बुरसटलेली मानसिकता

26

भारतीय लोकांची मानसिकता एवढी बुरसटलेली आहे की स्वच्छ कपड्याच्या आतील मनात एवढी द्वेषाची घाण आहे की त्यांना मानव म्हणून बोलणे म्हणजे मुर्खपणाचे ठरेल. एका कलाकाराने संविधानावर गणपतीची मुर्ती बसवून संविधानाचा अवमान केला सदर कृत्य संविधान विरोधी नक्कीच आहे. त्याच्या वर खटला भरून शिक्षा होणेही गरजेचे आहे. परंतु या बाबीला समोर करून लोकांची बुरसटलेली माणसिकता समोर येत आहे. चार पुस्तके शिकलेल्या, पंधरा ऑगस्ट, सव्वीस जानेवारी ला देशभक्तीचे नाटक करणाऱ्या लोकांची सत्य परिस्थिती समोर आली आहे. संविधानाचा अवमान झाला एकच समुह समोर येऊन अवमान करणाऱ्याला शिक्षा व्हायला पाहिजे , संविधान देशाचा व देशातील नागरिकांचा स्वाभिमान आहे. संविधान देशाचे सर्वोच्च सन्मानिय व आदरनीय आहे. एकिकडे संविधानाचा अवमान करणाऱ्यावर कायदेशीर कार्यवाही व्हावी या साठी बहुतांश एकच जात अग्रेसर असताना इतर भारतीय लोकांना संविधानाच्या अवमानाचे काहीच वाटत नाही, याचाच दुसरा अर्थ अवमान करणाऱ्या प्रवृतींना त्यांचे मुक समर्थन असल्याचे सिद्ध होते. स्वतः ची अक्कल गहाण ठेवलेले लोक भारतीय संविधानाला एका जातीचा, धर्माचा धार्मिक ग्रंथच वाटतो आहे. ज्याला देशाचे संविधान आणि धार्मिक ग्रंथ यामधील फरक कळत नाही हे असे लोक देशभक्त म्हणून मिरवीत असतील तर त्यांना भारतीय नागरिक म्हणावे का? संविधानावर गणपती बसवून संविधानाचा अवमान केल्या नंतर त्या कलाकारांने माफी मागीतली. आणि माफी मागताना आपली अक्कल सुद्धा दाखवून दिली. तो म्हणतो संविधानाचा अवमान झाल्यामुळे दलीतांच्या भावना दुखावल्या गेल्या त्यामुळे मी माफी मागतो. आणि हिच बातमी वृत्तवाहिन्यांवर झळकत होती. त्या कलाकाराला अक्कल नसेल पण ज्या वाहीनीवर सदर बातमी दाखवली गेली त्या वाहीनी चालवणाऱ्या लोकांचा मेंदू होता तरी कुठे? संविधान दलितांचे आहे की भारताचे हे जर वाहीनीवाल्यांना कळत नसेल आणि फालतु विषयावर चर्चा घडवून आणणाऱ्या वाहीन्यांनी त्या कलाकाराला साधा प्रश्न विचारला नाही संविधान दलीतांचे कि देशाचे? शुल्लक विषयावर चर्चा घडवून आणून स्वतः ला पुरोगामी व धर्मनिरपेक्ष समजाणाऱ्या अनेक वाहीन्या आहेत. परंतु या एकाही वाहीनीमध्ये संविधानावर चर्चा करण्यायाची धमक नाही कारण सर्वाचे मेंदु विषमता आणि जातीच्या घाणीत वाढलेले आहेत. काही लोक तर संविधानाच्या विरोधात सोशल मिडीयावर लिहत आहेत, काही लोक कलाकारांचे समर्थन करत आहेत. मुळात प्रश्न हा आहे जे लोक संविधानाला विरोध वा कलाकारांना समर्थन करत आहेत त्यांना देशात राहण्याचा अधिकार आहे? विशिष्ट जातीच्या लोकांना भारत देशात काही गोष्टी पटत नसतील तर विदेशात जाऊन राहण्याचा सल्ला देणारे देशात अराजकता माजवणारे लोक संविधानाचा अवमान केल्यावर एकही शब्द बोलत नाही मग यांना कोठे पाठवावे. ज्या लोकांना देश मोठा की धर्म मोठा हे कळत नळत नाही अशा धर्मांध लोकांचा सुळसुळाट झालेला आहे. संविधाना राष्ट्रीय ग्रंथ आहे हे मान्य न करणारे जास्त लोक भारतात दिसत आहेत. प्रत्येकाने जर माझा धर्म मोठा माझा धर्म मोठा अस म्हणून कृत्य केले तर मग देश कोणाचा? कोणताही धर्म वा धर्माचे प्रतीक हे देशापेक्षा वा देशाच्या प्रतिकापेक्षा मोठे नाहीत आणि जो धर्माला देशापेक्षा आणि धर्माच्या प्रतिकाला राष्ट्रीय प्रतिकापेक्षा मोठे समजत असेल अशा लोकांवर देशद्रोहाचे खटले भरणे गरजचे आहे. त्यांच्या पोस्ट त्यांचे नाव शेअर करून मोठे केल्यापेक्षा त्यांच्यावर खटले भरून तुरुंगात डांबणे हाच एक उपाय आहे.
