थकित वेतनासाठी न.प.सफाई कमगारांचे उपोषण

44

✒️नवनाथ आडे(गेवराई,तालुका प्रतिनिधी)मो:- 9075913114

गेवराई(दि.26ऑगस्ट):-विधानसभा निवडणुकीपूर्वी बीड नगरपालिकेने तब्बल दीडशे महिला कामगारांकडून शहरात स्वच्छता मोहीम राबविली. मात्र नंतर आस्थापनेवरील या सफाई कामगारांना बेकायदेशीरपणे कामावरून कमी करत काम केलेल्या कार्यकाळातील दोन महिन्यांचे वेतनही दिले नसल्याने संतापलेल्या या सफार्स कामगारांनी आज थेट बीड शहर पोलिस ठाण्यात नगरपालिकेचे मुख्याधिकारी यांच्या विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्याबाबत तक्रार दाखल केल्याने खळबळ उडाली आहे.

बीड नगरपालिके मार्फत गेल्या अनेक वर्षांपासून सफाई कामगार हे काम करतात. नगरपालिकेला जेव्हा गरज असते तेव्हा नगरपालिका या सफाई कामगारांकडून काम करून घेते आणि नंतर त्यांना बेकायदेशीररित्या काढून टाकते. विधानसभा निवडणुकीपुर्वी शहरात स्वच्छता मोहीम राबविण्यात आली होती. त्या वेळी या कामगारांनी मोठे काम केले मात्र त्या दोन महिन्यांचे वेतन द्यायचे सोडून नगरपालिकेने कामगारांनाच सेवेतून बडतर्फ केले. सदरची बडतर्फी ही बेकायदेशीर आहे, याबाबत अनेक वेळा या कर्मचार्‍यांनी जिल्हाधिकार्‍यांसह शासन-प्रशासन व्यवस्थेकडे निवेदन देऊन दाद मागितली, अनेक वेळा आंदोलने केली मात्र याकडे बीड नगरपालिकेने सपशेल दुर्लक्ष केले. त्यामुळे संतापलेल्या कर्मचार्‍यांनी आज बीड नगरपालिकेसमोर उपोषण सुरू केले मात्र या उपोषणाकडे नगरपालिका प्रशासन दुर्लक्ष करत असल्याचे पाहून कर्मचार्‍यांनी थेट मुख्याधिकार्‍यांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल करा, याबाबतची तक्रार बीड शहर पोलिसात केल्याने खळबळ उडाली आहे.