🔺कोरोना नियंत्रणासाठी नागरिकांनी एमएसडब्ल्यूसी मुलमंत्राचा वापर करावा: जिल्हाधिकारी

🔺 बाधितांची संख्या पोहोचली 1896 वर

✒️चंद्रपूर(पुरोगामी संदेश नेटवर्क)

चंद्रपूर(दि.28ऑगस्ट):- कोरोना नियंत्रणासाठी नागरिकांनी एमएसडब्ल्यूसी मुलमंत्राचा अर्थात एम म्हणजे मास्क, एस म्हणजे सोशल डिस्टन्सिंग, डब्ल्यू म्हणजे वॉश युवर हँन्ड, सी म्हणजे कंट्रोल ऑफ क्राऊड या मुलमंत्राचा वापर करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी केले आहे. या मुलमंत्राचा अंगीकार केल्यास जिल्ह्यात कोरोनावर मात करू असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

आज जिल्हाधिकारी यांनी व्हिडिओ संदेशाद्वारे नागरिकांनी गर्दी होणार नाही असे कुठलेही समारंभ आयोजित करू नये असे आवाहन त्यांनी नागरिकांना केले आहे. जिल्हा प्रशासनाने कोरोना प्रतिबंधासाठी विविध उपाययोजना केलेल्या आहेत. यामध्ये 50 वर्षावरील नागरिकांचे घरोघरी जाऊन आरोग्य तपासणी करून घेण्याचे कार्य मोठ्या प्रमाणात सुरू आहे. तसेच आयएलआय व सारी रुग्णांची देखील तपासणी जिल्ह्यात सुरू आहे.

31 ऑगस्टपर्यंत 1 हजार 200 आयसोलेटेड बेडची आवश्यकता लागणार आहे. त्यापैकी 900 बेड तयार असून अधिकच्या 450 बेडची सुविधा सैनिक स्कूल येथे केलेली आहे. खाजगी रुग्णालयांमध्ये देखील कोरोना बाधितांना दाखल करून घेण्याच्या सूचना केलेल्या आहेत.

सोशल मीडियावर एका बाधितामागे दीड लाख रुपये मिळतात असा संदेश फिरत आहे. या संदेशामध्ये कोणतेही तथ्य नसून हा संदेश चुकीचा व दिशाभूल करणारा आहे. खाजगी रुग्णालयामार्फत एकत्रित महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना तथा प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेअंतर्गत कोरोना बाधितांवर उपचार करण्यात येत आहे. अशी माहिती जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी व्हिडिओ संदेश जारी करतांना दिली आहे.

चंद्रपूर जिल्ह्यातील कोरोना पॉझिटिव्हमध्ये 24 तासात आणखी 97 बाधितांची भर पडली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील बाधितांची एकूण संख्या 1 हजार 896 वर पोहोचली आहे. आतापर्यंत 1 हजार 117 बाधितांना कोरोनातून बरे झाल्यामुळे सुटी देण्यात आली आहे. तर 756 बाधितांवर उपचार सुरू आहे.

गेल्या 24 तासांमध्ये एका बाधिताचा मृत्यू झाला आहे. 68 वर्षीय कन्नमवार वार्ड बल्लारपूर येथील पुरुष बाधिताचा मृत्यू झाला आहे. श्वसनाचा आजार असल्याने बाधिताला 27 ऑगस्टला सायंकाळी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, चंद्रपूर येथे दाखल करण्यात आले. मात्र, वैद्यकीय शर्तीचे प्रयत्न करून देखील उपचारादरम्यान 27 ऑगस्टलाच सायंकाळी बाधिताचा मृत्यू झाला. या बाधिताला कोरोना व्यतिरिक्त न्युमोनिया व श्वसनाचा आजार होता. आरोग्य यंत्रणेने दिलेल्या माहितीनुसार, आतापर्यंत जिल्ह्यात 23 मृत्यू झाले असून चंद्रपूर जिल्ह्यातील 20 तर तीन मृत्यू जिल्ह्याबाहेरील आहे.

आज पुढे आलेल्या बाधितांमध्ये चंद्रपूर 40, ब्रह्मपुरी 4, भद्रावती 5, राजुरा 7, सावली व चिमूर येथील प्रत्येकी एक, गोंडपिपरी 3, मुल 9, बल्लारपूर 12, पोंभुर्णा 2, कोरपना 7, वरोरा 3, उत्तर प्रदेश येथून आलेला एक तर वणी यवतमाळ येथील दोन बाधिताचा समावेश असून एकूण 97 बाधित पुढे आले आहेत.

Breaking News, कोरोना ब्रेकिंग, चंद्रपूर, महाराष्ट्र, विदर्भ, स्वास्थ 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

©️ALL RIGHT RESERVED