कोणत्याही धर्माचे कोणालाही पालन करण्याचे व धर्माची उपासना, प्रचार, प्रसार करण्याचे स्वातंत्र्य संविधानाने दिलेला आहे. त्या हक्क अधिकाराचा नक्कीच वापर होणे गरजेचे आहे. परंतु धर्म हा घरात असावा बाहेर एक भारतीय म्हणून आपली ओळख असावी. संविधानाने दिलेल्या हक्क अधिकाराचा वापर करताना संविधानाने दिलेल्या कर्तव्याची सुद्धा जाणीव असावी. संविधान कोणाची खाजगी संपत्ती नाही ती राष्ट्रीय संपती आहे आणि राष्ट्रीय संपतीचे जतन व रक्षण करणे हे प्रत्येक भारतीयांचे कर्तव्य आहे. कर्तव्य पार पाडता येत नसेल तर हक्क अधिकाराच्या गोष्टी करणे बंद व्हायला पाहिजे. ज्यांना देशापेक्षा धर्म मोठा वाटतो अशा धर्मांध लोकांना वठणीवर आणण्यासाठी सरकारने काही उपाय करायला पाहिजे याचे नियोजन संविधानाचा सन्मान करणाऱ्या लोकांकडे पाहिजे. काही धर्मांध लोक संविधानाला राष्ट्रीय ग्रंथ, राष्ट्रीय संपती मानायला तयार नाहीत संविधानाच्या विरोधात पोस्ट करून सोशल मिडीयावर शेअर करण्यात मर्दांनगी समजणारे वैचारिक दृष्टीने नपुंसक असतात. धर्माचे पालन वा आचरण करताना राष्ट्राचा वा राष्ट्रीय प्रतिकांचा अवमान होत असेल आणि हा अवमान सोशल मिडीयावर शेअर करत असाल तर देशद्रोह्यांचे वेगळे प्रमाणपत्र देण्याची गरज नाही. संविधानाचा सन्मान करणाऱ्या समुहाने सुद्धा संविधान आमचेच हा अट्टाहास सोडून द्यावा. संविधान देशाचे आहे आणि प्रत्येकाने त्याचा सन्मान केला पाहिजे हा अट्टाहास आता त्या समुहाने करणे गरजेचे आहे. संविधानामुळे आमचे अस्तित्व, स्वाभाविक निर्माण झाला, संविधानाने प्रगतीचे द्वार उघडून समता प्रस्थापित केली याची जाणीव एका समुहाला आहे आणि म्हणून तो समुह संविधाना प्रती भावनिक आहे, असेच भावनिक प्रत्येक भारतीयांनी असायला पाहिजे. एकाच समुहाने असून जमत नाही. इतर भारतीय नागरिकांना हे माहिती असुन संविधाना प्रती आपुलकी व प्रेम नसेल तर तो देशाशी बेईमानी करतो आणि तो देशद्रोहीच असतो.
अनेक लोक छाती वर करून ओरडतात आम्ही पण संविधानाला मानतो, तर तो नेमका कोणावर उपकार करतो. संविधानाला माणावेच लागेल कारण ते देशाचे आहे. आणि भारताचे संविधान मान्य नसेल तर विदेशात जा पण भारतात राहायचे असेल तर संविधान मान्य करावेच लागेल कारण तेच देश चालवत आहे. संविधाना मुळे खातो हे कोणी बोलत नाही पण माणतो म्हणजे उपकार करतो हे बोलायला मेंदू गहाण ठेवलेले लोक विसरत नाहीत. धर्म ही बाब वेगळी आणि देश ही बाब वेगळी धर्माची उपासना करून देशाला जपायचे हे बरोबर आहे परंतु जेव्हा धर्म आणि देशाचा प्रश्न उपस्थित राहील तेव्हा देशाची बाजु मांडणारा खरा भारतीय नागरिक राहील. संविधानाचे समर्थन करताना वा सन्मान करताना एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे आपल्या कृत्यामधुन संविधान विरोधी काम होणार नाही याची काळजी घेतल्या गेली पाहिजे. जसे काही लोक संविधानाला विरोध करताना संविधानाचा संबंध निळ्या रंगाशी जोडतात असे लोक मानसिक दृष्टीने अपंग असतात परंतु याला प्रत्युत्तर देताना संविधानाचा सन्मान करणाऱ्या समुहाने रंगाचा उल्लेख वा जातीचा उल्लेख करून प्रत्युत्तर देऊ नये तर देशाचे हीत व संविधानाचा सन्मान लक्षात ठेवून प्रत्युत्तर देणे गरजेचे आहे. त्यांनी निळा रंगा बद्दल बोलले कि लगचे आपण भगव्या रंगावर बोलून त्याला शांत करू शकत नाही कारण भगव्याला विरोध करताना तथागत गौतम बुद्धांचा विचार करावा तथागत गौतम बुद्धांचा केसरी आणि आजचा भगवा यामध्ये फक्त नावाचा फरक असला तरी रंग तोच आहे. म्हणून बुरसटलेल्या विचारांना उत्तर देताना आपले विचार मात्र शुद्ध आणि चांगलेच असणे आवश्यक आहे. जर आपलेच विचार बदलले तर संविधानाचा सन्मान कसा होईल? संविधानाचा सम्मान बोलण्यातून नाही तर कृतीमधून होणे आवश्यक आहे. बुरसटलेल्या माणसिकते मधील घाण बाजूला करून त्यांना देशा विषयी प्रेम निर्माण करून द्यायचे आहे. बुरसटलेल्या विचारात आपण आपले विचार घाण करून देश महाण होणार नाही.

                                       ✒️विनोद पंजाबराव सदावर्ते
                                              रा. आरेगाव ता मेहकर
                                                 मो:-९१३०९७९३००