

🔹बीड जिल्हा युवक काँग्रेसची मागणी
✒️ देवराज कोळे(गेवराई प्रतिनिधी)मो:-8432409595
गेवराई(दि.28ऑगस्ट):-सध्या देशात व राज्यात कोरोनाचे संकट आहे. या संकटाचा मूकाबला करण्यासाठी महाविकास आघाडी सरकार सर्वतोपरी प्रयत्न करीत आहे. अशातच केंद्र सरकारने 6 सप्टेंबर व 13 सप्टेंबर रोजी जेईई व नीट परिक्षा घेण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे विद्यार्थ्यांचे आरोग्य धोक्यात येण्याची शक्यता आहे. त्यामुळे सदर परिक्षा पुढे ढकलावी अशी मागणी बीड जिल्हा युवक काँग्रेस वतीने करण्यात आली आहे.
महसूलमंत्री ना.बाळासाहेब थोरात,रजनीताई अशोक पाटील, महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे अध्यक्ष सत्यजीत तांबे यांचे मार्गदर्शनाखाली गेवराई तहसील कार्यालय येथे नायब तहसीलदार रामदासी यांना युवक काँग्रेसच्या वतीने याबाबत निवेदन देण्यात आले. यावेळी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष ॲड श्रीनिवास बेदरे युवक काँग्रेसचे तालुका अध्यक्ष किरण अजबकर, गोटू सावंत राजू पोपळघट, सभाजी अजबकर आदि कार्यकर्ते उपस्थित होते.
या निवेदनात म्हटले आहे कि, सध्या संपूर्ण जग कोरोना या वैश्विक संकटामुळे त्रस्त आहे.भारतात तर हे संकट अधिकच भीषण बनले आहे.सद्यस्थितीत भारतात कोरोना संसर्गित लोकांची संख्या तीस लाखांहून अधिक झालेली आहे.अश्या परिस्थितीमध्ये अभियांत्रिकी आणि वैद्यकीय शिक्षणाच्या प्रवेशासाठी अत्यावश्यक असणार्या जेईई व नीट या परीक्षा 6 सप्टेंबर व 13 सप्टेंबर रोजी घेण्याचा घाट केंद्र सरकारने घातला आहे.सदर निर्णयामुळे विद्यार्थ्यांमध्ये आणि पालकांमध्ये अतिशय चिंतेचे आणि भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.एकप्रकारे या भीषण परिस्थितीत परीक्षा घेऊन विद्यार्थ्यांचे जीवन धोक्यात घालणे कितपत योग्य आहे असा सवाल युवक काँग्रेस च्या वतीने करण्यात आला आहे.