्रीडम अवार्ड ने देखील गौरवान्वित करण्यात आले. २०१२ मध्ये झालेल्या आऊटलुक इंडियाच्या ‘द ग्रेटेस्ट इंडियन’ या आंतरराष्ट्रीय सर्वेक्षणामध्ये मदर तेरेसा पाचव्या क्रमांकावर होत्या.
त्यांना किडनी आणि हृदयाचा त्रास सुरू झाला. 1997 ला मदर टेरेसा यांनी मिशनरीज ऑफ चॅरिटी च्या प्रमुख पदावरून निवृत्ती घेतली व 5 सप्टेंबर 1997 ला कलकत्ता येथे अखेरचा श्वास घेतला. अश्या तह्रेने या करूणाहृदयी आत्म्याने या जगाचा निरोप घेतला.

✒️राजेन्द्र धर्मदास बन्सोड
आमगाव (गोंदिया)
मो:-८२७५२९०२५२